देशमुख, भालचंद्र गोपाळराव
फर्गसन महाविद्यालयामध्ये त्यांचे इंटर सायन्सपर्यंत शिक्षण झाले. वैद्यकीय शिक्षणाकडे जाण्याच्या हेतूने त्यांनी ‘बी’ ग्रुप घेतला होता. पण आपल्या मुलाने प्रशासकीय सेवेत जावे आणि राष्ट्रकार्य करावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. त्यांची इच्छा प्रमाण मानून देशमुखांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि १९५१ मध्ये ते आय.ए.एस.ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
या परीक्षेनंतर दिल्लीला प्रशिक्षण होऊन बडोदा जिल्ह्यात त्यांना पहिली नेमणूक मिळाली. भिवंडीला असिस्टंट कलेक्टर म्हणून बदली झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांचा विवाह झाला आणि गुजरातेत बनासकांठा येथे त्यांची बदली झाली. कलेक्टर व्ही. शंकर यांचे उत्तम मार्गदर्शन मिळून कलेक्टर म्हणून देशमुखांना बढती मिळाली. त्यांची पहिली नेमणूक डांग जिल्ह्यात झाली. १९५७ पर्यंत सहा वर्षे त्यांनी जिल्हा स्तरावर काम केले. १९५८ मध्ये त्यांची केंद्र सरकारच्या सेवेत ‘अंडरसेक्रेटरी कम्युनिकेशन’ म्हणून नेमणूक झाली.
त्याच काळात त्यांना फोर्ड फाउण्डेशनची शिष्यवृत्ती मिळाली आणि एक वर्ष अमेरिकेतील विल्यम महाविद्यालयात त्यांनी अर्थशास्त्रात एम.ए. केले. त्यामुळे परत आल्यावर जेव्हा त्यांची नेमणूक महाराष्ट्रात झाली, तेव्हा अर्थविभाग त्यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यानंतर सामान्य प्रशासन (जनरल अॅडमिनिस्ट्रेशन) खात्यात उपसचिव (डेप्युटी सेक्रेटरी) म्हणून त्यांना कार्यभार सांभाळावा लागला. तो विभाग मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत होता आणि इतर आय.ए.एस. अधिकार्यांच्या कामाकडे लक्ष देणे ही त्यांची जबाबदारी असे. त्यांचा मुख्यमंत्र्यांबरोबर दैनंदिन संबंध येई. त्यामुळे १९७२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्यांना स्वत:चा सचिव म्हणून नेमून घेतले.
पुढे देशमुख यांची मुंबईला महानगरपालिका आयुक्त म्हणून नेमणूक झाली. ती एक अवघड आव्हानात्मक जबाबदारी होती. तेथे त्यांना नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष पुरविता आले. त्यासाठी त्यांनी आपली स्वत:ची एक पेटी ठेवली. त्या पेटीत कोणीही महानगरपालिकेसंबंधी तक्रार वा सूचना टाकू शकत असे. देशमुख त्याची स्वत: दखल घेत.
त्यानंतर केंद्रामध्ये गृहखात्यात अतिरिक्त सचिव म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्या वेळी यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर काम करताना त्यांना चांगला अनुभव आला. तेथून लेबर सेक्रेटरी म्हणून देशमुखांची बदली झाली व त्या काळात आय.एम.ए.चा अध्यक्ष म्हणून त्यांना एक वर्ष काम करण्याची संधी मिळाली. पुढे पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांची कॅबिनेट सेक्रेटरी या स्थानावर नेमणूक केली. या काळात कॅबिनेट सेक्रेटरीच्या पदाला पूर्वीची प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त झाली. हे पद भूषवून निवृत्त झाल्यानंतर सत्तेशी संबंधित असे कोणतेही पद स्वीकारण्याचे देशमुखांनी कटाक्षाने टाळले.
१९९९ मध्ये फारुख अब्दुल्ला यांनी त्यांना जम्मू व काश्मीरमध्ये राज्यपालपद स्वीकारण्याविषयी विचारले असता देशमुखांनी निर्धारपूर्वक नकार दिला. कारण पूर्वी राज्यपालांच्या नेमणुका करण्याची कामगिरी त्यांच्याकडे होती. त्यामुळे नंतरच्या काळात एखादे काम स्वीकारायचे तर ते त्याच तोलामोलाचे असणे आवश्यक होते. नशिबाने तशी संधी त्यांच्याकडे चालून आली.
भारतीय उद्योगातील सर्वश्रेष्ठ अशा टाटा समूहाने त्यांचे सहकार्य मागितले. आता देशमुखांना पैशासाठी काम करायचे नव्हते. त्या दृष्टीने जे.आर.डी. टाटा यांच्याशी त्यांचे बोलणे झाले. त्यांच्या समूहातर्फे चालणार्या सामाजिक कार्यातच केवळ लक्ष घालण्याचे देशमुखांनी मान्य केले आणि टाटा मंडळींनी तो शब्द कायमचा पाळला.
मूळचे पुणेकर असलेले देशमुख १९६१ पासून मुंबईला स्थायिक झाले आणि त्यांनी स्वत:चे घर बांधले. अधूनमधून ते तेथे राहू लागले. त्या दरम्यान त्यांचा अनेक सांस्कृतिक संस्थांशी संबंध आला. जात्याच साहित्य व कला यांची आवड असल्याने एशियाटिक सोसायटी, मॉडर्न आर्ट गॅलरी अशा संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारले. प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम, अग्नी वगैरे अनेक संस्थांशीही ते संबंधित आहेत. त्यांचे स्नेही डॉ. शरच्चंद्र गोखले यांच्या सूचनेवरून कम्युनिटी एड अँड स्पॉन्सरशिप प्रोग्रॅम (कास्प) या संस्थेशी त्यांचा संबंध आला आणि त्याचे त्यांनी नेतृत्व केले.
२०११ साली त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली, त्यानंतर काही दिवसात त्यांचे मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले.