Skip to main content
x

गोखले, महादेव गणेश

गायक, गुरू

 

       कोकणातील खोल या गावी (देवगड तालुका, जिल्हा रत्नागिरी, विजयदुर्गाजवळ) महादेव गणेश गोखले यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण गावीच गेले. ते बारा वर्षांचे असताना आजोबा तातंभट व त्यांच्या वडिलांत काही वाद झाल्याने ते गाव सोडून मिरजेस आले. बालवयातच कुशाग्र बुद्धी व देखण्या रूपामुळे मिरज संस्थानच्या सरकारी पंगतीत काही आर्या व श्लोक म्हणून त्यांनी वाहवा मिळवली. त्यांवर खूष होऊन तत्कालीन संस्थानिक श्रीमंतांनी त्यांस ठेवून घेतले व आपल्या मुलांबरोबरच शिक्षण देणे सुरू केले.

        गायनाचा नाद असल्याने मिरज संस्थानातील दरबारी धृपद गायकांकडून त्यांनी काही धृपद-धमार शिकून घेतले. एकदा मिरजेत झाईन उल अबदिन खाँ ऊर्फ बडे मियाँ (१७७२ - १८५७) या हैदराबाद स्थित गवैयाचे गाणे त्यांनी ऐकले व त्या ख्यालगायकीने प्रभावित होऊन त्यांनी ही गानविद्या मिळवण्यासाठी हैदराबादेस जाण्याचे ठरवले.

        त्यानुसार ते एका मित्रासह बैराग्यांच्या तांड्यासह हैदराबादेस जाऊ लागताच त्यांना श्रीमंतांनी स्वारांकरवी परत आणले. तेव्हा वडिलांनी त्यांना बडे मियाँचेच शिष्य व सातारचे दरबार गवई बापूबुवा बुधकर यांच्याकडे गायनाच्या शिक्षणासाठी पाठवले. तेथे त्यांना अंतूबुवा आपटे हे सहाध्यायी मिळाले.

         बुधकरबुवांपाशी सर्व विद्या मिळणार नाही हे ध्यानी येताच त्यांनी पुन्हा हैदराबादेस जाऊन बडे मियाँपाशीच शिकण्याचा निश्चय केला व अंतूबुवांसह वयाच्या पंधराव्या वर्षी ते चालत हैदराबादेस गेले. तेथे पेस्तनजीभाई या पारसी अधिकार्‍याने त्यांस आश्रय दिला व देवपूजेच्या वेळी गाण्याचे काम दिले. त्यांनी झाईन उल अबदिन खाँ ऊर्फ बडे मियाँ यांना गाणे शिकवण्याची विनंती केली, मात्र ते राजी झाले नाहीत. त्या काळात हैदराबाद संस्थानात निरनिराळ्या नऊ घराण्यांचे गायक होते, ‘त्यांच्याकडे शिका’ असे सांगून टाळले; मात्र या सार्‍या गवयांचे गायन ऐकूनही महादेव गोखल्यांनी खाँसाहेबांकडेच शिकण्याचा निश्चय सांगितला, तेव्हा खाँसाहेबांनी त्यांची परीक्षा घेतली व मगच त्यांना शिष्य म्हणून पत्करले.

         या शिष्यांच्या ग्रहणशक्ती व निदिध्यासावर प्रसन्न होऊन खाँसाहेबांनी त्यांना उत्तम रागविद्या दिली. त्यांना संतती नसल्याने आपल्या मुलांप्रमाणे त्यांची देखभाल केली, त्यांची लग्नेही लावून दिली. १८४९ च्या सुमारास विद्याभ्यास पूर्ण झाला असे खाँसाहेबांनी सांगितल्यावर अंतूबुवा महाराष्ट्रात परतले. मात्र महादेव गोखले गुरूंपाशीच थांबले. खाँसाहेबांनी त्यांस म्हटले, ‘‘तुमने विद्या बहुत पढ़ी, लेकिन अंधे हो, तुमको आँख देता हूँ।’’ गानविद्या आली, मात्र त्यास आवश्यक असणारी शास्त्रदृष्टी देण्यासाठी खाँसाहेबांनी महादेव गोखल्यांपुढे त्यांच्या घराण्यातील रागशास्त्राचे, २७ स्वरस्थानांनुसार केलेल्या रागवर्णनाच्या दोह्यांचे, बंदिशींचे खास बाड उघडे केले.

          बडे मियाँ हे सदारंगाचे शिष्य बहादूर खाँच्या अमीन खाँ या पुत्राचे शिष्य होते. ते प्राचीन हनुमत मत, त्यातील रागरागिणी पद्धतीस मानत असत व त्यांच्या परंपरेत षड्ज-पंचम या अचल स्वरांखेरीज चलस्वरांची अधकोमल, कोमल, शुद्ध, कमतीव्र, तीव्र, तरतीव्र अशी स्थाने मानली जात व त्यानुसार रागांत विशिष्ट स्वरस्थानांचा प्रयोग होत असे. ते रागलक्षणांची ग्रह-अंश-न्यास इ. नियमांची प्राचीन पद्धत  अनुसरत. त्यांनी आपल्या बाडात ही रागविद्या हिंदी दोह्यांच्या रूपांत जतन केली होती.

