Skip to main content
x

आपटे, मनोहर दत्तात्रेय

    नोहर आपटे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयात पूर्ण केले. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करीत असताना ते बी. कॉम.च्या परीक्षेत गुणवत्ता यादीत दुसरे आले. त्यानंतर ‘पॉलिटेक्निक स्कूल ऑफ कॉमर्स’, लंडन इथून त्यांनी बी. एस्सी (अर्थशास्त्र) ही पदवी मिळवली. त्यांना ‘इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकौंटस् अ‍ॅण्ड  मॅनेजमेंट असोसिएशन’, लंडन आणि ‘कॉस्ट अ‍ॅण्ड वर्क्स अकौंटस् ऑफ इंडिया’ या संस्थांचे सभासदत्व मिळाले. १९६० चा काळ तसा बदलाचा होता. या बदलांची, सुधारणांची चाहूल डॉ. आपटेंना फार पूर्वीच लागली होती. परिस्थितीतील बदलांचा अंदाज घेता घेता, स्थानिक गरजांवर उत्तरे शोधता शोधता त्यांचे व्यक्तिमत्व विकसित होत गेले. त्यातून एका सुस्पष्ट परंतु काहीशा वेगळ्या, चाकोरीबाहेरच्या विचारसरणीला जन्म मिळाला.

     १९६८ साली ‘वेजस्केल अ‍ॅनॅलिसिस’ या विषयावरील त्यांच्या प्रबंधास पुणे विद्यापीठाने पीएच्.डी. प्रदान केली. देशात आणि परदेशात त्यांनी मोठ्या हुद्द्यावर नोकर्‍या केल्या. पण त्यांचे मन त्यात रमले नाही. कारण त्यांना शैक्षणिक क्षेत्रात विविध बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायचे होते.

     शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार आहे. त्यासाठी सरकारकडे आशाळभूतपणे पाहात बसण्यापेक्षा उपलब्ध साधनांचा आणि उपकरणांचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून स्वत:च्या पायावर विद्यार्थ्यांना उभे केले पाहिजे असा विचार पक्का झाल्यानंतर १९८० मध्ये त्यांनी ‘ज्ञानेश्‍वर विद्यापीठा’ची स्थापना केली.

     नोकऱ्या मागत फिरणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा नोकर्‍या देणार्‍या उद्योजकांची निर्मिती शिक्षणातून करता येईल काय? यावर त्यांचे चिंतन चालू होते. परीक्षेतील गुण म्हणजे गुणवत्ता ही संकल्पना डॉ. आपटेंना मान्य नव्हती. तंत्र शिक्षणाला प्रवेश देताना गुणांची टक्केवारी हाच निकष होता. एक गुण कमी मिळाला म्हणून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शाखेला प्रवेश नाकारला जात होता. ही गोष्ट डॉ. आपटेंना खटकत होती. बुद्धिमत्ता, कौशल्य आणि हातोटी असताना केवळ परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून कुणाचाही तंत्र शिक्षणाचा अधिकार नाकारला जाऊ नये यासाठी मनोहर आपटे यांनी ज्ञानेश्‍वर विद्यापीठाच्या रूपाने मोठी चळवळ शैक्षणिक क्षेत्रात उभी केली. ज्ञानेश्‍वर विद्यापीठात प्रवेश घेताना गुणांची अट नाही, देणगी, दरडोई फी नाही, गुणवत्ता यादी नाही, प्रथम येणार्‍यास प्रथम प्रवेश, इच्छा असेल त्या अभियांत्रिकी शाखेला प्रवेश असे जगापेक्षा वेगळे निकष त्यांनी ठेवले.

     केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित शिक्षण ही संकल्पनाही डॉ. आपटेंना मान्य नव्हती. पुस्तकी ज्ञानाला अनुभवाची जोड मिळाली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. म्हणून ज्ञानेश्‍वर विद्यापीठात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना सहा महिने पुस्तकी शिक्षण आणि सहा महिने प्रात्यक्षिके प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्रात द्यायची असे मनोहर आपटे यांनी ठरविले. त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करून कर्तृत्वसंपन्न अभियंत्यांच्या अनेक पिढ्या घडवून त्यांनी देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले. डॉ. आपटेंच्या या संकल्पनेचे भारतभर स्वागत झाले.

     केंद्र सरकारच्या आठव्या पंचवार्षिक योजनेत ज्ञानेश्‍वर विद्यापीठाच्या कार्याचा गौरवाने उल्लेख करण्यात आला. बेरोजगारीला आळा घालण्यासाठी आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी देशभर ही संकल्पना राबविली पाहिजे असा विचार पुढे आला. डॉ. आपटेंनी जाणीवपूर्वक ज्ञानेश्‍वर विद्यापीठाला सरकारी मान्यता घेतली नाही. नियम व अटींच्या जाळ्यात शिक्षण क्लिष्ट होऊ नये अशी त्यांची भावना होती.  सरकारी मदतीवर अवलंबून न राहता शिक्षणसंस्था ‘स्वायत्त’ आणि आर्थिक दृष्ट्या ‘स्वयंपूर्ण’ झाल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. गुणांच्या जंजाळातून शिक्षणाला मुक्त करणारे, ज्ञानेश्‍वरांना आदर्श मानून विद्यापीठाची स्थापना करणारे, मुक्त शिक्षणाचे पुरस्कर्ते डॉ. मनोहर आपटे यांचे पुण्यात निधन झाले.

- प्रा. मिलिंद जोशी

आपटे, मनोहर दत्तात्रेय