Skip to main content
x

हिवरगावकर-भालेराव,पवळा तानाजी

वळा तानाजी हिवरगावकर यांचा जन्म संंगमनेर तालुक्यातल्या हिवरगाव येथे तानाजी भालेराव व रेवूबाई यांच्या पोटी झाला. अतिशय गरीब कुटुंबातील तानाजी व रेवूबाईने खंडोबाला नवस केला होता व त्या नवसामुळे मुलगी झाली म्हणून तानाजीने नवसात कबूल केल्याप्रमाणे लहानग्या पवळाचे लग्न खंडोबाशी लावून तिला खंडोबाची मुरळी केले. पवळा लहानपणापासून दिसायला सुंदर, आवाज अतिशय गोड. मुरळी म्हणून खंडोबाची गाणी म्हणणारी पवळा नंतर वाघापूरच्या हरिबाबा घोलप यांच्याकडे नाच-गाणे शिकली व तिने त्यांच्याच तमाशात नाचायला सुरुवात केली.

पूर्वीच्या काळी करमणुकीची माध्यमे अतिशय मर्यादित होती. तेव्हा मराठमोळ्या माणसाला घटका दोन घटका विरंगुळा मिळवून देण्याचे काम तमाशाने केले. तमाशा केवळ करमणूकच करीत नव्हता, तर कधी वगनाट्यांद्वारे, तर कधी लावण्यांद्वारे आपला इतिहास लोकांपुढे मांडायचा; लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत सामाजिक संदेश द्यायचा. ब्रिटीशांच्या सत्तेचा अस्त जवळ येत होता. त्या काळात महाराष्ट्रात तमाशा सर्वांगाने फुलला-बहरला. सर्वसामान्य जनतेसाठी तमाशाचे जे खेळ व्हायचे, त्या काळात तमाशात स्त्रिया नसायच्या. सुंदर दिसणारी तरुण मुलेच साडी नेसून, पायात घुंगरे बांधून नाचायची. परंतु पवळाने सर्व प्रस्थापित रूढींना मोडीत काढीत तमाशात काम करण्याचा निर्णय घेतला व हरिबाबाच्या तमाशात नाचायला सुरुवात केली. तमाशात खरीखुरी स्त्री नाचते म्हटल्यावर सगळीकडे हरिबाबा घोलपांच्या तमाशाचे नाव झाले, लोक पवळासाठी हरिबाबाचा तमाशा बघायला गर्दी करायला लागले.

पुढे हरिबाबांनी तमाशा बंद करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी गावोगावी कीर्तने करायला सुरुवात केली. पवळाने नामा धुलवडकर यांच्या तमाशात काम करायला सुरुवात केली. मुंबईत त्या काळी वेगवेगळे तमाशा फड गाजत होते. परंतु सगळीकडे पुरुषच नाचे होते. नामा धुलवडकरांचा फड जेव्हा मुंबईत गेला, तेव्हा अतिशय सुंदर स्त्री तमाशात नाचते याचे त्या वेळीही पुरोगामी समजल्या जाणार्‍या मुंबईकरांना मोठे अप्रूप वाटले. मुंबईत पवळामुळे धुलवडकरांच्या तमाशाला मोठी गर्दी व्हायला लागली.

मुंबईत त्या काळी गाजलेल्या भाऊ फक्कड, शिवा संभा कौलापूरकर, दगडू कोंडीबा साळी, भागू नागू माळी, शंकरराव अवसीकर, रघू इंदुरीकर व पठ्ठे बापूरावांचे तमाशे अतिशय लोकप्रिय होते. पवळाच्या तमाशातल्या पदार्पणामुळे सर्वांच्याच नजरा नामा धुलवडकरांच्या तमाशाकडे लागल्या.

पवळामुळे मुंबईत नामा धुलवडकरांच्या तमाशाचा भाव वधारला होता. तमाशा कलेसाठी आपले घरदार, सर्वस्व सोडलेल्या पठ्ठे बापूरावांना आपल्या तमाशात पवळा असावी असे वाटू लागले. एका आमने-सामने रंगलेल्या तमाशाच्या सामन्यात पठ्ठे बापूरावांनी पवळाला जिंकले. पठ्ठे बापूरावांची उपजत प्रतिभा पवळाच्या आगमनानंतर अधिकच बहरली. पठ्ठे बापूरावांच्या तमाशात पवळाचा थाट आणखी वाढला. नखशिखान्त सोन्याने मढवलेली पवळा त्या काळी मुंबईहून संगमनेरला यायची व येथून तिच्यासाठी खास बनवलेल्या छकड्यातून हिवरगावला जायची. हिवरगावला पवळाने शेतीही घेतली होती.

