Skip to main content
x

बाळ, दत्ता

     दत्ता बाळ यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. शिक्षणमहर्षी मल्हारराव देसाई यांचे हे द्वितीय चिरंजीव. 

वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी दत्ता बाळ यांनी कोल्हापूर येथे विजयादशमीच्या सुमुहूर्तावर (१९ ऑक्टोबर १९६१) ‘दत्ता बाळ मिशन डिव्हाइन’ या नावाची संस्था स्थापन केली. त्यांनी भारतभर प्रवास केला. अनेक थोर आध्यात्मिक विभूतींच्या भेटी घेतल्या. त्यांत श्री अरविंदाश्रमाच्या माताजी, श्री आनन्दमयी माँ, काननगडचे श्री रामदास, हृषीकेशचे स्वामी शिवानंद, दिलीपकुमार रॉय, जे. कृष्णमूर्ती, स्वामी स्वरूपानंद यांचा समावेश आहे.

दत्ता बाळ यांचे द्रष्टेपण, क्रांतिकारक विचारसरणी व विज्ञानाधिष्ठित तत्त्वचिंतन पाहून मोठमोठे विचारवंत म्हणाले, ‘‘दत्ता बाळ हे आत्मदर्शी तत्त्वज्ञ व क्रांतिकारी संत आहेत. दिव्य प्रेमाचे ते प्रेषितच आहेत!’’ जपानच्या जागतिक धर्म परिषदेत त्यांनी भाग घेतला होता. (१६ ते २२ ऑक्टोबर १९७०) या परिषदेत हिंदू धर्माला अस्पृश्यता मान्य असल्याची टीका करण्यात आली तेव्हा दत्ता बाळांनी त्यांना उत्तर दिले होते, ‘‘जड-चेतनात्मक विश्वाची एकात्मता मानणार्‍या धर्माला अस्पृश्यता कशी मान्य होईल? खरा धर्म व रूढी यांतील अंतर ध्यानात घ्यायला हवे. धर्माच्या वृक्षावरील बांडगुळे म्हणजे रूढी होत!’’

त्यांनी या धर्म परिषदेत अत्यंत मौलिक चिंतन दिले. ते म्हणाले, ‘‘प्रत्येक व्यक्तीला ‘विश्वाच्या एकात्मतेची जाणीव’ होईल असे शिक्षण द्यायला हवे. तशी जाणीव झाली तर त्याच्या ध्यानात येईल, की एकात्मतेच्या चिन्मय सागरावरील आपण एक लहानशी लाटमात्र आहोत! ही जाणीव जीवनाच्या सर्व अंगोपांगांतून प्रकट व्हावी. याचा अर्थ, या जाणिवेतून जीवनाचे मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राजकारण ही सर्व अंगे अभिव्यक्त व्हावीत!’’

जपानबरोबर, बँकॉक, इंग्लंड, अमेरिका या ठिकाणीही त्यांची प्रभावी व्याख्याने झाली. जपानच्या जागतिक धर्म परिषदेकडून परतल्यावर दत्ता बाळ यांचे महाराष्ट्रात अभूतपूर्व स्वागत झाले. स्वामी विवेकानंदांना जपानचे निमंत्रण आले होते; पण प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे ते जपानला जाऊ शकले नाहीत. ते अपुरे कार्य दत्ता बाळांनी जणू पूर्ण केले. धर्म परिषदेच्या काळात जपानी प्रमुख वृत्तपत्रांत पहिल्याच पानांवर त्यांची दोन छायाचित्रे झळकली होती! या अविस्मरणीय कार्यानेच त्यांना ‘महाराष्ट्राचे विवेकानंद’ म्हणूनच लोक ओळखू लागले. आजचे निसर्ग-अभ्यासक वृक्षसंगोपनाबद्दल जे कार्य करीत आहेत, ते विचार दत्ता बाळ लहानपणासून सांगत आले. त्यांचे ‘वृक्ष माझा सांगाती’ हे पुस्तक म्हणजे ‘वृक्षोपनिषद’ व्हावे, इतके सुंदर आहे. ती त्यांची अनुभूतीच आहे. याबाबत दत्ता बाळ म्हणतात, ‘‘त्यांना सूर्यप्रकाश, खतपाणी यांप्रमाणे जिवंत भावनांचीही जरुरी आहे. जर सूर्यप्रकाश त्यांचे अन्न असेल, तर आपल्या भावना त्यांचे अमृत आहे.’’

विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेमध्ये श्री गुरुजी, स्वामी चिन्मयानंद यांच्या समवेत दत्ता बाळ यांचाही समावेश होता. पंढरपूर येथे संपन्न झालेले पहिले विश्व हिंदू परिषद संमेलन दत्ता बाळ यांच्या प्रखर हिंदुत्व विचारांनी खूपच गाजले. दत्ता बाळ यांच्यामध्ये खलील जिब्रानच्या तत्त्वचिंतनाची गंभीरता, रवींद्रनाथांची उत्स्फूर्त सौंदर्यदृष्टी आणि स्वामी विवेकानंदांचे द्रष्टेपण यांचे एक अद्भुत रसायन तयार झाले होते. दत्ता बाळ यांचे विचार श्रद्धेतून आणि सखोल आत्मानुभूतीतून प्रकट होत. त्यांचे विचार ऋतंभरा प्रज्ञेतून आणि उत्स्फूर्त प्रतिभेतून काव्यात्म रूप घेऊनच अवतरत. त्यांचे काही विचार उद्याच्या जगताला आकार देणारे, द्रष्टेपणाचे आहेत.

दत्ता बाळ यांनी महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या वैचारिक जगतात विज्ञानाधिष्ठित अध्यात्माचे नवे दालन उघडले. समग्र सृष्टीशी संवादमयता, विश्वात्मक संवेदनशीलता आणि प्रेम-प्रक्षेपणक्षमता हे त्यांच्या जीवनदर्शनाचे हृदयधर्म आहेत. असा दत्ता बाळ हा बुलंद आवाज अवघ्या ४१ वर्षांच्या वयात अनंतात विलीन झाला.

 — डॉ. वि.य. कुलकर्णी , रवींद्र पाटसकर

बाळ, दत्ता