आफळे, श्याम मनोहर
मराठी ‘ब्लॅक कॉमेडी’ म्हणून ज्यांच्या लेखनाला दिलीप चित्र्यांनी गौरवले, त्या श्याम मनोहरांचे संपूर्ण नाव श्याम मनोहर आफळे. त्यांचा जन्म भिकार, तासगाव (जिल्हा सातारा) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण लिंब, अंगापूर आणि तासगाव येथे झाले व माध्यमिक शिक्षण सातार्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. १९५८साली एस.एस.सी. झाले. सातारा येथे छत्रपती शिवाजी व कराड येथे विज्ञान महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतले. १९६४मध्ये ते बी.एस्सी.१९६७मध्ये झाले. पुणे विद्यापीठातून फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स हे विषय घेऊन एम.एस्सी. झाले. चिपळूण येथील डॉ.दातार महाविद्यालय व पुणे येथील ज्ञानप्रबोधिनीत त्यांनी काही काळ अध्यापन केले. नंतर सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे काम करून ते निवृत्त झाले.
नववीत असल्यापासून त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. ‘कॉम्पिटिशन’ ही त्यांची पहिली कथा, ‘सैनिक समाचार’मधून प्रसिद्ध झाली. १९६७पासून ते नियमित लेखन करू लागले. नवकथेला ओहोटी लागण्याच्या काळात त्यांचे कथालेखन प्रकाशित झाले; पण ते रूढ परंपरेच्या साच्यातील नसल्याने दुर्लक्षित झाले. ‘आणि बाकीचे सगळे’ (१९८०), ‘बिन मौजेच्या गोष्टी’ (१९८६) हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. श्याम मनोहर यांच्या कथा व्यक्ती आणि समाज यांच्या वर्तनाचे सूक्ष्म तपशील भरतात. त्यांच्या कथा व्यक्ती, समूह, कुटुंब, सामाजिक संस्था, त्यांचे परस्पर संबंध, व्यक्तीचे सामाजिक स्थान, त्याला पार पाडाव्या लागणार्या भूमिका, त्यांतील नैतिक अंतर्विरोध, त्यातून निर्माण होणारा ताण यांमुळे व्यामिश्र (मिश्रित) आहेत. ‘कंटिन्युइटी’, ‘वासू अमक्यातमक्या ठिकाणी ऐसपैस’, ‘तात्पर्य’, ‘गुरुत्वाकर्षणाचे प्रदेश’, ‘सॅम्युएल बेकेटसाठी’ या कथा; तसेच ‘मि.थिंकर मंकी’ या कथेतून तत्त्वज्ञान प्रकट होते. आपल्या कथांतून मध्यमवर्गीय प्रवृत्तीचे, तरीही उपरोधिक भाष्य करताना ते मध्यमवर्गीयांच्या मनातील गोंधळांचा वेध घेत, जीवनातील विसंगतिपूर्ण कोलाहलाचे अस्वस्थ करणारे दर्शन घडवितात.
‘हे ईश्वरराव, हे पुरुषोत्तमराव’, ‘शीतयुद्ध सदानंद’, ‘कळ’, ‘खूप लोक आहेत’ या कादंबर्या रचनात्मक अंगाने विचार केल्यास, कादंबरीच्या वर्तुळात बसत नाहीत. ‘हे ईश्वरराव...’मध्ये भरपूर पात्रे, घटना, प्रसंग आहेत; माणसाच्या स्वभावाचे बारकावे आहेत; पण कादंबरीच्या रचनात्मक वैशिष्ट्यांना त्यांनी टाळले आहे. ‘शीतयुद्ध सदानंद’ आणि ‘कळ’ यांत कोणत्याही राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक वर्तनाच्यामागे असलेल्या व्यक्तीची अंतरक्रिया कशी चालते, याचे चित्रण असून आधुनिकता आणि आत्मभान यांतील द्वंद्वाचे प्रभावी चित्रण आहे. ‘कळ’ ही कादंबरी लेखकाला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाते.
