Skip to main content
x

घाडगे, यशवंत बाळाजी­­­

           शवंत बाळाजी घाडगे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात पळसगाव-आंब्रेची वाडी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव विठाबाई होते. वडील बाळाजीराव हे गरीब शेतकरी होते. या जोडप्याला दोन मुले व चार मुली अशी सहा अपत्ये होती. यशवंत अवघ्या तीन महिन्यांचा होतो न होतो, तोच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे निधन होण्यापूर्वी यशवंतचा मोठा भाऊ वामन हा सैन्यात भरती झाला होता. त्यामुळे त्याचा तुटपुंजा पगार हाच या कुटुंबाचा आधार होता.

कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी विठाबाईंना शेतात काम करावे लागले व मोलमजुरी करावी लागली. यशवंतने शिकून पुढे चांगले नाव कमवावे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे यशवंतला त्यांनी पळसगावच्या मराठी शाळेत घातले. वयाच्या अकराव्या वर्षी यशवंत मराठी चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाला. उच्च शिक्षणासाठी शहरात जाणे हे गरिबीमुळे अशक्य होते. त्यामुळे यशवंत लोकांच्या शेतांवर मोलमजुरी करू लागला.

सहा वर्षांनंतर थोरला भाऊ वामन निवृत्त होऊन गावी परतला, तेव्हा आपणही भावाप्रमाणे सैन्यात जावे असे यशवंतला वाटू लागले. तसा त्याला लाठी, बोथाटी व दांडपट्टा फिरवणे व कसरत करण्याची आवड होती. त्याची शरीरयष्टी सडपातळ, काटक आणि मजबूत होती. मात्र यशवंतने सैन्यात जावे असे विठाबाईला वाटत नव्हते. पण वामनचा आग्रह व यशवंतचा निग्रह यांमुळे विठाबाईचा नाइलाज झाला. यशवंतने लग्न केल्यास आपण त्याला सैन्यात जाण्यास परवानगी देऊ अशी अट विठाबाईने घातल्यामुळे यशवंतला लग्न करावे लागले. पाटणूसच्या पांडुरंग महामुणकरांची कन्या लक्ष्मीबाई हिच्याशी त्याचा विवाह झाला. दुसर्‍या महायुद्धाचे वारे वाहू लागल्यावर सैन्यात भरती सुरू झाली. तेव्हा १९३८ साली यशवंत घाडगे पाचव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये साधे शिपाई म्हणून दाखल झाले. त्यांनी कडक सैनिकी प्रशिक्षण घेऊन आपल्यावर सोपविलेल्या लहानमोठ्या कामगिर्‍या व विशेष अवघड जबाबदार्‍या अतिशय कौशल्याने व तत्परतेने पार पाडल्या. त्यांच्या अंगभूत गुणांमुळे त्यांना लवकरच नाईक पदावर बढती मिळाली.

दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिश फौजांसोबत लढण्यासाठी पाचव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीला इटलीत पाठविण्यात आले. तेथे ब्रिटिश फौजेला इटली व जर्मनीच्या फौजेशी लढायचे होते. १० जुलै १९४४ रोजी जर्मन सैन्याच्या एका तुकडीसोबत नाईक यशवंतरावांच्या सैन्याची गाठ पडली. दोन्ही बाजूंनी बंदुका, टॉमीगन्स, तोफा धडधडू लागल्या.

शत्रूच्या ताब्यात असलेले ठाणे जिंकून घेण्याच्या ईर्ष्येने मराठा पलटण पुढे सरकत होती. यशवंत घाडगे यांनी हातबाँब फेकून शत्रूची मशीनगन बंद पाडली. ठाण्याचे रक्षण करणारे अनेक जर्मन सैनिक त्यांनी यमसदनी पाठविले. आपल्याच कैफात घाडगे पुढे सरकत चालले होते.

अचानक आपल्याकडील काडतुसे व हातबाँब यांचा साठा संपल्याचे त्यांच्या लक्षात आले. आता ते ठाण्याच्या अगदी जवळ आले होते. त्यांनी मग मागचापुढचा विचार न करता आपली बंदूक उलट धरून शत्रूच्या सैनिकांवर झेप घेतली. बंदुकीच्या दस्त्याने हाणामारी करून ते शत्रुसैनिकांना लोळवू लागले. त्यांचा त्वेष पाहून शत्रुसैनिक माघारी पळू लागले. त्यांच्या पलटणीने शर्थ करून ते ठाणे काबीज केले.

आपला विजय झाल्याचे लक्षात आल्यावर घाडगे यांनी क्षणभर थांबून मोकळा श्वास घेतला. त्यांचा संपूर्ण देह रक्ताने न्हाला होता. ते शांतपणे उभे राहिल्याचे पाहून जवळच्याच खंदकात लपलेल्या एका जर्मन सैनिकाने संधी साधून त्यांच्यावर गोळी झाडली. या गोळीने अचूक वेध घेतला व घाडगे खाली कोसळले. क्षणार्धात त्यांची प्राणज्योत मावळली.

ब्रिटिश सरकारला त्यांच्या या पराक्रमाची दखल घ्यावी लागली. लाल किल्ल्यासमोरील मैदानात भरलेल्या दरबारात त्यांना व्हिक्टोरिया क्रॉसहा सर्वोच्च सन्मान मरणोत्तर प्रदान करण्यात आला. व्हाइसरॉय आणि गव्हर्नर जनरल फील्ड मार्शल लॉर्ड वेव्हेल यांच्या हस्ते घाडगे यांच्या वीरपत्नी लक्ष्मीबाईंना हे मानाचे पदक प्रदान करण्यात आले.

नाईक यशवंतराव घाडगे यांच्या स्मरणार्थ माणगावच्या मामलेदार कचेरीजवळ त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. तेथे दरवर्षी ९ जानेवारीला घाडगे महोत्सवसाजरा करण्यात येतो.

- डॉ.शुभलक्ष्मी मा.जोशी

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].