Skip to main content
x

आठवले, मोहिनीराज वासुदेव

      विदर्भातील नागपूर येथे चित्रकार, कलाशिक्षक हार्मोनिअमवादक व मर्मज्ञ संगीतज्ञ म्हणून बापूराव आठवले यांनी आयुष्यभर प्रसिद्धिपराङ्मुख राहून कार्य केले व त्या भागातील दृश्यकला शिक्षणाचा पाया रचला.

मोहिनीराज वासुदेव आठवले यांचा जन्म पुण्याजवळ घोरपडी येथे झाला. त्यांचे वडील नायब तहसीलदार म्हणून १९१० ते १९२८ पर्यंत खानदेशातील जळगाव भागात होते. त्यामुळे त्यांचेे शालेय शिक्षण जळगाव येथे झाले. बापूरावांना लहानपणापासून चित्रकला व संगीताची आवड होती. त्यामुळे शालेय शिक्षणासोबतच संगीत शिक्षणाचीही रीतसर सुरुवात झाली,  तसेच त्यांनी चित्रकलेची आवडही जोपासली. १९१९ ते १९२७ या काळात सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे ड्रॉइंग ग्रेड परीक्षांपासून ते जी.डी. आर्ट ही पेंटिंगची पदविका (१९२६) व आर्ट मास्टरची परीक्षा (१९२७) ते प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. याच काळात त्यांनी एक वर्ष शिल्पकलेचाही अभ्यास केला.

जे.जे.त शिकत असताना जगन्नाथ अहिवासी, मिनसगी, बडिगेर, दंडवतीमठ हे पुढे नावाजलेले चित्रकार त्यांचे वर्गबंधू होते. याच काळात १९१९ ते १९२१ ही दोन वर्षे ते गांधर्व महाविद्यालयात पं.नारायणराव व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली गायन शिकत होते. हार्मोनिअमची जात्याच आवड असल्याने चिजा व पदे वाजवून सोलो व साथसंगत करण्यात त्यांनी कौशल्य संपादन केले. मुंबईच्या वास्तव्यात ट्रिनिटी क्लबमध्ये कित्येक गवयांच्या बैठकींना त्यांनी साथ करून एक उत्तम वादक म्हणून ख्याती मिळविली. जे.जे. स्कूलमधील शिक्षण संपले त्याच दरम्यान वडिलांची बदली नागपूरला झाल्यामुळे बापूराव आठवले १९२८ मध्ये नागपूरला स्थलांतरित झाले व त्यानंतर आयुष्यभर नागपुरातच कार्यरत राहिले.

मुंबईच्या वास्तव्यात संगीतातील कौशल्यासोबतच चित्रकलेतील विविध माध्यमांवर  प्रभुत्व मिळवीत वास्तववादी शैलीत त्यांनी प्रावीण्य संपादित केले होते. त्या काळात इंग्लंडला जाऊन रॉयल अकॅडमीत शिक्षण घेणे याला मोठीच प्रतिष्ठा होती व १९२८ साली तसा योगही आला; परंतु काही अपरिहार्य कारणामुळे बापूराव इंग्लंडला जाऊ शकले नाहीत. काही काळ त्यांनी नागपूरच्या धनवटे हायस्कूलमध्ये शिकविले. या दरम्यान १९३१ मध्ये नागपूर येथे, त्या वेळच्या सी.पी. बेरार या इलाख्याचे उच्चाधिकारी व नागपूरमधील कला-रसिकांनी तरुण बापूराव आठवलेंना नागपुरात कला-शिक्षण देणारी संस्था सुरू करण्याची सूचना केली. त्यानुसार १ जुलै १९३१ रोजी पटवर्धन हायस्कूलमध्ये ‘नागपूर स्कूल ऑफ आटर्स’ नामक संस्थेची स्थापना झाली. बापूराव आठवलेंचे हे नागपूर स्कूल ऑफ आटर्स १९३१ पासून १९७२ पर्यंत ४० वर्षे अव्याहतपणे कलाशिक्षणाचे कार्य करीत होते.

त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती संपादन केली. एस.एच.रझा, एच.ए.गाडे, बी. प्रभा ही यांतील काही प्रमुख नावे होत. याच काळात त्यांनी मा.कृष्णराव व बालगंधर्वांसारख्या ख्यातनाम गायक व नटश्रेष्ठांच्या मैफलीत साथ करून रसिकांची दाद मिळविली.

याशिवाय बापूराव आठवलेंनी विदर्भ साहित्य संघासाठी अनेक व्यक्तिचित्रे रंगविली असून त्यांतील टिळक, आगरकर, राम गणेश गडकरी, भास्करबुवा बखले, केशवराव दाते ही विशेष उल्लेखनीय आहेत. नागपुरातील रवी भवनातील महात्मा गांधींचे सात फूट उंचीचे चित्र व दादासाहेब धनवटे यांचे पूर्णाकृती व्यक्तिचित्र त्यांच्या व्यक्तिचित्रणकलेतील कौशल्याची साक्ष देते. बापूराव आठवले यांनी नागपूरमध्ये कलाशिक्षणाचा पाया घातला व ते कार्य प्रसिद्धी-पराङ्मुख राहून मोठ्या कष्टाने व निष्ठेने चालविले. म्हणूनच  बापूराव आठवले हयात असेपर्यंत एस.एच. रझांसारखे पॅरिस येथे स्थायिक झालेले चित्रकार ज्या-ज्या वेळी भारतात येत, त्या-त्या वेळी आवर्जून नागपूर येथे जाऊन आपले गुरू बापूराव आठवले यांना भेटत. विदर्भामध्ये त्यांनी दृश्यकलेबाबतची जाण निर्माण केली हे त्यांचे महत्त्वाचे कार्य आहे.

              -सुहास बहुळकर

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].