Skip to main content
x

गोयंका, सत्यनारायण

      त्यनारायण गोयंका यांचा जन्म ब्रह्मदेशातील (सध्याचे म्यानमार) एका मारवाडी आई-बापाच्या पोटी झाला. मारवाडी लोक व्यवसायासाठी प्रसिद्ध आहेत. गोयंका यांच्या अंगी ते गुण आनुवंशिकतेने आले. ते अत्यंत सनातनी अशा हिंदू परिवारामध्ये वाढले. व्यापारामध्ये त्यांनी पुष्कळ धन मिळविले. पैशांच्या मागे लागता लागता १९५५ साली, म्हणजे वयाच्या एकतिसाव्या वर्षी त्यांना मायग्रेन नामक डोकेदुखीने ग्रसले. अनेक वैद्यकीय उपचार करूनही गुण येईना. शेवटी एका मित्राच्या सूचनेनुसार ते विपश्यना ध्यान- साधनेचे सुप्रसिद्ध शिक्षक सायागयी यू.बा.खिन यांना भेटले. त्यांना आपला शिष्य म्हणून घ्यायची त्यांनी विनंती केली. सुरुवातीला बा.खिन यांनी प्रतिसाद दिला नाही. पण त्यांची चिकाटी पाहून त्यांनी गोयकांना शिष्य म्हणून स्वीकारले. त्यांना विपश्यना ध्यान-साधनेचे चौदा वर्षे प्रशिक्षण दिले. गोयंका हे  विपश्यना ध्यान-साधनेमध्ये पारंगत झाले. गुरूंचा आशीर्वाद घेऊन व आपला व्यवसाय कुटुंबियांच्या स्वाधीन करून ते १९६९ साली ब्रह्मदेशातून भारतात येऊन स्थायिक झाले.

     भारतात आल्यानंतर सत्यनारायण गोयंका यांनी विपश्यना ध्यान-साधना म्हणजेच आत्मकेंद्रित ध्यानाच्या अध्यापनास सुरुवात केली. त्यांच्या या उपक्रमास चांगलाच प्रतिसाद मिळाला. १९७६ साली त्यांनी महाराष्ट्रातील नाशिकजवळील इगतपुरी येथे ‘विपश्यना ध्यानसाधना आंतरराष्ट्रीय अकादमी’ नावाचे पहिले ध्यान केंद्र सुरू केले. इगतपुरी येथील हे ध्यान केंद्र ‘धम्म गिरी’ या नावानेदेखील ओळखले जाते. गोयंका यांनी शिक्षकांना ध्यानाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केल्यानंतर १९८२ सालापर्यंत त्यांनी विपश्यना केंद्राचे प्राचार्य म्हणून काम केले. पुढे त्यांनी १९८५ साली इगतपुरी येथे विपश्यना संशोधन संस्थेची स्थापना केली.

     कालांतराने गोयंका यांनी इगतपुरी येथील केंद्रात दहा दिवसांची निवासी ध्यान शिबिरे सुरू केली. त्यांच्या या उपक्रमास भरघोस यश मिळाले. १९८८ सालापर्यंत त्यांनी असंख्य शिबिरार्थ्यांना ध्यानाचे प्रशिक्षण दिले. हजारो पाश्चिमात्य लोकांनी ध्यानाचे प्रशिक्षण घेतले.

     सध्या जगातील ९४ देशांमध्ये त्यांची २२७ ध्यान केंद्रे कार्यरत आहेत. त्यांतील १२० ध्यानकेंद्रे कायमस्वरूपी आहेत. ध्यानकेंद्रे कार्यरत असलेल्या देशांमध्ये अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फ्रान्स, इंग्लंड, जपान, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार आणि थायलंड या देशांचा समावेश आहे. या जागतिक २२७ ध्यान केंद्रांमध्ये भारतातील ५६ केंद्रांचा समावेश आहे.

     सत्यनारायण गोयंका यांनी २००० साली मुंबई येथील गोराई बीचजवळ ३२५ फूट उंचीच्या जागतिक विपश्यना पागोडाची सुरुवात केली. २००९ साली ते सर्वांसाठी खुले करण्यात आले. त्यामध्ये बुद्धाची भव्य मूर्ती व ध्यानासाठी विशाल सभागृह  आहे. हा पागोडा त्यांनी आपल्या गुरूला अर्पण केला होता. ते या विपश्यना केंद्राला भेट देणार होते; पण पारपत्र न मिळाल्यामुळे ते येऊ शकले नाहीत.

