Skip to main content
x

घारड, मधुकर दमडुजी

     धुकर दमडुजी घारड यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील (आताचा पारशिवणी तालुका) पारडी (वलनी) या लहानशा गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर ७वीपर्यंतचे शिक्षण दहेगाव येथे झाले. त्यानंतर त्यांनी ८वीचे शिक्षण सावनेर येथे बहिणीकडे राहून, तर ९वीपासून पदव्युत्तर शिक्षण नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गणेशपेठ येथील आश्रमात राहून घेतले.

अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या घारड यांनी  वर्तमानपत्राच्या कार्यालयात नोकरी करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांना १९८०मध्ये अर्थ व सांख्यिकी खात्यात नोकरी लागली. सोबत वृत्तपत्रीय काम निवासी संपादक म्हणून सुरूच होते. अकोला  व त्यानंतर अमरावती येथे १९८३मध्ये ‘इंद्रपुरी समाचार’चे संपादक म्हणून काम सुरू असताना त्यांचा वनराईचे मोहन धारिया यांच्याशी  संपर्क आला. तेव्हा घारड वनराईच्या चळवळीत सामील झाले. अमरावती येथे १९९०-१९९१मध्ये वनराई मित्रमंडळाची स्थापना झाली. घारड यांनी १९९०पासून अमरावती जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण रक्षण शिक्षण कार्यक्रम सुरू केला. अमरावती शहरातील प्रथम ३० शाळांतून व नंतर सर्व १०० शाळांतून आणि पुढे जिल्ह्यातील १२७० शाळांतून एकाच वेळी हा कार्यक्रम सुरू झाला. विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देणारा, शालेय पर्यावरण मंडळाच्या नावाने नावारूपास आलेला, हा कार्यक्रम सबंध देशभर राबवण्यासाठी १९९४पासून भारत सरकारनेही इकोक्लब, हरितसेना या नावांनी स्वीकार करून तो लागू केला.

घारड यांच्या पुढाकाराने अमरावती जिल्ह्यात लोकसहभागातून जलसंधारणाचे काम सुरू झाले. व त्यांनी श्रमदानातून साडेपाच हजार गॅबीयन बंधारे व वनराई बंधारे जिल्ह्यात बांधण्यात पुढाकार घेतला. जिल्हा टँकरमुक्त होण्यास मदत झाली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या साहाय्याने लाखो रोपे तयार केली व लागवडीसाठी त्यांचे वितरण केले. घारड यांनी आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कार्यक्रमाचे विदर्भातील प्रमुख समन्वयक म्हणून काम करून आदर्श गावे निर्मितीच्या कार्यात मोठे योगदान दिले आहे. अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात गावागावांत चराईबंदी, कुर्‍हाडबंदीसारखे उपक्रम सुरू झाले, तेव्हा घारड यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भात हे सर्व उपक्रम राबवले गेले. घारड संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य, महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाचे तांत्रिक सदस्य असून शासकीय व निमशासकीय अशा अनेक समित्यांवर व सल्ल्लागार मंडळावर कार्यरत आहेत.

- उल्हास मराठे

 

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].