Skip to main content
x

गोळे, पद्मावती विष्णू

पद्मा

     पूर्वाश्रमीच्या पद्मावती परशुराम पटवर्धन म्हणजेच कवयित्री पद्मा गोळे ह्यांचा जन्म तासगाव येथे झाला. लेखनाची सुरुवात शाळेत असताना नाटकापासून झाली. पुढील आयुष्यात मात्र सातत्याने काव्यलेखन केले. ‘प्रीतिपथावर’ (१९४७), ‘नीहार’ (१९५४), ‘स्वप्नजा’ (१९६२), ‘आकाशवेडी’ (१९६८), व ‘श्रावणमेघ’ (१९८८) हे काव्यसंग्रह ‘नवी जाणीव’, ‘रायगडावरील एक रात्र’, ‘एक स्वप्न’ या नाटिका; आणि ‘वाळवंटातील वाट’ (सामूहिक लेखन १९७०) ही कादंबरी; अशी लेखनसंपदा त्यांच्या नावावर जमा आहे.

     निसर्गातील प्रतिमांचा वापर करत प्रेमातील उत्कटता, स्वप्नाळूपणा, असफल प्रेमातील आर्तता नि समजूतदारपणा त्यांच्या कवितांमधून व्यक्त होतो. घराची सुरक्षित चौकट त्यांना हवी आहे, पण घरात जखडून ठेवणारी बंधने नको आहेत; हे सांगताना त्या म्हणतात, ‘हवे मला प्रिय गृहमंदिर, नको परी ती बंदिशाला’ (प्रीतिपथावर). पुराणकथांमधून उभ्या केलेल्या आदर्शाविषयी त्यांना अभिमान आहे, पण त्यांतील यथार्थता तपासून पाहायची त्यांची कुवत आहे. ‘परी कधी हे पुरुषा! अदया! रामस्वरूपी तुला बघावे, भूमिगता सीताच होउनी, एकाकीपणि तुज रडवावे’ असे लिहिणाऱ्या पद्माताई ‘नाही मी नुसती नार, पेजेसाठी लाचार, शेजेसाठी आसुसणार, नाही मी नुसती मादी मी माणूस माणूस आधी’ (नीहार) असेही निःसंदिग्धपणे सांगतात.

     अर्थार्जनासाठी बाहेर पडलेल्या स्त्रीची होणारी कोंडी आणि घुसमट सांगताना पुराणकथेचा वापर कल्पकतेने करतात. ‘आमच्यापुढे दाही दिशा लक्ष्मणरेषा, ओलांडाव्याच लागतात, रावणांना सामोरी जावेच लागते! एवढेच कमी असते. कुशीत घेत नाही भुई दुभंगून!’ (आकाशवेडी). सुरुवातीला आत्ममग्न असलेली त्यांची कविता स्त्री-जीवनातील वेदना नेमकेपणाने समजून घेते. ‘आताशी मी नसतेच इथे, तशी माझी ये जा असली तरी’ (आकाशवेडी) असे म्हणत स्वविषयी अधिक खोलवर जाऊन विचार करताना माणसाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याइतकी त्यांची कविता परिपक्व होते. ‘नीहार’ व ‘स्वप्नजा’ या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला.

- मृणालिनी चितळे

गोळे, पद्मावती विष्णू