     सत्यनारायण गोयंका हे एक प्रभावी वक्ते होते. ते उत्तम लेखक व प्रतिभासंपन्न कवीदेखील होते. त्यांनी इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये साहित्यनिर्मिती केली आहे. त्यांनी जगातील अनेक देशांना भेटी देऊन तेथील श्रोत्यांसमोर आपले विचार अत्यंत प्रभावीपणे मांडले. विशेषत: त्यांनी दाओस येथील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये केलेले भाषण व ऑगस्ट २००० मध्ये युनायटेड नेशन्स येथे आयोजित केलेल्या ‘मिलेनिअम वर्ल्ड पीस समिट’मधील केलेले भाषण, ही दोन्ही भाषणे अतिशय गाजली. २००२ साली त्यांनी नॉर्थ अमेरिकेमध्ये दौरा काढून चार महिन्यांच्या वास्तव्यात तेथील लोकांना ध्यानाचे महत्त्व पटवून दिले.

     गोयंका यांची दहा दिवसांची विपश्यना ध्यान - साधनेची शिबिरे जगभरात निरनिराळ्या ठिकाणी अत्यंत प्रभावी ठरली. शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी मानसिक शांतता आणि कडक नैतिक मूल्यांचे पालन यांचे तंत्र आत्मसात केले. विपश्यना शिबिरात मनाची एकाग्रता भंग होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना बाहेरील लोकांशी संपर्क ठेवण्यास मनाई होती. परंतु एखाद्या तंत्राबद्दल प्रश्न उपस्थित झाला तर साहाय्यक शिक्षक किंवा विद्यार्थी व्यवस्थापकांमार्फत शंकानिरसन करून घ्यायची त्यांना मुभा होती. श्वास रोखून मनाची नैसर्गिक एकाग्रता साधण्याच्या क्रियेला ‘अनापना’ असे म्हणतात. मनाच्या एकाग्रतेमुळे साधकाच्या मनावर व शरीरावर नियंत्रण राहिल्यामुळे त्याला वर्तमानाचा विसर पडतो. या विपश्यना ध्यान-साधनेच्या अभ्यासामुळे साधकाच्या शरीराचे सूक्ष्म परीक्षण होऊन त्याच्यात आंतर-बाह्य बदल घडून येतो. त्याच्या मनाची चंचलता दूर होऊन तो मनाने खंबीर बनतो. त्याची निर्णयक्षमता वाढते. योग्य निर्णय घेतल्यामुळे तो जीवनात यशस्वी होतो.

     सत्यनारायण गोयंका यांनी सांगितले आहे की, ‘‘विपश्यना ध्यानसाधनेचा अभ्यास हा धर्म व सत्य यांप्रती येणारा एकमेव राजमार्ग आहे. तो वैश्विक व सर्वमान्य मार्ग आहे. भगवान बुद्धाने सांगितलेला, ब्रह्मदेशामध्ये असताना माझे गुरू यू.बा.खिन यांनी मला शिकविलेला हा खात्रीलायक मार्ग मी गुरु-शिष्य परंपरेनुसार आपणांस सांगत आहे.’’

     सत्यनारायण गोयंका यांनी आपल्या शिबिरांमधून व भाषणांतून सांगितलेला विपश्यना ध्यानसाधनेचा मार्ग हा मनोविकारांच्या शास्त्रीय संशोधनातून निष्पन्न झालेला खात्रीलायक मार्ग आहे.

     गोयंका विद्यार्थ्यांना आपल्या अध्यापनातील तात्त्विक मुद्दे विचारात घेण्याबाबत पाचारण करीत व त्यांतील दोष शोधण्याचा सल्ला देत. अमरत्व प्राप्त करणे हे या तंत्राचे ध्येय आहे, असे ते विद्यार्थ्यांना वारंवार सांगत. १९८३ साली प्रकाशित झालेल्या विपश्यना जर्नलच्या दुसऱ्या आवृत्तीतील पृष्ठ क्र. २९ वरील ‘Let Us Talk Sense’ या लेखात बुद्धाचा संदर्भ देऊन ते म्हणतात, ‘विश्वास गमावलेल्या व अमरत्वाकडे कानाडोळा करणाऱ्यांनो , अमरत्व प्राप्तीसाठी आपले दरवाजे उघडा.’

