Skip to main content
x

बाळ, विद्या

पूर्वाश्रमीच्या सुधा केशव केळकर म्हणजेच विद्या बाळ यांचे बी. ए. पदवीचे शिक्षण अर्थशास्त्रातून पूर्ण झाले. ‘स्त्री’ मासिकात संपादक म्हणून कामाला सुरुवात केली. तीन वर्ष मुख्य संपादक म्हणून काम केले. ‘मिळून साऱ्याजणी ’ या मासिकाच्या पहिल्या अंकापासून (१९८९) संपादक, नारी समता मंच या संघटनेच्या संस्थापक, ग्रामीण स्त्रियांसाठी राबवल्या जाणाऱ्या ‘ग्रोइंग टुगेदर’ या प्रकल्पात प्रकल्पप्रमुख, म्हणून काम केले. स्त्रीविषयक परिषदांच्या निमित्ताने अनेक देशांना भेटी दिल्या.

लिखाणाची सुरुवात कथालेखनाने केली. परंतु त्यानंतरच्या काळात विविध क्षेत्रांत भेटलेली माणसे आणि त्यांचे प्रश्न अधिक अर्थपूर्ण वाटल्यामुळे त्यासंबंधीचे स्फुटलेखन केले. सामाजिक बांधिलकीची भावना आणि स्त्रीविषयक अन्यायाची जाणीव हा त्यांच्या सर्व लिखाणाचा गाभा आहे. आजूबाजूला घडणार्‍या घटना, परिषदा, नाटक, साहित्य यांमधून उपस्थित केलेले प्रश्न यासंबंधी लेखन केले. लिखाण करत असतानाच अंधश्रद्धा निर्मूलन, नर्मदा बचाव, पर्यायी विकासनीती यांसारख्या चळवळींत सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे सामाजिक प्रश्नांविषयीची जाणीव अधिक टोकदार आणि परिपक्व होण्यास मदत झाली. स्त्री-मुक्तीची चळवळ ही समाजपरिवर्तनाची चळवळ आहे, हे ओळखून लिंगभावविरहित समाजाच्या निर्मितीसाठी सातत्याने प्रबोधन आणि लेखन केले. संपादकीय लेखन हे अनेक व्यक्तींशी संवाद प्रस्थापित करण्याचे प्रभावी माध्यम कसे ठरू शकते याची जाणीव त्यांचे लिखाण वाचताना आणि त्याला मिळालेला प्रतिसाद वाचताना होते. त्यांची ‘शोध स्वतःचा’ (१९८४), ‘संवाद’ (१९९२ ‘तुमच्या माझ्यासाठी’ (१९९६), ‘साकव’ (२००२) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

स्त्रियांवरील अत्याचाराच्या विरोधात स्त्री-पुरुषांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता जाणून ‘नारी समता मंच’ या संघटनेमध्ये पुरुषांना सभासदत्व खुले ठेवले. या संघटनेद्वारा १९८९साली एकट्या राहणार्‍या स्त्रियांची परिषद भरविण्यात आली. एकटे राहताना स्त्रियांच्या वाट्याला येणारे दाहक अनुभव, त्यांनी केलेला प्रतिकार आणि कमावलेली आत्मनिर्भरता या सर्व अनुभवांचे संकलन आणि संपादन त्यांनी ‘अपराजितांचे निःश्‍वास’ (१९९४) या पुस्तकात केले तर ‘डॉटर्स ऑफ महाराष्ट्र’ (१९९७) या संपादित ग्रंथात महाराष्ट्रातील श्रेष्ठ स्त्रियांच्या कर्तृत्वाची ओळख करून दिली आहे. याशिवाय ‘तेजस्विनी’, ‘जीवन हे असे आहे’, ‘रात्र अर्ध्या चंद्राची’ या अनुवादित कादंबर्‍या आणि ‘कमलाकी’ (१९७२) हे चरित्र प्रसिद्ध आहे. ‘कमलाकी’मध्ये वैधव्य आणि अनेक अडचणींसह मनस्वी आयुष्य जगताना स्त्री-शिक्षणासाठी झटणार्‍या आणि परदेशात जाऊन डॉक्टरेट मिळवणार्‍या कमलाबाई देशपांडे यांच्या धडाडीचे चित्रण आहे.सामाजिक प्रश्नांचे सहृदय आणि वस्तुनिष्ठ आकलन त्यांच्या सर्व लिखाणाच्या केंद्रस्थानी आहे.

- मृणालिनी चितळे

बाळ, विद्या