Skip to main content
x

आचवल, माधव भास्कर

     माधव आचवल यांचे शालेय शिक्षण विल्सन हायस्कूल मुंबई येथे झाले. त्यांनी ज. जी. कला महाविद्यालयातून १९४५ मध्ये वास्तुशास्त्रात पदवी प्राप्त केली. आचवल बडोदा येथे एम. एस. विद्यापीठात प्राध्यापक होते.

     आचवलांचे ललित लेखन १९५५च्या सुमारास ‘सत्यकथा’ मासिकामधून प्रसिद्ध होऊ लागले. त्यांचे ललित लेखन ‘किमया’ (१९६१) तसेच ‘पत्र’ (१९९२) या दोन संग्रहांमधून प्रकाशित झालेले आहे.  आचवलांची वैशिष्ट्यपूर्णता या दोन्ही संग्रहांमधून लक्षात येते. 

     निसर्गातील तसेच मानवनिर्मित कलाकृतींचा आस्वाद घेणारे रसिक मन, जगण्यातील चैतन्याला कवेत घेणारी संवेदनशीलता, सौंदर्यासक्त आनंदी वृत्तीचा प्रत्यय त्यांच्या ललित लेखनामधून येतो. उत्कटता, सळसळता उत्साह यांच्यासह जगण्याची ऊर्मी, प्रसन्नता, निरागस खेळकरपणा हे गुण त्यांच्या ललित लेखनामध्ये जाणवतात. कलाकृतींमधील सौंदर्याचा मनावर एकत्रित होणारा परिणाम तसेच कलाकृतीतील चैतन्याचा वेध घेण्याचा प्रयत्न त्यांनी ललित लेखनामधून केला. चिंतनशीलता, कठोर विश्लेषण आणि जगण्यातले मार्दव, कारुण्य यांची जोपासना अशा दोन अंगांनी झालेला विकास त्यांच्या ललित लेखनामधून स्पष्ट होतो.

     ‘जास्वंद’ (१९७४) ह्या ग्रंथातून त्यांनी गंगाधर गाडगीळ, इंदिरा संत, पु. शि. रेगे, चिं. त्र्यं. खानोलकर, जी. ए. कुलकर्णी यांच्या साहित्यकृतींवर केलेली समीक्षा प्रसिद्ध आहे. ‘रसास्वाद: वाङ्मय आणि कला’ (१९७२) हा ‘जास्वंद’च्या आधी प्रसिद्ध झालेला समीक्षापर ग्रंथ. यात ‘रणांगण’ या विश्राम बेडेकर यांच्या कादंबरीचे व ‘ताजमहाल’ या जगप्रसिद्ध वास्तुशिल्पाचे रसग्रहण केलेले आहे.

     बा. सी. मर्ढेकर यांच्या समीक्षेने कलाकृतीची स्वायत्तता, तिचे अनन्यसाधारण असणे, आत्मनिष्ठा या मूल्यांवर विशेष भर दिला. कलाकृतीच्या आकृतिबंधाची जडणघडण, तिच्यामध्ये असलेले आशय आणि अभिव्यक्तीचे अद्वैत व त्या अंगाने येणारे शैलीविशेष यांना मर्ढेकरांच्या समीक्षेमध्ये महत्त्व दिले गेले. साहित्यकृतीचा रसास्वाद कसा घ्यावा, साहित्य आणि इतर ललित कलांमधील साम्यभेद विशद करणारे लेखन मर्ढेकर आणि त्यानंतरच्या नवसमीक्षेने केले. मर्ढेकरांच्या नंतरच्या काळातील नवसमीक्षेच्या प्रवाहातील समीक्षक म्हणून माधव आचवल परिचित आहेत.

     ‘डार्करूम आणि इतर एकांकिका’ (१९७५), ‘चिता आणि इतर एकांकिका’ (१९७६) हे माधव आचवल यांचे निवडक एकांकिका संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘अमेरिकन चित्रकला’ (१९६४) हे त्यांचे अनुवादित पुस्तक होय.  

     - प्रा. रूपाली शिंदे

आचवल, माधव भास्कर