Skip to main content
x

गोखले, शरच्चंद्र विष्णू

       रच्चंद्र विष्णू गोखले यांचा जन्म पुण्यात ललितकलांवर प्रेम करणार्‍या गोखले कुटुंबात झाला. त्यांचे कनिष्ठ बंधू अरविंद गोखले हे कथाकार, तर दुसरे बंधू डॉक्टर, असे हे प्रज्ञावान कुटुंब. नूतन मराठी विद्यालय, पुणे येथे शालेय शिक्षण आणि सर परशुराम महाविद्यालयातून इंटर झाल्यावर त्यांनी अभियांत्रिकी महाविद्याल-यामधून बी.ई. ही पदवी मिळवली. मुंबईतील ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ येथून त्यांनी एम.एस्सी. ची पदवी प्राप्त केली. तीक्ष्ण बुद्धिमत्ता असणार्‍या शरच्चंद्र गोखल्यांनी प्रायोगिक भौतिक विज्ञान व अभियांत्रिकी या दोन्ही विषयांत पीएच.डी. मिळवली, हेही विशेष आहे.

        कानपूरच्या ‘डिफेन्स कॉलेज’ येथे तीन वर्षे, इंदूर येथील ‘डेली कॉलेज’ येथे तीन वर्षे व जर्मनी येथे ‘जाइस’ कंपनीत १९५० ते १९५३ या काळात त्यांचे कामानिमित्त वास्तव्य होते. नंतर मुंबईतील रुइया महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. विविध भाषांचे व व्युत्पत्तिशास्त्राचेही ते जाणकार होते. १९२९ ते १९४० या काळात मराठीतील ‘सृष्टिज्ञान’ या मासिकासाठी त्यांनी विज्ञानविषयक लेखन केले.

         लहानपणी भास्करबुवा बखले यांचे शिष्य दत्तोबा बागलकोटकरबुवा यांच्याकडे त्यांनी गायनाचे धडे घेेतले. गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर व उ. अल्लादिया खाँसारख्या दिग्गजांचे गायन जवळून ऐकण्याचे भाग्यही त्यांना लाभले. गुलाम जाफरखाँ, मुनीरखाँ व बुंदूखाँ यांच्यासारख्या मातब्बर सारंगीनवाजांकडून गंडाबद्ध शागीर्द म्हणून ते सारंगीही शिकले. रामकृष्णबुवा वझे, मास्तर कृष्णराव, बाबुखाँ बीनकार अशा अनेक गायक-वादकांच्या सहवासांतून त्यांनी संगीताचे मर्म समजून घेतले व आपल्या चिकित्सक बुद्धीने त्याचे विश्लेषण केले. इंदूरच्या वास्तव्यात डागरांकडून ते धृपदही शिकले. तबला व  संवादिनी (हार्मोनिअम) या वाद्यांचीही त्यांनी मेहनत केली होती.

         तंबोर्‍यातील अंतर्नाद, श्रुतिस्वर आणि अठ्ठेचाळीस सुरांची पेटी यांबद्दल त्यांनी संशोधन केले होते. पुरातत्त्व विभागातर्फे विजापूरच्या गोलघुमटाचे नाददृष्ट्या विश्लेषण करण्याच्या प्रकल्पातही त्यांचा वाटा होता. 