    गोयंका हे  विपश्यना ध्यानधारणा संस्थांना आंतरजाल सुविधेच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत व थेअरी (Theory) बद्दल सांगत. त्याचप्रमाणे, विपश्यना तंत्राद्वारे आपण अमरत्वप्राप्ती या ध्येयाप्रत पोहोचू असे दाखवून देत. कामवासना ही जन्मोजन्मी तुम्हांला तीव्र संघर्ष करायला लावते. म्हणून जेव्हा तुमच्या मनात कामवासना निर्माण होते, तेव्हा वासना ही वासनाच राहू द्या, तिला आपल्या ध्येयावर मात करू देऊ नका. कारण कामवासना ही कायमस्वरूपी नसते. क्षणभंगुर असते. तिला तुमच्या मनावर मात करू देऊ नका; म्हणजे ती कमजोर होऊन, तिची तीव्रता कमी होऊन ती निघून जाते. गोयंकांच्या मते, जन्म, मृत्यू व पुनर्जन्म ही जी साखळी आहे, तिच्यातून मुक्त होऊन अमरत्व प्राप्त करणे हे आपल्या विपश्यना ध्यान-साधना तंत्राचे ध्येय आहे. आचार्य सत्यनारायण गोयंका यांनी विपश्यना संस्थेच्या प्रसारित केलेल्या संकेतस्थळावरील एका लेखात ते म्हणतात, ‘कोणत्याही जाती, धर्म व वर्गाची व्यक्ती चारित्र्य संवर्धन, मनोनिग्रह व अनुभवसिद्ध शहाणपण यांचा उपयोग करून धर्माचरण करीत असेल, तर त्या व्यक्तीने मुक्तीच्या चार अवस्था पार केल्यामुळे त्याला ‘आर्य’ म्हणून संबोधिले जाईल. त्याच्या या अवस्थेला  ‘सोतापन्ना’ असे म्हणतात. त्याला जन्म - मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्ती मिळते. विपश्यना ध्यान-धारणेच्या सरावामुळे त्याच्यातील ‘माझे मन’, ‘माझे शरीर’, ‘मी’, ‘माझे’ हा अहंभाव नष्ट होऊन तो ‘अरहत’ या उच्चपदाला प्राप्त होईल. तो सुख-दु:ख, जन्म-मृत्यू यांच्या फेऱ्यातून  मुक्त होऊन मोक्षपदाला प्राप्त होईल.’

     गोयंका यांनी संपूर्ण जगात दहा दिवसांची विपश्यना ध्यान-धारणा शिबिरे भरवून विपश्यना ध्यानसाधनेचा प्रसार केला. ध्यानसाधनेच्या ‘धर्म’ या संकेतस्थळावर आंतरजाल सुविधा वापरून नोंद करण्याची सोय होती. शिबिराला येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शुल्क,निवास व भोजनासाठी पैसे घेतले जात नव्हते. पुढील अभ्यासक्रमासाठी येणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक देणगी घेतली जाई.

     या विपश्यना ध्यान-साधना केंद्रांतून शिक्षणार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती. गोयंका यांनी हे सर्व शिक्षण विशिष्ट धर्माकडे किंवा संप्रदायाकडे झुकणार नाही याची काळजी घेतली. त्यांनी लोककल्याणाला अधिक प्राधान्य दिले. दहा दिवसांच्या विपश्यना ध्यान-साधना शिबिरामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून कडक शिस्तीचे पालन करून त्यांच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष दिले.

     मानसिक संतुलन बिघडलेले लोकही आपल्या मानसिक असंतुलनाचा त्रास कमी व्हावा म्हणून अधूनमधून विपश्यना ध्यान-साधनेच्या दहा दिवसांच्या शिबिरात दाखल होत. या लोकांची मदत संस्थेचे लोक व्यापारीवृत्तीने न करता सेवाभावनेने करीत. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत. विपश्यना ध्यान-साधनेचा फायदा बऱ्याच लोकांना होई. परंतु,ती ध्यान-साधना वैद्यकीय इलाज किंवा मनोरुग्णांना पर्याय म्हणून नव्हती.

     विपश्यना संशोधन संस्थेत विपश्यना ध्यानसाधनेवर संशोधन व त्याचा परिणाम यांबाबत साहित्य प्रकाशित होऊन थिअरी व प्रॅक्टिस म्हणजे तत्व आणि प्रत्यक्ष कृती  यांनी हातात हात घालून काम केले पाहिजे, असा गोयंका यांचे मत होते. विपश्यना संशोधन संस्थेत पाली भाषेतील ग्रंथांचा अनुवाद करणे व त्यांचे प्रकाशन करणे, त्याबरोबरच रोजच्या जीवनात त्याचे आचरण करणे, या दोन गोष्टींवर भर होता.

    गोयंका यांनी तुरुंगातील कैद्यांसाठी विपश्यना ध्यान- साधना सुरू केली. हा प्रयोग त्यांनी प्रथम भारतात व नंतर अन्य देशांत केला. संस्थेने सुरू केलेल्या दहा दिवसांच्या विपश्यना ध्यान-साधनेचा जवळजवळ १०,००० कैदी, अनेक पोलीस व मिलिटरीच्या लोकांनी लाभ घेतला. १९७३ साली दिल्लीच्या इन्स्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन किरण बेदी यांनी प्रथम जेलच्या गार्ड्सना विपश्यना ध्यानसाधनेचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर गोयंका यांनी १००० कैद्यांना प्रशिक्षण दिले.

     २००७ साली बेसेमर येथील ‘डोनाल्सन करेक्शनल फॅसिलिटी’ या अलाबामा येथील विपश्यना ध्यान-साधनेवर आधारित ‘धर्म-बंधू’ हा माहितीपर लघु चित्रपट प्रकाशित केला. चार खुनी कैद्यांवर आधारित हा लघु चित्रपट होता. यामध्ये तुरुंगातील संरक्षक, अधिकारी, कैदी आणि स्थानिक रहिवाशी यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

प्रा. नीलकंठ पालेकर

गोयंका, सत्यनारायण