Skip to main content
x

भागवत, वामन बाळकृष्ण

       वामन बाळकृष्ण भागवत यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील चाफळ येथे झाला. सहा महिन्यांचे असतानाच त्यांचे मातृछत्र हरपले. व्हर्नाक्युलर फायनल म्हणजे इयत्ता ७वीची परीक्षा त्यांनी चाफळला दिली. त्यानंतर ते इचलकरंजीला पंडित लक्ष्मणशास्त्री जोशी-मुरगुडकर यांच्या पाठशाळेत दाखल झाले आणि तेथे त्यांनी व्याकरणाचे पारंपरिक पद्धतीने अध्ययन केले. पुढे न्यायाचे अध्ययन वाराणसीला गणपतीशास्त्री हेब्बार यांच्याकडे, तर वेदान्ताचा आणि मीमांसेचा अभ्यास वाईला ब्रह्मस्वरूप केवलानंद यांच्याकडे केला. याच अध्ययनाबरोबर त्यांनी व्याकरणरत्न (बडोदा), व्याकरणचूडामणि (वेदशास्त्रोत्तेजकसभा, पुणे) व व्याकरणपारंगत (टि.म.वि.,पुणे) या परीक्षा दिल्या व त्यात अत्युच्च श्रेणी मिळवली.

     त्यानंतर त्यांनी प्रथम कर्‍हाड, मग पुणे येथे अध्यापनकार्य सुरू केले. अध्यापनाचा प्रवास माध्यमिक स्तरापासून विद्यापीठीय स्तरापर्यंत आहे. वयाच्या ८५ वर्षापर्यंत त्यांनी अध्यापनाचे कार्य अव्याहतपणे केले. अध्यापन हेच आपले जीवनकार्य त्यांनी मानले आणि स्वत:ला ‘शिक्षक’ संबोधून घेण्यातच त्यांना आनंद वाटत होता.

     १९४७मध्ये टि.म.वि.त सुरू झालेल्या बालमुकुंद संस्कृत महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा त्यांनी तीस वर्षे समर्थपणे सांभाळली. शिवरामकृष्ण शास्त्री यांच्याकडून न्याय शिकण्यासाठी पन्नाशीनंतरही ते डेक्कन महाविद्यालयात जात असत.

     संस्कृतचा प्रचार व प्रसार या दृष्टीने त्यांनी केलेले महत्त्वाचे कार्य म्हणजे प्रसार परीक्षांची सुरुवात. संस्कृत म्हणजे बुद्धिमान, विद्वज्जड अशांसाठी असलेला विषय ही समजूत बदलण्यासाठी त्यांनी विद्यार्थि वयोगटानुसार श्रेणीबद्ध पाठ्यपुस्तके तयार केली व रोचक सुभाषितांचा त्या पुस्तकांत समावेश केला. या परीक्षांमुळे संस्कृत सामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. यात पारंपरिक अभ्यास होताच, पण नवीन पद्धतीने शिकवला जाऊ लागल्यामुळे संस्कृत अध्ययनाची गोडी लागण्यास मोठी मदत झाली. सबंध महाराष्ट्रातून या परीक्षांना मोठा प्रतिसाद मिळाला.

     शालेय विद्यार्थ्यांपासून पदव्युत्तर विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना मुक्तद्वार असणार्‍या संस्कृत स्पर्धांची योजना त्यांनी केली. तीन मिनिटांच्या गोष्टीपासून ते वादविवाद, स्मरणशक्ती, वाक्यसंयोजन, समस्यापूर्ती, अन्त्याक्षरी अशा अनेक प्रकारचा त्यात समावेश होता. हेतू हा की विद्यार्थ्यांना संस्कृत बोलण्याचा सराव व्हावा. अशा स्पर्धांमुळे आत्मविश्वासपूर्वक बोलण्यासाठी टिळक विद्यापीठातील एक छोटे व्यासपीठच उपलब्ध झाले. १९६४सालापासून गुरुजींनी राष्ट्रीय स्तरावर शास्त्र प्रतियोगितांसाठी विद्यार्थी पाठवण्यास सुरुवात केली.  या विद्यार्थ्यांची तयारी त्यांनी इतक्या कसोशीने करून घेतली की, या प्रतियोगितांमध्ये १० वर्षे महाराष्ट्राला पारितोषिके मिळाली.

