Skip to main content
x

गोखले, मधुसूदन रघुनाथराव

गोखले, लालजी

  मधुसूदन ऊर्फ लालजी रघुनाथराव गोखले यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे वडील रघुनाथराव आणि आई कमलाबाई हे संगीत नाट्यसृष्टीतील कलाकार होते. रघुनाथरावांनी ‘चित्ताकर्षक नाटक मंडळी’ची स्थापना केली होती, तर कमलाबाई या भारतीय रुपेरी पडद्यावरील पहिल्या स्त्री-कलाकार होत्या. वयाच्या आठव्या वर्षी लालजींचे पितृछत्र हरपले. त्यामुळे लालजींचे बालपण संगीतसृष्टीमध्ये गेले. लालजी ८/९ वर्षांचे असताना बाबूराव पेंटर निर्मित ‘मुरलीवाला’ या सिनेमात त्यांनी श्रीकृष्णाची भूमिका केली आणि ते सिनेसृष्टीतील पहिले श्रीकृष्ण झाले ! सन २००० च्या आसपास या पहिल्या श्रीकृष्णाला ‘व्ही. शांताराम’ पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.
लालजींचे घरचे नाव मधुसूदन गोखले असे होते. पण त्यांचा गौरवर्ण आणि सुरेख चेहर्‍यामुळे सर्व बुजुर्ग कलाकार त्यांना ‘लाला’ म्हणायचे. तबलावादनातील विद्वत्ता प्राप्त झाल्यावर ते पं. लालजी गोखले याच नावाने प्रसिद्ध झाले.
जरी लहान वयातच सिनेसृष्टीमध्ये काम केले तरी लालजींचा ओढा संगीताकडेच होता. पं. भास्करराव चौगुले यांच्याकडे त्यांनी तबल्याचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. पंधराव्या वर्षापासून त्यांनी तबल्याची साथ करणे सुरू केले. १९३४ साली ते मुंबईत वादक कलाकार म्हणून कार्य करू लागले. तेथे ५-६ वर्षे तत्कालीन मुंबई रेडिओ केंद्रात ते वादन करीत असत.
  एकदा लालजींनी एका कार्यक्रमामध्ये उस्ताद थिरकवा खाँसाहेब यांची साथ ऐकली आणि लगेचच त्यांना खाँसाहेबांकडे शिकण्याची संधी मिळाली.
लालजींनी १९३७ साली खाँसाहेबांचा विधिपूर्वक गंडा बांधला आणि त्यांच्या तबला शिक्षणाची सुरुवात झाली. लालजींचे हे शिक्षण चालू असतानाच खाँसाहेबांना रामपूरच्या नवाबांनी आपल्या दरबारात बोलावून घेतले, त्यामुळे लालजींचे तबला शिक्षण थांबले.
लालजींच्या सुदैवाने एका गायिकेच्या साथीसाठी ते दिल्ली आकाशवाणीवर गेले असता, त्यांची साथ ऐकून आकाशवाणीचे केंद्र निर्देशक फार खूश झाले. त्यांचे वय कमी असूनही त्यांना आकाशवाणीवर नोकरी दिली आणि लालजींना दिल्लीमध्ये राहण्याचा योग आला. तसेच, दिल्ली आणि रामपूर जवळजवळ असल्यामुळे लालजींचे खाँसाहेबांकडे शिक्षण चालू राहिले.
त्या काळी दिल्ली आकाशवाणीवर पुष्कळ वयस्क व अनुभवी तबलावादक नोकरी करत होते. पंजाब घराण्याचे उस्ताद मलंग खाँ, उस्ताद करीमबक्ष, तसेच अजराडा घराण्याचे उस्ताद हबीबुद्दिन खाँ या सर्वांच्या सहवासामुळे लालजींना पुष्कळ शिकायला मिळाले.
पं. लालजींनी पुण्यात १९४१ ते १९५१ अशी दहा वर्षे ‘प्रभात फिल्म कंपनी’मध्ये आणि नंतर दोन वर्षे ‘अत्रे पिक्चर्स’मध्ये नोकरी केली. नंतर त्यांनी परत दिल्ली आकाशवाणीची नोकरी स्वीकारली.
१९६२ च्या दरम्यान पं. लालजींची बदली मुंबई आकाशवाणीवर झाली. त्यानंतर १९७० साली त्यांची बदली पुणे आकाशवाणीवर झाली. पुणे आकाशवाणीवर २-३ वर्षे काम केल्यावर त्यांनी निवृत्ती घेतली.
पं. लालजी पुण्यात स्थायिक झाले. तिथेच लालजींनी शिष्यांना शिकवण्याचे काम सुरू केले.पं. लालजींकडे तबल्यातील सर्व घराण्यांच्या बंदिशींचा साठा होता, तो त्यांनी सर्व शिष्यांना मुक्त हस्ताने शिकवला. अवधूत मिराशी, दत्तात्रेय भावे, संजय फगरे इ. शिष्यांसह भाई गायतोंडे, शेषगिरी हनगल, सुधीर संसारे, रवींद्र यावगल अशा अन्यही तबलावादकांना त्यांचे मार्गदर्शन लाभले.
पं. लालजींनी कलाकाराची साथ करताना वाजवलेला ठेका सारखा ऐकत राहावा असा सौंदर्यपूर्ण असे. पं. लालजींनी त्या काळच्या दिग्गज कलाकारांची साथसंगत केली, त्यांपैकी काही नावे ः पं. कुमार गंधर्व, पं. रविशंकर, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. भीमसेन जोशी, श्रीमती माणिक वर्मा, श्रीमती हिराबाई बडोदेकर, व्हायोलिनवादक पं. एम.एस. गोपालकृष्णन इत्यादी. पं. गोपालकृष्णन यांच्याबरोबर १९७८ साली पं. लालजींनी युरोपचा दौराही केला. तबला साहित्याचे गहन अध्ययन आणि त्यांनी केलेले विद्यादान यांमुळे सन १९९७ मध्ये ‘संगीत नाटक अकादमी’ने त्या वर्षीचा तबल्यासाठी असलेला पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते पं. लालजींना देऊन सन्मानित केले.

भाई गायतोंडे

 

गोखले, मधुसूदन रघुनाथराव