Skip to main content
x

गुरव, कृष्णा एकनाथ

         कृष्णा एकनाथ गुरव यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कवठेएकंद या गावी झाला. दि. ६ फेब्रुवारी १९५७ रोजी त्यांनी सैन्यदलात प्रवेश केला व मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये हवालदार म्हणून सेवा करण्यास सुरुवात केली. १९७१ च्या पाकिस्तान युद्धात त्यांच्याकडे मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या मध्यम पल्ल्याच्या मशीनगन तुकडीचा अधिकारी म्हणून जबाबदारी होती. पूर्व भागात शत्रूला रोखण्यासाठी त्यांनी रस्त्यात एक अडथळाउभा केला होता. दि. १० डिसेंबर १९७१ रोजी शत्रूसैन्याने मोठ्या संख्याने व ताकदीने या मोर्च्यावर हल्ला केला. हवालदार गुरव यांनी निकराचा व अचूक मारा करत हा हल्ला परतवून लावला.
    यानंतर शत्रूसैन्याने नवीन व्यूहरचनेत एकत्र जमून मशीनगन नसलेल्या बाजूने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. हवालदार गुरव यांनी स्वतःच्या जिवाची अजिबात पर्वा न करता आपल्या मशिनगनचा मोर्चा वळवून उघड्या बाजूवर आणला व शत्रूचा हा डावही हाणून पाडला. या प्रयत्नातून शत्रूचे ७७ जवान मृत्युमुखी पडले. याच चकमकीदरम्यान हवालदार कृष्णा गुरव यांनी असामान्य धैर्य, निष्ठा व  कौशल्याचे दर्शन घडवले. याचसाठी त्यांना दि. ११ डिसेंबर १९७१ रोजी ‘वीरचक्र’ देऊन सन्मानित करण्यात आले.
-संपादित

गुरव, कृष्णा एकनाथ