Skip to main content
x

घाटे, विठ्ठल दत्तात्रेय

विठ्ठल दत्तात्रेय घाटे यांचा जन्म नगर जिल्ह्यातील घोसपुरी या गावी झाला. प्रसिद्ध कवी दत्त (दत्तात्रय घाटे) हे त्यांचे वडील होत. वयाच्या नवव्या वर्षापर्यंत ते नगरमध्येच होते. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. मात्र माध्यमिक व उच्च शिक्षण गुजरातमधील अंकलेश्वर, बडोदा; मध्य प्रदेशातील इंदोर, ग्वाल्हेर येथे झाले. १९१८मध्ये त्यांनी तत्त्वज्ञान हा विषय घेऊन अलाहाबाद विद्यापीठातून एम.ए.ची पदवी प्राप्त केली. मुंबई व लंडन येथून टी.डी.सारख्या शिक्षणशास्त्रातील पदव्या प्राप्त केल्या. तेव्हाच्या मुंबई इलाख्यात दीर्घकाळपर्यंत ते शिक्षण खात्यात अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्याच काळात रत्नागिरी येथे ‘डेप्यूटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर’ असताना ते बी.टी. झाले. अखेरीस ‘डेप्यूटी डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन’ या पदावरून ते सेवानिवृत्त झाले.

महाराष्ट्र, माळवा (मध्य प्रदेश), गुजरात, कर्नाटक अशा विविध राज्यांत व परदेशांतही वास्तव्य केल्यामुळे घाटे यांचे व्यक्तित्व बहुरंगी, बहुढंगी व बहुआयामी बनले होते. गाठीशी असलेल्या प्रदीर्घ अनुभवांमुळे त्यांच्या लेखनातून जीवनविषयक व्यापक आणि समृद्ध जाणिवांचा प्रत्यय येतो. कवी असलेल्या वडिलांमुळे साहित्याचा वारसा त्यांच्याकडे जणू रक्तातूनच मिळाला होता.

१९२०मध्ये ‘दत्तांची कविता’ या नावाने त्यांनी वडिलांच्या, कवी दत्त यांच्या कवितांचे संकलन प्रकाशित करून त्यांनी आपली वाङ्मयीन कारकिर्द सुरू केली. त्या काळातील प्रसिद्ध कवी चंद्रशेखर, माधवराव पटवर्धन (माधव ज्यूलियन), रा.वि.मराठे, नामदेव भाटे हे त्यांचे साहित्यिक मित्र होते. चंद्रशेखर कवींमुळे त्यांना कवितेची गोडी लागली. १९२३ साली स्थापन झालेल्या ‘रविकिरण मंडळा’चे ते सदस्य होते. ‘मधुकर’ या उपनावाने त्यांनी कवितालेखन सुरू केले. १९२४साली माधव ज्यूलियन यांच्यासह लिहिलेला त्यांचा ‘मधुमाधव’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. हा संग्रह त्यांनी कवी चंद्रशेखर यांना श्रद्धापूर्वक अर्पण केला. त्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी ‘आई’, ‘नवलाख दिवे हे तुझ्या घरी’, ‘आलात ते कशाला’, ‘गा यशवंता आनंदाने’, ‘आळंदीची पालखी’, ‘प्रेमाचे अद्वैत’ यांसारख्या कविता त्या काळी विशेष गाजल्या होत्या. 

