Skip to main content
x

भोळे, भास्कर लक्ष्मण

     भास्कर लक्ष्मण भोळे यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील तालखेड येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण जळगाव जिल्ह्यातील वरणागाव येथे झाले. औरंगाबादचे मिलिंद महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे त्यांची खरी जडणघडण झाली.

     १९६२मध्ये बी.ए. आणि १९६४मध्ये एम.ए. परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी १९६४-१९७० या कालावधीत मराठवाडा विद्यापीठात अध्यापनाचे काम केले.

      त्यानंतर १९७०पासून ते नागपूर विद्यापीठात दाखल झाले आणि विदर्भ हीच त्यांची कर्मभूमी बनली. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य दर्शनिका समिती इत्यादींचे ते सदस्य होते. याशिवाय त्यांनी ‘समाजप्रबोधन पत्रिका’, ‘आजचा सुधारक’, ‘विचारशलाका’ वगैरे नियतकालिकांच्या सल्लागार मंडळांवर काम केले. हे काम करीत असतानाच त्यांनी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासून त्याच्या ध्येयधोरणांच्या चळवळींचा अभ्यास-संशोधन करून १९८२मध्ये नागपूर विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळवली.

     सुमारे ३०-३५ ग्रंथांची निर्मिती करतानाच त्यांनी विविध विषयांवर वृत्तपत्रांतून ५००हून अधिक लेख लिहिले असून भोळे यांचा कल सामाजिक, राजकीय विश्‍लेषणाकडेच राहिला. ‘नवी घटनादुरुस्ती : अन्वय आणि अर्थ’ (१९७७), ‘दुसरे स्वातंत्र्य’ (१९७७), ‘राजकीय भारत’ (१९७८), ‘सत्तांतर आणि नंतर’ (१९७९), ‘यशवंतराव चव्हाण : राजकारण आणि साहित्य’ (१९८६), ‘महात्मा जोतिराव फुले : वारसा आणि वसा’ (१९९०), ‘शिक्षण आणि संस्कृती’ (१९९२), ‘डॉक्टर आंबेडकरांचा वैचारिक वारसा’ (१९९८), ‘विसावे शतक आणि समता विचार’ (१९९९) हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांनी ‘नवहिंदुत्वाची व्याघ्रमुद्रा’ (१९८९), ‘जातीपातींचे राजकारण’ (१९९८), ‘महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचे राजकीयीकरण : स्वरूप आणि परिणाम’  (१९९८) अशा काही विचारप्रवर्तक पुस्तिका लिहिल्या. सामाजिक अन्यायाविरुद्ध प्रबोधन करणार्‍या फुले-आंबेडकरवादी विचारसरणीशी जवळीक साधणारी भूमिका घेऊन त्यांनी वैचारिक लेखन केले आहे.

     यशवंतराव चव्हाण, रयत शिक्षण संस्था, फुले-आंबेडकर इत्यादी विषयांवर त्यांनी सामाजिक प्रश्‍नांच्या अनुषंगाने समीक्षा लेखन केले आहे. सामाजिक पातळीवरून केलेली त्यांची वाङ्मयीन समीक्षा विशेष गाजली. त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक शिष्यवृत्त्या व पुरस्कार लाभले. त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा  ‘युगांतर’ पुरस्कारही मिळाला. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, विवेकवाद आणि सामाजिक न्याय या तत्त्वांशी बांधिलकी मानून  सामाजिक कार्यात त्यांचा डोळस सहभाग होता. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळी, संस्था उपक्रम व व्यासपीठे यांच्याशी त्यांचा जवळून संबंध होता. सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून त्यांनी लेखन व भाषण या माध्यमांचा वापर केला आहे.

- संपादक मंडळ

भोळे, भास्कर लक्ष्मण