‘उत्सुकतेने मी झोपलो’ या कादंबरीत त्यांनी कुटुंब व्यवस्थेसंदर्भात भाष्य केले असून स्थैर्य या मूल्यावर उभ्या राहिलेल्या ‘कुटुंब’ या व्यवस्थेत ज्ञानाला स्थान का नाही, हे तपासण्याचा प्रयत्न केला आहे (लोकसत्ता, २४ डिसेंबर २००८). ‘उत्सुकतेने मी झोपलो’ या कादंबरीत मध्यमवर्गीय कुटुंबव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शक यंत्रातून निरीक्षण केलेले आहे, इतके वास्तव दर्शन होते. कुटुंबव्यवस्थेत जगताना मनाची तगमग अत्यंत तरल पद्धतीने व्यक्त होते. भरपूर पात्रे असूनही कथानकाची चौकट टाळणारे कथन, आत्मीयतेने मृदू पोत असलेली तरीही गर्भित चिकित्सेने वाचकाला कुंठीत करणारी शैली आहे. डॉ.किशोर सानप यांच्या मते, ‘त्यांच्या लेखनाला ‘श्याम मनोहरांचे’ गद्य लेखन असेच म्हणावे लागेल. अशा प्रकारचे लेखन मराठीत पहिल्यांदा झाले.’
‘हृदय’, ‘यकृत’, ‘येळकोट’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘दर्शन’ ही त्यांची नाटके समकालीन समाज व संस्कृती यांच्यापुढे नैतिक प्रश्न उभे करणारी, प्रचलित रूढी, मानवी व्यवहार व व्यक्तीच्या वर्तनामागची गुंतागुंत यांचे विश्लेेषण करणारी आहेत. ‘यकृत’ आणि ‘हृदय’ ही नाटके स्वातंत्र्योत्तर भारतातील सुखवादाची तीव्र चिकित्सा करणारी आहेत, तर ‘प्रेमाची गोष्ट’ या नाटकात स्वातंत्र्याच्या काळात वाढलेल्या पिढीतील आंतरिक द्वंद्वाचा आविष्कार झाला आहे. ज्ञान म्हणजे काय?, हा त्या नाटकातील प्रश्न आहे. ज्ञानाची आच आणि आस्था नसलेला समाज हा नाटकाचा विषय आहे. अमूर्त, तात्त्विक प्रश्नावर उभारलेले हे नाटक एक अनोखा प्रयोग आहे. ‘यकृत’ हे दोन अंकी नाटक मनुष्याला विचार करायला प्रवृत्त करते. श्याम मनोहरांचे लेखन शोकात्म जाणीव व्यक्त करीत असूनही भावुक, निराशावादी, नियतिशरणता प्रकट करणारे नाही. त्यांची भाषा सर्वसामान्यांच्या भाषेचाच अतिशय ताजेपणाने आणि सहजतेने वापर करते.
श्याम मनोहरांबद्दल अनुष्टुभच्या संपादकीयामध्ये लिहिले आहे, “साठीच्या दशकाअखेरीस ते लिहू लागले; पण पुस्तकरूपात प्रकाशित व्हायला ऐंशीच्या दशकाची सुरुवात झाली. त्यांचा वाचकवर्ग मर्यादित राहिला. त्यांच्या साहित्यात सामान्य वाचकाला आकर्षून घेणारे, असामान्य माणसाच्या जीवनातील भयोत्कट भावनांचे नाट्यही नाही, की विदूषकी वर्तनाने खदखदून हसायला लावणारे शब्द नाहीत; पण त्यांचे लेखन अनपेक्षितपणे मूलभूत मानवी प्रवृत्तींना स्पर्श करण्याची क्षमता प्रकट करते व आपण वस्त्रविहीन झाल्याची जाणीव करणारे आहे. अशी अस्वस्थता सामान्य वाचकांना नको असते. स्वतःची विरूपे दाखविणारे आरसे त्याला नको असतात.” अशा प्रकारे परंपरेतून काहीही न स्वीकारणारे, परंपरा निर्माण न करणारे असे मूलभूत आणि संपूर्णपणे स्वतंत्र आहे, स्व-तंत्र आहे.
“भाषेच्या अंगाने माणसाच्या जगण्यात शिरणं हा माझा आवडता खेळ आहे,” असे श्याम मनोहरांचे म्हणणे आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. २००८सालचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या ‘उत्सुकतेने मी झोपलो’ या कादंबरीला प्राप्त झाला, कर्हाड पुरस्कार ‘बिनमौजेच्या गोष्टी’ १९८३, सर्वोत्कृष्ट हौशी नाटककार - नाट्यदर्पण पुरस्कार - नाटक ‘यळकोट’ १९८४, गंगाधर गाडगीळ पुरस्कार - १९८४.