समाजजीवनाचे दर्शन-

घाटे यांच्या साहित्यसंपदेत कविता, व्यक्तिचित्रे, ललितनिबंध, नाट्यप्रवेश, नाटके, क्रमिक पुस्तके, विद्यार्थ्यांसाठीची पुस्तके, इतिहासावरील पुस्तके अशा विविध वाङ्मय प्रकारांचा समावेश होतो. ‘काही म्हातारे व एक म्हातारी’ (१९३१) ‘पांढरे केस हिरवी मने’ (१९५९), या दोन्ही व्यक्तिचित्र-संग्रहांतील ‘पांढर्‍या केसांचे म्हातारे’ म्हणजे चिरतरुण, ध्येयवादी व सतत कार्यरत असणार्‍या व्यक्ती होत. पैकी ‘काही म्हातारे व एक म्हातारी’ या संग्रहाच्या एकूण आठ आवृत्त्या निघाल्या. ‘मनोगते’ (१९६६) हा ललित निबंधसंग्रह, ‘विचार विलासिते’ (१९७३) हा ललित-वैचारिक निबंधसंग्रह; ‘टीचिंग ऑफ हिस्टरी’ (१९३६), ‘इतिहास- शास्त्र व कला’ (१९५८) ही इतिहास अध्यापनासंबंधीची पुस्तके; ‘यशवंतराव होळकर’ (१९६४) हे नाटक; ‘बाजी व डॅडी’ (१९६४) ही नाटिका; ‘नाट्यरूप महाराष्ट्र’ (१९४४) हा ऐतिहासिक नाट्य-प्रवेशांचा संग्रह, ‘नाना देशांतील नाना लोक’ (१९३३), ‘भारताची कहाणी’, ‘तांबडं फुटल’ (१९६९) ही विद्यार्थ्यांसाठी लिहिलेली माहितीपूर्ण पुस्तके अशी त्यांची बहुविध ग्रंथसंपदा आहे.  त्यांनी ‘दिवस असे होते’ (१९६१) हे आत्मचरित्र अशी बहुविध ग्रंथसंपदा आहे. या आत्मचरित्रात त्यांनी व्यक्तिगत आयुष्याच्या कथनापेक्षा सामाजिक जीवनाचे दर्शन अधिक घडविल्याने ते अभ्यसनीय झाले आहे. महाराष्ट्रातील सर्वसमस्यांना त्यात उत्तर सापडते, असे म्हटले गेले आहे.

‘माणूस’केंद्री निरीक्षण-

 या बहुविध साहित्यसंपदेमधून त्यांच्या लेखनातील काव्यात्मता, नाट्यात्मता, सौंदर्यदृष्टी, इतिहासप्रेम, जीवनाविषयीची आंतरिक ओढ, अभिजात रसिकता या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्यांची गद्यशैली सुटसुटीत, रसपूर्ण व लयदार होती. साहित्यामधून त्यांचे उत्कट व दिलखुलास व्यक्तिमत्त्वच प्रकट होते. आत्मपरता हा जसा त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा ठळक गुण होता, तसेच आगळेवेगळे जीवन जगणार्‍या विविध क्षेत्रांतील विविध माणसांविषयीचे प्रेम हाही एक अनोखा गुण होता. माणूस हा त्यांच्या निरीक्षणाचा आणि अभ्यासाचा विषय होता. माणसातील वेगळेपण जाणून घेऊन इतरांना ते रंगतदार शैलीत सांगण्याचा विलक्षण छंद घाटे यांना होता.

आचार्य अत्रे यांच्या सह-कार्याने ‘अत्रे-घाटे नवयुग वाचनमाला’ ही मराठीची क्रमिक पुस्तके तयार करून महाराष्ट्रात क्रमिक पुस्तकांचे नवयुग निर्माण केले. शिक्षकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ‘घाटे-परुळेकर समिती’च्या माध्यमातून शिक्षकांची वेतनश्रेणी निश्चित करण्याचे महत्त्वाचे कार्य केले.

१९५३ मध्ये अहमदाबाद येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९५२ ते १९५५ या चार वर्षांत ‘मुंबई राज्य विधानसभेचे’ ते सदस्य होते. मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य प्रचार-प्रसार कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, तसेच परिषदेचे ‘माधवराव पटवर्धन सभागृह’ बांधण्याच्या कामातही त्यांचे मोलाचे सहकार्य होते.

१९५०मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर ते पूर्णपणे पुणेकर बनले व उर्वरित आयुष्य वाचन, चिंतन, ज्ञानसाधना व मित्रपरिवारात घालवले.

कवी ‘दत्त’ यांच्याकडून वि.द.घाटे यांच्याकडे आलेला साहित्याचा वारसा त्यांची कन्या प्रसिद्ध कवयित्री प्रा.अनुराधा पोतदार यांच्याकडे व त्यांच्याकडून त्यांची कन्या कवयित्री यशोधरा यांच्याकडे संक्रमित झाला आहे.

- प्रा. सविता टांकसाळे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].