    बिनभिंतींची शाळा या संकल्पनेप्रमाणे बिनपुस्तकांचा अभ्यास ही संकल्पना त्यांनी रुजवली. रोज ते एक नवीन श्लोक सांगत. यात प्रथम पदे पाडणे, क्रियापद हुडकणे, अन्वयार्थ लावणे असे सर्व पद्धतशीर काम चाले. तो श्लोक लिहून न घेता दुसर्‍या दिवशी पाठ म्हणून दाखवल्यावर पुढचा नवा श्लोक ते सांगत. त्यामुळे प्रत्येक ग्रंथाच्या आरंभीचा श्लोक, अनेक प्रहेलिका किंवा कोडी, सुंदर अर्थचमत्कृती, कल्पनाचमत्कृती असलेले अनेक श्लोक विद्यार्थ्यांना पाठ झाले.

    संस्कृत शिकवणार्‍या शिक्षकांच्या अडीअडचणी जाणून, शासनाकडे पाठपुरावा करून शिक्षकांसाठी मे महिन्यात प्रशिक्षणवर्ग चालू केले. यामुळे ग्रमीण भागातल्या विद्यार्थ्यांची संस्कृत शिक्षणाची सोय झाली. त्यांचे एक महत्त्वाचे योगदान म्हणजे श्रद्धाजाड्यं परित्यज्य... यानुसार त्यांनी संस्कृतचे अध्ययन अबौद्धिक पाठांतरावरून वेगळ्या दिशेला नेले. वेळेचा सदुपयोग आणि नियोजन यांवर त्यांचा फार मोठा भर होता.

    जुन्या पद्धतीने अध्ययन करूनसुद्धा त्यांच्या शिकवण्यात आग्रही वृत्ती नव्हती. ऋजू आणि मृदू व्यक्तिमत्त्व आणि पांडित्य या दोन्हींचा योग्य समन्वय त्यांच्या ठायी होता. स्वत:चे मत निश्चितपणे पण अनाग्रही वृत्तीने ते मांडत. परमसहिष्णुवृत्तीने दुसर्‍याच्या मताचाही आदर करत. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांपैकी महत्त्वाचे म्हणजे भर्तृहरीच्या वाक्यपदीयाच्या ब्रह्मकाण्डाचे सविस्तर विवेचनासह केलेले मराठी भाषांतर होय. पाणिनीय व्याकरणाचा परिचय व अंतरंग ही पुस्तकेही अभ्यासकांना फार उपयोगी ठरलेली आहेत. परमलघुमंजुषेचेही मराठी भाषांतर त्यांनी केले. ही सर्व पुस्तके टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने प्रकाशित केलेली आहेत.

    पुस्तकांबरोबरच ज्ञानाचा हा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी सिद्धान्तकौमुदी आदी ग्रंथांचे विवेचन करणार्‍या सुमारे १००० ध्वनिफिती तयार केल्या आणि त्या टिळक विद्यापीठाकडे सुपुर्द केल्या. हे विद्यापीठाचे कायमचे ज्ञानभांडार ठरले. विद्यापीठानेही त्याचे आता संचयिकेत (सीडी) रूपांतर केलेले आहे.

    या सर्व कार्याची दखल विद्वान व शासन यांनी घेतली. १९७५साली त्यांना राज्य सरकारचा आदर्श शिक्षक हा गौरव पुरस्कार मिळाला. तर १९९९मध्ये त्यांचा ‘राष्ट्रीय पंडित’ म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव झाला. २००२साली तिरुपति विद्यापीठाने, तर २००३साली टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना डी.लिट. ही पदवी बहाल केली.

    १९९८साली शृंगेरी येथील विद्वत्सभेत श्रीमद्भारतीर्थशंकराचार्य यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. याबरोबरच गोवा सरकारकडून सांदीपनी पुरस्कार, (उत्तर प्रदेश), श्रीपर्वतीदेवदेवेश्वर संस्था, (पुणे) या व इतर अनेक संस्थांकडील पुरस्कार त्यांनी आदराने पण थोड्याशा अलिप्तपणे स्वीकारले. गुरुजी म्हणत ‘उपकार ही भावनासुद्धा गळून जायला पाहिजे म्हणून ‘तुका म्हणे आता, उरलो उपयोगापुरता’ हीच भावना आयुष्यात असावी’, तसेच ते जगले.

डॉ. हेमा डोळे

भागवत, वामन बाळकृष्ण