Skip to main content
x

अमरशेख, मल्लिका

           ल्लिका अमरशेख यांचा जन्म मुंबईत झाला. वडील शेख मेहबूब हसन उर्फ शाहीर अमरशेख हे समाजवादी विचारसरणीचे होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनजागरण करणार्‍यांत अमरशेख यांचा अग्रक्रम होता. कोकणी मुसलमान असलेल्या अमरशेखांनी कुसुम जयकर ह्या हिंदू कन्येशी विवाह करून क्रांतिकारी पाऊल उचलले. कवितांमधून, नाट्यमेळाव्यांमधून नवनिर्मिती करताना स्वतःच्या मुलीवरही पुरोगामी संस्कार केले. त्यामुळे मल्लिकाने शालेय जीवनापासूनच कविता करायला सुरुवात केली. नृत्य, अभिनय, संगीत ह्या कला जोपासण्याचा प्रयत्न केला. पुढे स्वतंत्र विचारसरणी असलेल्या या कवयित्रीने रफ आणि टफअसणार्‍या, वेगळे जीवन आणि वेगळा विचार जगणार्‍या कवी नामदेव ढसाळ यांच्याशी विवाह केला. मॅट्रिकपर्यंतचे शालेय शिक्षण घेऊन विवाहोत्तर जीवनात त्या अनुभव शाळेतच बरेचसे शिकल्या. जे शिकल्या, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडले आहे. १९७९ साली वाळूचा प्रियकरनावाचा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. बर्‍याच उशिरा म्हणजे १९९३ मध्ये महानगरकवितासंग्रह प्रकाशात आला. संस्कृतीचा भेदक उपहास करणारी त्यांची कविता प्रामुख्याने स्त्री-मनाच्या जाणिवा व्यक्त करते. स्त्री-वादी कवयित्रींमध्ये मल्लिका अमरशेखांचे नाव ठळकपणे घ्यावे लागते. देहऋतु’ (१९९९) आणि समग्राच्या डोळा भिडवून’ (२००७) हे अलीकडचे कवितासंग्रह याची साक्ष देतात. मानवी दुःखे आणि स्त्री यांचे समीकरण का असावे?त्याबद्दल संस्कृतिरक्षक उदासीन का आहेत? असे प्रश्न त्यांना पडतात.

त्यांनी १९९४ साली सूर एका वादळाचाहे शाहीर अमरशेख यांच्याविषयीचे पुस्तक संपादित केले आहे. २००६ साली कथासंग्रहही प्रकाशित केला. मात्र त्यांचे अत्यंत गाजलेले पुस्तक म्हणजे १९८४ साली प्रसिद्ध झालेले आत्मकथन. त्याचे नावच मला उद्ध्वस्त व्हायचंयअसे आहे. प्रामाणिक सूर, पारदर्शी आत्मकथन आणि सामान्य मध्यमवर्गीय स्त्रीच्या आयुष्यात घडणार्‍या घटनांपेक्षा वेगळे अनुभव वाट्याला आलेले. कधी नियतीमुळे, कधी स्वतःच्या निर्णयांमुळे. या सार्‍याचे बेधडक निवेदन यामुळे हे आत्मकथन वैशिष्ट्यपूर्ण ठरले. पती नामदेव ढसाळ राजकारणात असूनही या संदर्भात त्या अलिप्त आहेत. मात्र विद्रोही जाणीव त्यांच्या लेखनातून ठळकपणे जाणवते. कवी नामदेव ढसाळ यांच्यापेक्षा वेगळी, स्वतंत्र, स्त्रीच्या जगण्याशी निगडित अशी त्यांची कविता स्त्री-वादी कवितांमध्ये आपले अढळ स्थान टिकवून राहील.

- प्रा. सुहासिनी कीर्तीकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].