         तीस वर्षांच्या सखोल चिंतनातून ‘लयतालविचार’ (महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, १९७९, मुंबई) या ग्रंथराजाची सिद्धता डॉ.  गोखले यांनी केली होती. ८२६ पृष्ठांचा हा ग्रंथ म्हणजे मराठी भाषेतील संगीतविषयक लेखनासाठी एक मोठे योगदान आहे. एकूण १८ प्रकरणे, २ अनुबंध व २ परिशिष्टे यांत लयकल्पना, तालकल्पना, यतिकल्पना, लयपरिमाण, अंगकल्पना व अंगप्रमाणे, स्वरांग व तालांगांद्वारे लयांगसाधना, ग्रह, आवर्तन, जाती व खंड, प्रस्तार, तालवाद्ये, प्रचलित व अप्रचलित ठेके, द्रविड तालपद्धती अशा विषयांच्या तळांपर्यंत जाऊन डॉ. श.वि. गोखले यांनी सखोल विश्लेषण केले. डॉ. गोखले यांनी वैज्ञानिक तर्कभूमिकेवरून भारतीय परंपरेचे अनेकांगी अवलोकन केले. सामसंगीतापासून प्रचलित संगीतापर्यंतच्या कित्येक विचारांचा व क्रियांचा सोदाहरण अन्वय लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि इतिहासालाही प्रामाण्यविवेक लावला. 

         यात ध्वनिविज्ञान, श्रवणक्रियाविचार, प्रमाणभाषा व बोलीभाषा यांतील भेदविचार, फारसी छंदशास्त्र, द्रविड तालपद्धती, पाश्चिमात्य संगीतातील ‘पॉलिफोनी’, ‘हार्मनी’, ‘डायनॅमिक्स’ व ‘र्‍हिदम’ अशा कित्येक संबंधित विषयांतील आवश्यक तेवढी माहिती दिली असून तुलनात्मक विवरणही केले आहे.

          ह.वि. मोटे संपादित ‘विश्रब्ध शारदा’च्या दुसर्‍या खंडाच्या ‘महाराष्ट्रातील संगीत’ या विभागासाठी डॉ. गोखले यांनी विस्तृत व मार्मिक टिपा लिहिल्या आहेत. (ह.वि. मोटे प्रकाशन, १९७५, मुंबई) त्यातील दीर्घ विषयप्रवेशात ते महाराष्ट्राच्या संगीत इतिहासाचे विस्तृत चित्रण करतात. अनेक कलाकारांचे कमी शब्दांत, तरीही नेमके चित्रण व जाणते मूल्यमापनही त्यांनी केले आहे.

          ‘माझा संगीत व्यासंग’ (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ; १९८४, मुंबई) या गोविंदराव टेंबे यांच्या ग्रंथाच्या दुसर्‍या आवृत्तीसाठी गोखले यांनी काही महत्त्वपूर्ण टिपणे लिहिली. सुमारे बत्तीस व्यक्ती वा संस्थांवर माहितीपूर्ण लिहून त्यांनी अनेक संदर्भांना उजाळा दिला. ‘गोदातटीचे कैलासलेणे’ या नरहर कुरुंदकरांच्या साहित्यकृतीवरील ग्रंथात श.वि. गोखल्यांचा ८९ पानी लेख आहे, तसेच कुरुंदकरांच्या ‘भारतीय संगीत : एक आढावा’ या लेखावरचे त्यांचे प्रदीर्घ समीक्षण म्हणजे आदर्श समीक्षेचा वस्तुपाठच आहे.

            कोणतेही विधान करताना त्याची तर्कशुद्धता व सत्यासत्यता पारखणे याबद्दल ते आग्रही व परखड होते. त्यांच्या स्वभावाप्रमाणेच त्यांच्या लेखनातही शिस्त व काटेकोरपणा दिसून येतो. त्यांच्या कलेस विज्ञानाची जोड लाभल्याने कोणत्याही गोष्टींचे विश्लेषण करताना त्यांतील कलास्वादही त्यांनी महत्त्वाचा मानला; त्यामुळे त्यांचे लेखन नीरस झालेले नाही. डॉ. शरच्चंद्र गोखले यांच्या मराठी संगीतशास्त्रातील लेखनासाठीच्या बहुमोल योगदानाबद्दल त्यांना १९९७ साली महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘मास्तर कृष्णराव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे मुंबई येथे निधन झाले.

           — चैतन्य कुंटे

गोखले, शरच्चंद्र विष्णू