हिवरगावला काही दिवस राहून पवळा पुन्हा मुंबईला जायची. पवळा व पठ्ठे बापूरावांमुळे इतर तमाशांचा प्रेक्षकवर्ग कमी व्हायला लागला. पठ्ठे बापूराव ब्राह्मण तर पवळा दलित समाजातील, या गोष्टीचा इतर तमासगिरांनी अपप्रचारासाठी वापर सुरू केला. आपल्या समाजातील नाचणारीण ब्राह्मणाने फितवली, त्यामुळे आपल्या समाजातील लोकांनी बापूरावांच्या तमाशात काम करायचे नाही असा निर्णय पीला हाउसमध्ये झालेल्या बैठकीत झाला. 

बापूरावांच्या विरोधात वातावरण तापू लागले. जाती-पाती मानणार्‍या त्या काळात पठ्ठे बापूरावांना तमाशासाठी साथीदार मिळेनासे झाले. पवळा व बापूरावांना आता या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा याची चिंता पडली. त्या काळी किसनदादा गवळी, हासमशेठ बांगडीवाले, हिराबाई परदेशी, अबूशेठ या लोकांचे थिएटर मालक म्हणून वर्चस्व होते. बापूरावांनी या सर्वांना सांगितले की, आम्हांला विकत तरी घ्या, नाहीतर आमचा लिलाव करा; परंतु या परिस्थितीतून मार्ग काढा. अखेरीस कलाकारांची कदर करणार्‍या अबूशेठ यांनी पवळा व बापूरावांना दरमहा ९०० रुपये बोलीवर लिलावात घेतले.

पठ्ठे बापूराव व पवळाच्या तमाशाला सगळ्या महाराष्ट्रात गर्दी वाढत होती. तमाशाच्या वाढत्या गर्दीबरोबर पुन्हा एकदा पैशांचा प्रचंड ओघ सुरू झाला. बापूराव आणि पवळा, दोघेही सोन्याचे शौकीन. दोघांच्याही अंगावर सोन्याचे दागिने, भरजरी कपडे असायचे. हातात पैसा खेळायला लागल्यानंतर बापूरावांचा खर्चही वाढला. इतरांना मदत करण्याबरोबरच बापूरावांच्या गांजाचे व्यसन वाढतच होते. पवळा या गोष्टीमुळे चिडायची. परंतु बापूरावांच्या खर्चाला आळा बसत नव्हता. हळूहळू दोघांमधील मतभेद भांडणांपर्यंत जाऊन पोहोचले. अखेरीस रोजच्या भांडणाला कंटाळून पवळाने तमाशापासून दूर होण्याचा निर्णय घेतला. 

पवळाने मुंबई सोडून हिवरगाव गाठले होते. पवळा बापूरावांच्या तमाशात असताना तिचे चाहते असलेल्या मसूरच्या मारुतीराव पाटलांनी पवळाची भेट घेतली. पवळाने पुन्हा तमाशात काम करावे यासाठी पाटलांनी वाघापूरच्या माधवराव घोलप (सुतार) यांची भेट घेतली. माधवराव घोलपांच्या मध्यस्थीनंतर पवळाने मारुतीराव पाटलांनी उभ्या केलेल्या नव्या फडात काम करायची तयारी दाखवली.

मारुतीराव पाटील कवडेकरांनी उभारलेल्या फडाची लोकप्रियता पवळामुळे सर्वत्र वाढत होती; परंतु एकदा काही कारणावरून पवळा व मारुतीरावांचे भांडण झाले. सातार्‍याच्या कोर्टात पवळावर दागिने चोरल्याच्या आरोपावरून पाटलांनी केस लावली होती. न्यायालयाने पवळाच्या बाजूने निकाल दिला. या घटनेनंतर पवळा पुन्हा तमाशा सोडून हिवरगावला आली.

पवळा हिवरगावला आल्याचे कळताच पठ्ठे बापूरावांनी थेट वाघापूर गाठले. तिथल्या माधवराव पहिलवानांच्या मध्यस्थीने त्यांनी पवळाची भेट घेतली. बापूरावांच्या आग्रहानंतर पुन्हा एकदा पठ्ठे बापूराव आणि नावचंद पवळा हिवरगावकर बहुरंगी तमाशा उभा राहिला. पुन्हा एकदा वैभवाचे दिवस आले. मात्र पुन्हा एकदा काही दिवसांनी पवळा व बापूराव वेगळे झाले, तमाशा बंद पडला. पवळा पुन्हा एकदा हिवरगावला आली.

एखाद्या सम्राज्ञीप्रमाणे जगलेल्या पवळाने अखेरच्या काळात खूप हाल सोसले. मुंबईतल्या आपल्या भावाकडे पवळा जीवनाच्या शेवटच्या घटका मोजीत होती. दम्याने संपूर्ण शरीर खंगून गेले होते. मुंबईतच तिचे निधन झाले.   

संतोष खेडलेकर

हिवरगावकर-भालेराव,पवळा तानाजी