Skip to main content
x

भावे, पुरुषोत्तम भास्कर

     पुरुषोत्तम भास्कर भावे यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांचे वडील भास्कर भावे हे ख्यातनाम डॉक्टर होते. बालपणीच आईचे निधन झाल्यामुळे पु.भा. भाव्यांचे संगोपन त्यांच्या आजोबांनी केले. नागपूरच्या हिस्लॉप आणि लॉ कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

     पु.भा. भावेंना शालेय जीवनापासून लेखनाची आवड होती. ‘फुकट’ ही त्यांची पहिली कथा ‘किर्लोस्कर’ मासिकात प्रकाशित झाली, तेव्हा ते पंधरा वर्षांचे होते. कट्टर हिंदुत्ववादी पत्रकार म्हणून ते पुढे नावारूपाला आले. त्यांनी ‘सहदेवा, अग्नी आण’, यासारखे जळजळीत राजकीय लेख लिहिले. ‘रक्त आणि अश्रू’ या संग्रहात ते समाविष्ट आहेत. आक्रमक आणि प्रखर शैलीचा पत्रकार म्हणून आरंभीच्या काळात नावारूपाला आलेले भावे नंतर कथाकार म्हणून गाजले. नवकथेच्या आद्य प्रवर्तकांमध्ये त्यांचा समावेश करावा लागेल.

     ‘पहिला पाऊस (१९४६) या पहिल्याच कथासंग्रहाने त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांचे एकूण २६ कथासंग्रह प्रसिद्ध झाले. ‘स्वप्न’ (१९४८), ‘सतरावे वर्ष’ (१९४९), ‘ध्यास’ (१९५०), ‘फुलवा’ (१९५३), ‘मुक्ति’ (१९५४), ‘देव्हारा’ (१९५६), ‘बंगला’ (१९५६), ‘रूप’ (१९५६), ‘वैरी’ (१९६२), ‘हिमानी’ (१९६६), ‘ओवाळणी’ (१९६८), ‘प्रेम’ (१९७३), ‘आवर्त’ (१९७७) हे त्यांचे कथासंग्रह विशेष गाजले.

     भावनाप्रधान, विलक्षण संवेदनक्षम आणि तत्काळ प्रतिक्रिया नोंदविणारी पात्रे हे भाव्यांच्या कथेतील पात्रांचे खास वैशिष्ट्य. पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी हिंदू-मुसलमानांमध्ये भडकलेला संघर्ष, बदलती मूल्यव्यवस्था स्वीकारायला तयार नसलेली परंपराप्रिय मानसिकता, स्त्री-पुरुष नात्यांतील गुंतागुंत यांसारखे विषय पु.भा.भाव्यांच्या कथेच्या केंद्रस्थानी आढळतात. उपदेशपर कथांचा बाज भाव्यांनी नाकारला. घटना, कथानक यापेक्षाही मानवी नातेसंबंधांतील अर्थता आणि अनर्थता समर्थपणे टिपत, स्वतःच्या वेगळ्या शैलीत भाव्यांनी मांडलेल्या कथा लोकप्रिय झाल्या.

     कथाकार म्हणून नावारूपाला येत असताना भाव्यांनी कादंबर्‍या आणि नाटकेही लिहिली. त्यांच्या सतरा कादंबर्‍या आणि आठ नाटकेही प्रसिद्ध आहेत. त्यांची ‘विषकन्या’ (१९४४), ‘स्वामिनी’ (१९५६), ‘पडछाया’ (१९६०), ‘महाराणी पद्मिनी’ (१९७१) इत्यादी नाटके प्रसिद्ध झाली. ‘अकुलिना’ ही भाव्यांची पहिली कादंबरी १९५० साली प्रसिद्ध झाली. पुढे त्यांनी याच कादंबरीवर आधारित नाटकही लिहिले.

     स्त्री-पुरुषांमधले शारीरिक आकर्षण, वाढत जाणार्‍या अपेक्षा, त्यांतून वाट्याला येणारी हतबलता आणि खिन्नता अशा चक्रात सापडलेली माणसे भाव्यांच्या कादंबर्‍यांमध्ये दिसतात. स्वातंत्र्योत्तर कालखंडात एकत्र कुटुंबव्यवस्था नष्ट झाली. विभक्त झालेल्या कुटुंबांत राहणार्‍या माणसांच्या एकटेपणाचे पदर, तुटलेपणाची भावना आणि पारंपरिक श्रद्धा आणि संस्कारांना हादरे बसल्यामुळे व्यथित झालेल्या माणसांची सैरभैरता त्यांच्या अनेक कादंबर्‍यांच्या केंद्रस्थानी आहे. ‘अंतराळ’ (१९५७), ‘वर्षाव’ (१९५८), ‘आग’ (१९६२), ‘रोहिणी’ (१९६२), ‘चोरांचा बाजार’ (१९६३), ‘अडीच अक्षरे’ (१९६३), ‘जादूचे पाणी’ (१९६८), ‘व्याघ्र’ (१९७०), ‘दोन भिंती’ (१९७२) या कादंबर्‍या विशेष गाजल्या. ‘वाकुल्या’ (१९५२), ‘वायबार’ (१९६०) हे लेखसंग्रहही भाव्यांच्या नावावर आहेत.

     भावे हिंदुत्ववादी होते. आपली भूमिका त्यांनी परखडपणे मांडली. पण, साहित्यक्षेत्रात वावरताना ते कलावादी म्हणून वावरले. ‘सावधान’ व ‘आदर्श’ ही दोन वर्तमानपत्रे त्यांनी चालविली. त्यांचे एकूण बारा लेखसंग्रह प्रसिद्ध झाले. ‘वाघनखे’ (१९६१), ‘लवंगवेलदोडे’ (१९६३), ‘आनंदसोपान’ (१९६५), ‘पणत्या’ (१९७०), ‘रांगोळी’  हे त्यांचे इतर स्फुटलेखन प्रसिद्ध आहे. ‘प्रथमपुरुषी एकवचनी’ हे त्यांचे आत्मचरित्र विशेष गाजले.

     आचार्य अत्रे आणि पु.भा. भावे यांच्यातला वाद ‘आदेश खटला’ म्हणून ओळखला जातो. भाव्यांनी आपल्या ‘आदेश’ पत्रातून अत्र्यांवर जळजळीत टीका केली. अत्रेंनी भाव्यांवर खटला भरला. उलटतपासणी करताना अत्र्यांची जास्त बदनामी होऊ लागली. त्यामुळे मित्रांच्या सल्ल्यावरून अत्रेंनी हा दावा मागे घेतला. १९७७ साली पुणे येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भाव्यांनी भूषविले. अभूतपूर्व गोंधळामुळे ते गाजले.

      - प्रा. मिलिंद जोशी

भावे, पुरुषोत्तम भास्कर