Skip to main content
x

भेण्डे, सुभाष वासुदेव

     साठोत्तरी मराठी साहित्यातील चतुरस्र लेखक  सुभाष भेण्डे यांचा जन्म गोव्यातील बोरी येथे झाला. त्यांचे शिक्षण सांगली व पुणे येथे झाले. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅन्ड इकॉनॉमिक्स या संस्थेत डॉक्टरेटचा अभ्यास करताना त्यांना ‘फोर्ड फाउंडेशन स्कॉलरशिप’ मिळाली. वयाच्या सव्विसाव्या वर्षी ‘अ‍ॅग्रिकल्चरल इन्कम टॅक्सेशन इन इंडिया’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पीएच.डी. संपादन केली. हा त्यांचा प्रबंध ‘एशिया पब्लिशिंग हाउस’ने प्रकाशित केला. १९६२ ते १९६८ दरम्यान त्यांनी गोव्याच्या महाविद्यालयात अध्यापन केले. नंतर मुंबईला कीर्ती महाविद्यालयामध्ये ते पंचवीस वर्षे अर्थशास्त्र विभागप्रमुख व नंतर राजस्थान सेवा संघ महाविद्यालयात तीन वर्षे प्राचार्य होते. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट व अ‍ॅकॅडमिक काउन्सिलचे ते अनेक वर्षे सदस्य होते. सध्या ते सारस्वत बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

     विविध स्वरूपाचे लेखन केले असले तरी सुभाष भेण्डे यांची खरी ओळख मराठी साहित्यविश्वात निर्माण झाली ती प्रामुख्याने कसदार कादंबरीकार आणि विनोदी लेखक म्हणून. महाविद्यालयीन जीवनात त्यांची ‘ज्योत’ नावाची कथा प्रसिद्ध झाली आणि लेखनाचा श्रीगणेशा झाला. भेण्डेंचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले १९६४मध्ये. ते ‘स्वर्ग दोन बोटं’ या शीर्षकाचे. या पुस्तकानंतर ‘कागदी बाण’ (१९६६) आणि ‘स्मितकथा’ (१९६९) ही दोन विनोदी पुस्तके प्रकाशित झाली आणि भेण्डेंनी अगदी उमेदीच्या वयातच एक विनोदी लेखक म्हणून आपले स्थान मराठी विनोदी परंपरेत निर्माण केले.

     एकीकडे विनोदी लेखन करीत असतानाच अचानक भेण्डे कादंबरी लेखनाकडे वळले. ‘वीणा’ या दिवाळी अंकासाठी त्यांनी गोवामुक्तिसंग्रामाची पार्श्वभूमी घेऊन मुक्तिसंग्राम आणि त्यानंतरच्या गोमंतकीय जीवनातील परिवर्तने यांचा पट या कादंबरीत मांडला आणि सुभाष भेण्डे कादंबरीकार म्हणून जाणकार वाचकांसमोर आले. त्यांची ही पहिली कादंबरी, ‘आमचे गोय, आमका जाय’ या नावाने १९७०मध्ये प्रकाशित झाली. मराठीतील एक कसदार, प्रादेशिक पार्श्वभूमी असलेली कादंबरी म्हणून मराठी समीक्षकांनी- जाणकारांनी या कादंबरीला पसंतीची पावती दिली. यानंतर मात्र भेण्डेंचे कादंबरीलेखन सातत्याने सुरू राहिले. नंतर ‘अदेशी’ (१९७१), ‘जोगीण’ (१९७४), ‘अंधारवाटा’ (१९७८), ‘चकवा’ (१९८१), ‘पैलतीर’ (१९८२), ‘उद्ध्वस्त’ (१९८४), ‘बॉनसाय’ (१९८८), ‘किनारा’ (१९९४), ‘काजळल्या दिशा’ (२०००) आणि ‘होमकुंड’ (२००७) या कादंबर्‍या प्रसिद्ध झाल्या.