          महादेव गोखल्यांनी या बाडाद्वारे कंठस्थ केलेल्या रागविद्येचा शास्त्रीय पडताळा घेऊन ११० रागांचे वर्णन करणार्‍या या दोह्यांचे मराठी रूपांतर करून आर्या रचल्या, तसेच घराण्याच्या १२०० बंदिशीही बाडात लिहून ठेवल्या.

          मग महादेवबुवा गोखले महाराष्ट्रात परतले. प्रथम जमखिंडी संस्थानात त्यांना दरबार गायक म्हणून मानाचे स्थान मिळाले. नंतर त्यांनी मुंबईस प्रयाण केले. तेथे त्यांनी अनेक जलसे व शिकवण्या करून नावलौकिक मिळवला. म्हातारपणी कोल्हापूर संस्थानाचे कारभारी माधवराव बर्वे यांच्या सांगण्यावरून त्यांनी कोल्हापूरच्या देवीच्या मंदिरात गायनसेवा करण्याची नोकरी स्वीकारली. जयपूर घराण्याचे उ. अल्लादिया खाँसाहेबही महादेवबुवांना ‘बडे मियाँची गायकी गातात’ म्हणून मानत असत.

           महाराष्ट्रातील संस्थानांत त्या काळी मुख्यत: धृपदिये होते, मात्र ख्याल व टप्पा गायकी महादेवबुवांनी १८५०च्या सुमारास रुजवली. आपले चार पुत्र गणपतीबुवा (१८५१-१९१०), विष्णूबुवा, शिवरामबुवा व कृष्णबुवा यांस गायकीत तरबेज केले. याद्वारे मुळातील लखनौच्या झाईन उल अबदिन खाँ यांकडून मिळालेली गायकी महाराष्ट्रात ‘गोखले घराण्याची गायकी’ म्हणून प्रचारात आली.

           हे लक्षात ठेवले पाहिजे, की हा सारा इतिहास बाळकृष्णबुवांनी महाराष्ट्रात ग्वाल्हेर घराण्याची ख्यालगायकी आणण्यापूर्वीचा आहे. बाळकृष्णबुवांनी महाराष्ट्रात ग्वाल्हेरची गायकी आणली हे खरे असले, तरी येथे ख्यालगायकी आणण्याच्या आद्यतेचा मान आधी बुधकरबुवा व नंतर गोखले घराण्याकडे जातो. गोखले घराण्याने ख्यालगायकी महाराष्ट्रात आणली खरी; पण ती मुख्यत: संस्थानिकांच्या दरबारांतच सीमित राहिली, उलट बाळकृष्णबुवांचे खरे श्रेय ग्वाल्हेर प्रणीत ख्यालगायकी आपल्या विशाल शिष्यसंप्रदायाद्वारे लोकप्रिय करण्याचे आहे.

            वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी महादेवबुवा गोखले यांचे निधन झाले. महादेवबुवांच्या पश्चात गणपतीबुवा व नंतर त्यांचे पुत्र सदाशिवबुवा हे कोल्हापूरचे दरबार गायक होते. गणपतीबुवांनी भिकाजी लक्ष्मण लिमये व चंदा नायकीण यांनाही तयार केले. सदाशिवबुवांचे पुत्र माधवबुवा हे मुंबईत होते व तेथे त्यांची गायनशाळा होती.

             महादेवबुवांचे दुसरे पुत्र विष्णूबुवा हे तर कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांचे गायन शिक्षक होते. नाट्याचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर हे विष्णूबुवांचे स्नेही होते व त्यांनी भाऊराव कोल्हटकरांना काही काळ शिकवले, त्याद्वारे गोखले घराण्यातील काही बंदिशी नाट्यगीतांच्या रूपाने मराठी संगीत नाटकांत प्रचलित झाल्या.

              महादेवबुवांचे तिसरे पुत्र शिवरामबुवा हे मिरज संस्थानात गायक होते. चौथे पुत्र कृष्णबुवा हे मुंबईस होते. त्यांनी पं. भातखंडे यांस काही बंदिशी दिल्या होत्या, ज्या अप्रसिद्ध राहिल्या. कृष्णबुवांनी फिलहार्मोनिक सोसायटीच्या क्लेमंट्स यांनाही आपल्या घराण्यातील २७ स्वरस्थानांची व खास ६९ रागांची माहिती दिली होती. कृष्णबुवांचे पुत्र विश्वनाथबुवा हेही गायक होते व त्यांनी धारवाडच्या एल्फिन्स्टन कॉलेजचे प्राचार्य गणेश भास्कर जठार यांना शिकवले. जठार व खुद्द सदाशिवबुवांकडून केशव इंगळे यांस या घराण्यातील चिजा मिळाल्या.

            गोखले घराण्यातील बंदिशी व आर्या केशवबुवा इंगळे यांनी ‘गोखले घराने की गायकी’ या ग्रंथाद्वारे (१९३५) प्रकाशित केल्या. मात्र, या ग्रंथात काही चुका राहिल्याने माधवबुवा गोखले यांनी ‘गोखले घराने की गायकी — माधवबुवा गोखले यांची कैफियत’ असे पुस्तक प्रकाशित केले होते. नंतर बी.आर. देवधर यांनीही सदाशिवबुवांकडून या घराण्याच्या बंदिशी मिळवल्या होत्या.

— चैतन्य कुंटे

गोखले, महादेव गणेश