अब्दुल, वहीद खाँ
किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक अब्दुल करीम खाँ यांचे पुतणे (भाचे) उस्ताद अब्दुल करीम खाँ व अब्दुल वहीद खाँ यांनी केलेल्या कार्यामुळे किराणा घराण्याची गायकी प्रस्थापित झाली. अब्दुल वहीद खाँनी किराणा घराण्यातल्या गायक-गायिकांची एक पिढीच शिकवून तयार केली.
अब्दुल वहीद खाँ यांचे शिक्षण सुप्रसिद्ध सारंगीवादक हैदर बक्श यांच्याकडे झाले. हैदर बक्श हे किराणा घराण्याचे बीनकार बंदे अली खाँ यांचे शिष्य होते. बंदे अली खाँजवळ असंख्य चिजांचे भंडार होते. बंदे अली खाँनी आपल्याजवळ असलेल्या सार्या चिजांचे भंडार हैदर बक्शजवळ खुले केले. वहीद खाँना हैदर बक्शकडून या सर्व चिजा लाभल्या.
हैदर बक्श हे सुरुवातीला म्हैसूर दरबारात होते. तिथेच वहीद खाँना पाठवण्यात आले. त्यानंतर ते दोघेही कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या दरबारी आले व नंतर १९१४ मध्ये वहीद खाँ पुण्याला अब्दुल करीम खाँ यांच्या आर्य संगीत विद्यालयात शिकवायला आले. अब्दुल करीम खाँच्या मैफलीबरोबर व जलशांमध्येही ते असत. पुढे या कुटुंबाबरोबर ते मुंबईला आले.
अब्दुल वहीद खाँ यांचा संगीत क्षेत्रात उत्तम संगीत-गुरू म्हणून विशेष लौकिक होता. त्यांच्या प्रमुख शिष्यांत सुप्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांचे नाव प्रथम घ्यावे लागेल. हिराबाई बडोदेकरांना १९१८ ते १९२२ पर्यंत तब्बल चार वर्षे पद्धतशीर व कडक शिस्तीची तालीम मिळाली. खास हिराबाईंना शिकवण्याकरिताच ते मुंबईला आले.
त्यांनी १९२० ते १९४० च्या काळात जीवनलाल मट्टू, फिरोज निझामी, बी.एन. दत्त, पं. प्राणनाथ, मुनीर खातून बेगम इत्यादी अनेक शिष्य तयार केले. पद्मादेवी (मनोरमाबाई बनारसकर ऊर्फ मुन्नीबाई) ही त्यांची आवडती शिष्या होती. याशिवाय त्यांच्याकडून हिंदी चित्रपटसंगीतातील सुप्रसिद्ध पार्श्वगायक महम्मद रफी (रफिक गझनवी) व बेगम अख्तर म्हणून भारतात गझल सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अख्तरीबाई फैजाबादी यांनीही तालीम घेतली होती. तसेच इंदौर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक अमीर खाँ यांच्या गायकीवरही वहीद खाँच्या विलंबित गायकीचा खोल परिणाम होता. त्यांनी वहीद खाँची गायकी श्रवण करूनच आत्मसात केली; त्यांच्याकडे प्रत्यक्ष शिक्षण घेतले नव्हते.
आलापी हे वहीद खाँच्या गायकीचे प्रधान अंग होते. एकाएका स्वराला प्राधान्य देत शिस्तबद्ध व पद्धतशीरपणे धिम्या लयीत विस्तार करीत गाणे ही त्यांच्या गायकीची खासियत होती. आपल्या शिष्याच्या गळ्याची जात पाहून ते शिकवत. त्यांच्या मैफली जास्त झाल्या नाहीत; पण भारतातील अनेक आकाशवाणी केंद्रांवरून ते गात असत. रेडिओ व ग्रामोफोन कंपनीच्या संयुक्त सहकार्याने त्यांची एक ध्वनिमुद्रिका एल.पी. रेकॉर्डवर पुनर्ध्वनिमुद्रण करून ती १९७६ साली वितरित करण्यात आली. त्यांत पटदीप, मुलतानी व दरबारी कानडा हे राग ऐकायला मिळतात. ते १९४० च्या सुमारास लाहोरला गेले. ते १९४५ साली कैरानाला परतले.
त्यांनी उतारवयात आपल्यापेक्षा पंचेचाळीस वर्षे लहान असलेल्या नाझिरा बेगम या तरुणीशी लग्न केले. त्यांच्यापासून तिला झालेल्या पुत्राचे नाव हाफीझउल्ला खाँ. पुढे हाफीझउल्ला खाँ सारंगीवादक बनले व ते रेडिओवर वादनाचे कार्यक्रमही करत असत. उतारवयात श्रवणदोष झाल्याने ‘बहिरे वहिद खाँ’ या नावाने ते ओळखले जात. खाँसाहेबांचे १९४९ मध्ये सहारनपूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.