     भेंण्ड्यांच्या या कादंबर्‍यांचे विषय विविधस्वरूपी आहेत. या कादंबर्‍यांना जशी गोमंतकाची पार्श्वभूमी आहे, तशीच मुंबईचीही पार्श्वभूमी आहे. तसेच या कादंबर्‍यांचे विषयही आजच्या जगण्याशी विविधांगांनी नाते सांगणारे आहेत. गोवा, गोवामुक्ती, गोव्यातील जनजीवनाचे बदलते पोत मांडणार्‍या कादंबर्‍या (आमचे गोय, आमकाजाय, जोगीण, चकवा, उद्ध्वस्त आणि होमकुंड); ब्रेनड्रेनची समस्या (अदेशी); आजच्या बदलत्या महानगरीय, स्पर्धात्मक उद्योगाच्या क्षेत्रातल्या कादंबर्‍या (अंधारवाटा, किनारा); शिक्षणक्षेत्रातील भ्रष्ट प्रवृत्तींचे चित्रण (बॉनसाय), वृत्तपत्रव्यवसायातील काजळलेल्या निष्ठा आणि नैष्ठिकतेचा संघर्ष (पैलतीर); दलित चळवळीतील कृतक निष्ठा आणि राजकारण (काजळल्या दिशा) हे या कादंबरीविश्वाचे ज्वलंत विषय आहेत. आपल्या अवतीभोवतीच्या जगण्यातील सारे ताणेबाणे, पदर अधिक प्रामाणिकपणे आणि नैष्ठिकपणे आपल्या कादंबर्‍यांमध्ये मांडण्याचा प्रयत्न सुभाष भेण्डे यांनी केला आहे. जीवनातील अनेक क्षेत्रांत होणारा मूल्यांचा र्‍हास त्यांना अस्वस्थ करतो.

     कादंबरी वाङ्मयाच्या पाठोपाठच भेण्डे यांनी विपुल असे विनोदी लेखन केले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, चिं.वि.जोशी, पु.ल.देशपांडे या मराठीतील विनोदी वाङ्मयीन परंपरेत सुभाष भेण्डे यांनी आपले स्थान निश्चित केले आहे. मानवी जीवनातील विसंगतीवर हलकीफुलकी टिपण्णी करीत नर्मविनोदी अंगाने समाजाकडे पाहत, त्यांच्यातल्या विनोदकाराने लेखन केलेले आहे. ‘स्वर्ग दोन बोटं’ (१९६४), ‘कागदी बाण’ (१९६६), ‘दिलखुलास’ (१९७५), ‘जित्याची खोड’ (१९७५), ‘हसवेगिरी’ (१९७८), ‘हास परिहास’ (१९७८), ‘झारीतला शुक्राचार्य’ (१९७९), ‘द्राक्ष आणि रुद्राक्ष’ (१९८४), ‘सुरस आणि चमत्कारिक’ (१९८८), ‘जेथे जातो तेथे’ (१९९०), ‘पितळी दरवाजा’ (१९९३), ‘हलकंफुलकं’ (१९९६), ‘मयसभा’ (१९९९), ‘हास्ययात्रा’ (२०००) आदी विनोदी लेखसंग्रह त्यांच्या नावावर जमा आहेत.

     कादंबरी आणि विनोदी लेख या सोबतच भेण्डे यांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह ‘लांबलचक काळीशार सावली’ या शीर्षकाखाली १९८०मध्ये प्रकाशित झाला. कथेसोबतच त्यांनी प्रवासवर्णन या वाङ्मयप्रकारातही आपली प्रतिमा स्वतंत्रपणे उमटू शकेल अशी प्रवासवर्णने लिहिली आहेत. ती ‘चंषक आणि गुलाब’ (१९८०), ‘गड्या आपुला गाव बरा’ (१९८५) आणि ‘पुण्याई’ (२००७) या शीर्षकांनी प्रकाशित झाली आहेत. ‘मोनिकाच्या धमाल कथा’ (१९९२) हा बालकथासंग्रह, ‘कुमाँऊचे नरभक्षक’ (१९८२) हा जिम कॉर्बेटच्या पुस्तकाचा अनुवाद, ‘साहित्य आणि संस्कृती’ हा समीक्षालेखसंग्रह, ‘ऐसी कळवळ्याची जाती’ (२००१) हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक आणि ‘धनंजयराव गाडगीळ: व्यक्ती आणि कर्तृत्व’ (२००६) हे चरित्र, ही त्यांची प्रकाशित साहित्यसंपदा आहे.

