Skip to main content
x

गोखले कमला रघुनाथ

     पहिली चित्रपट अभिनेत्री म्हणून नावारूपाला आलेल्या कमला रघुनाथ गोखले म्हणजे पूर्वाश्रमीच्या कमला कामत यांचा जन्म मुंबईतील गिरगाव इथे झाला. त्यांचं मूळ घराणं गोव्यातील अस्नोडा येथील होतं. त्यांचे वडील कीर्तनकार होते, तर आई उत्तम सतारवादक होत्या. त्यामुळे कमला यांचं संगीताचं शिक्षण घरातच झालं होतं, परंतु घरच्या गरिबीमुळे त्या शालेय शिक्षण घेऊ शकल्या नाहीत. वयाच्या पाचव्या वर्षी कमला मेळ्यामध्ये कामं करू लागल्या. त्यामुळे त्यांच्यावर अभिनयाचे व संगीताचे संस्कार नकळत होत गेले. याच काळात त्यांना ‘हॅल्मेट’ नाटकात काम करण्याची संधी मिळाली. पुढे १९१४ साली दादासाहेब फाळके यांनी ‘भस्मासूर मोहिनी’ या चित्रपटासाठी कमला गोखले व त्यांची आई दुर्गा कामत यांना घेण्याचं ठरवलं. त्यात कमलाबाई मोहिनीच्या मुख्य भूमिकेत होत्या; तर दुर्गा कामत यांनी पार्वतीची भूमिका केली होती.

     रघुनाथ गोखले किर्लोस्कर नाटक कंपनीत स्त्रीपार्ट करत असत. तिथेच कमलाबाई व त्यांच्या आई काम करत असताना कमलाबाईंची रघुनाथ गोखले यांच्याबरोबर ओळख झाली व त्या रघुनाथ गोखले यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या. त्यानंतर हे नवीन जोडपं किर्लोस्कर कंपनीचे ‘लीड’ जोडपं म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

     वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी रघुनाथ गोखले यांचं निधन झाल्यावर संपूर्ण संसाराची व तीन मुलांची जबाबदारी कोसळलेल्या कमलाबाईंनी खचून न जाता नाटकात काम करण्याचा आपला निश्‍चय कायम ठेवला व त्या तवनाप्पा चिवटे यांच्या मनोहर स्त्री संगीत मंडळीत दाखल झाल्या. या कंपनीत सर्व स्त्रियाच काम करत असल्यामुळे कमला गोखले यांनी ‘मानापमान’ (धैर्यधर), ‘मृच्छकटिक’ (चारुदत्त), ‘संशयकल्लोळ’ (अश्‍विनशेठ) या नाटकांमधून पुरुष भूमिकाही पार पाडल्या. तसंच त्यांनी ‘नाट्य कला प्रसारक’ यांसारख्या संस्थांमध्ये काम केलं. अशिक्षित असणाऱ्या कमलाबाईंचा इतर भाषांशी संबंध नसूनही त्यांनी कानडीमध्ये ‘लंका दहन’ या नाटकाचे प्रयोग केले. त्यासाठी त्यांनी एका आठवड्यात कानडी भाषेचा परिचय करून घेतला.

    वैधव्य आल्यावरही कमला गोखले यांनी मोठ्या धैर्याने आपल्या तिन्ही मुलांचा सांभाळ केला. ज्या काळात स्त्रीने नाटक-चित्रपटात काम करणं आक्षेपार्ह मानलं जाई, त्या काळात त्यांनी धाडसानं नाटकात व चित्रपटात कामं केली व समाजापुढे वेगळे आदर्श निर्माण केले. या कारणामुळे त्यांना समाजाच्या अवहेलनेचा विषय व्हावे लागले, त्यांच्या मुलांना ‘नाटक-सिनेमावाल्या बाईची पोरे’ म्हणून हिणवलं जाई. तरीही खचून न जाता त्यांनी आपल्या मुलांना अभिनयाचं शिक्षण दिलं, हे विशेष.

    १९३० मध्ये त्यांनी ‘वीर सावरकर’ या बॅनरखाली ‘उ:शाप’ नावाचं नाटक केलं. त्यात हरिजनांच्या प्रश्‍नांना वाचा फोडली होती. विश्राम बेडेकर यांच्या १९३८ सालच्या ‘लक्ष्मीचे खेळ’ या चित्रपटात काम करण्याची संधी कमलाबाईंना मिळाली. त्यानंतर त्यांनी मा. अविनाश यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘दुनिया हसते रडते बघ रे’, ‘कोणी न वाली जगात’ या दोन गाण्यांचं गायन केलं होतं. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा चंद्रकांत गोखले यांनी चित्रपटक्षेत्रात नाव कमावलं, तर नातू विक्रम गोखले यांनीही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली.

     मराठी रंगभूमीवर सातत्याने चाळीस वर्षे काम करणाऱ्या कमला गोखले यांच्यावर रीना मोहन या बंगाली दिग्दर्शिकेने हिंदी भाषेत ‘कमलाबाई’ हा लघुपट तयार केला, याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पारितोषिकं प्राप्त झाली आहेत, हाच त्यांच्या कार्याचा उचित असा गौरव आहे, असं म्हटलं पाहिजं. 

-  डॉ. अर्चना कुडतरकर

गोखले कमला रघुनाथ