     सुभाष भेण्डे यांनी जसे विविध वाङ्मयप्रकार ललित साहित्याच्या प्रांतात हाताळले, तसेच संपादनासारखे काहीसे वेगळ्या वाटेने जाणारे कार्यही केले आहे. या कार्यातून पूर्वसूरी, समकालीन व्यक्तींबद्दलचा, साहित्यिकांबद्दलचा त्यांचा आदरच व्यक्त होतो, असे दिसते. ‘अ.का. प्रियोळकर स्मृतिग्रंथ’ (१९७४), ‘स्मृतिपूजा, प्रभावती भावे’ (१९८८), ‘गंभीर आणि गमतीदार’ (१९९०), ‘बेस्ट ऑफ जयवंत दळवी’ (१९९५), ‘महाराष्ट्राची मानचिन्हे’ (१९९६-२०००) खंड १ व २, सहलेखक प्रा.एकनाथ साखळकर, इत्यादी संपादनांतून व्यक्ती- समाज, समकालीन वाङ्मयीन विश्वाविषयीचा आस्थाभाव आणि निरपेक्ष, निष्पक्ष भूमिका इत्यादी संपादक म्हणून सुभाष भेण्डे यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते. या लेखनासोबतच सुभाष भेण्डे यांनी त्यांच्या ‘अंधारवाटा’ या कादंबरीवर आधारित ‘मार्ग सुखाचा’ (१९८४) हे नाटक लिहून मराठी नाट्यक्षेत्रात नाटककार म्हणून आपल्या वेगळ्या लेखनप्रकृतीची ओळख पटवून दिली.

     सुभाष भेण्डे यांच्या काही कादंबर्‍यांचे हिंदीमधून अनुवादही प्रकाशित झाले आहेत. ‘भिक्षुणी’ (जोगीण), ‘अनजानी राहें’ (अंधारवाटा), ‘कुछ तो वजह है’ (अदेशी) या नावांनी हे अनुवाद प्रकाशित झाले आहेत. ‘पैलतीर’, ‘ती वाट दूर जाते’, ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या दूरदर्शन मालिकांसाठीही त्यांनी लेखन केले .

     सुभाष भेण्डे यांच्या या लेखनप्रवासात त्यांच्या अनेक पुस्तकांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांपैकी ‘जोगीण’, ‘चषक आणि गुलाब’, ‘मार्ग सुखाचा’, ‘बॉनसाय’ (याचा कानडी अनुवादही प्रकाशित झाला आहे), ‘हलकंफुलकं’ आणि ‘होमकुंड’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार, ‘अदेशी’ आणि ‘जोगीण’ या कादंबर्‍यांना गोवा कला अकादमीचा पुरस्कार, ‘किनारा’ला गोमंतक मराठी अकादमी पुरस्कार, ‘काजळल्या दिशा’ ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शंकर पाटील पुरस्कार, ‘जेथे जातो तेथे’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चिं.वि.जोशी पुरस्कार, नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांच्या लेखनकर्तृत्वाचा गौरव केला आहे. या विविध साहित्य पुरस्कारांसोबतच सुभाष भेण्डे यांना विविध सन्मानांनीही गौरवान्वित केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश निर्मिती मंडळावर सदस्य, नॅशनल बुक ट्रस्टतर्फे ‘लेखक तुमच्या भेटीला’ मध्ये सहभाग, वळवई येथे भरलेल्या एकविसाव्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, २००३मध्ये कराड येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे त्यांच्या यशःशिखरावरील काही शिरपेच म्हणून नोंदवता येतील. ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण- शिल्पकार चरित्रकोश’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील ‘साहित्य’ खंडाच्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली .

     कथा, कादंबरी, विनोद, संपादन, प्रवासवर्णन इत्यादी वाङ्मयप्रकारांत आपल्या लेखनाचा स्वतंत्र ठसा उमटविणार्‍या या लेखकाला जीवनातील नावीन्याचा शोध घेण्याची सतत आस्था आहे. सामाजिक, राजकीय स्थित्यंतरे आणि त्यातून घडत, घसरत, उभा राहणारा माणूस हे सुभाष भेण्डे यांच्या गंभीर लेखनाचे सूत्र आहे, असे म्हणता येईल.

     - डॉ. रवींद्र शोभणे

भेण्डे, सुभाष वासुदेव