Skip to main content
x

देशमुख, चिंतामण द्वारकानाथ

      चिंतामण द्वारकानाथ (सी. डी.) देशमुख त्यांचा जन्म किल्ले रायगडाजवळील नाते या गावी झाला. त्यांचे वडील  द्वारकानाथ व्यवसायाने वकील, तर आई भागीरथी धार्मिक वृत्तीची गृहिणी होती. आईचे संस्कार आणि वडिलांचे मार्गदर्शन या बळावर चिंतामणीच्या बुद्धिमत्तेने मोठी झेप घेतली. जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती सर्वांत प्रथम मिळवणाऱ्या या विद्यार्थ्याने पुढे देश-परदेशांतल्या सगळ्याच परीक्षांमध्ये अव्वल स्थान मिळवत नंतर आपल्या कारकिर्दीत कार्यक्षम सनदी अधिकारी ते स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री पद भूषवून या देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

      रायगड जिल्ह्यातल्या आडवळणाच्या गावात असूनही खडतर परिस्थितीपुढे हार न मानता वेळप्रसंगी परीक्षेसाठी  मैलोनमैल अंतर पायी तुडवत सी.डी. देशमुखांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिकच्या परीक्षेत ते पहिले आले. केम्ब्रिज विद्यापीठातून १९१७ मध्ये त्यांनी वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र आणि भूगर्भशास्त्र हे विषय घेऊन नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली. विद्यापीठात ते पहिले आले. लगेचच पुढच्या वर्षी म्हणजे १९१८ मध्ये देशमुखांनी भारतीय नागरी सेवा ही परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली.

       नागरी सेवेत दाखल झाल्यानंतर चिंतामणराव देशमुख यांची प्रशासकीय कारकीर्द जवळपास २१ वर्षांची होती. सी.डी. देशमुख यांची पहिली नेमणूक १९१८ मध्ये आत्ताचा विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगड म्हणजेच त्या वेळचा मध्यप्रांत आणि वऱ्हाड या राज्यांत झाली होती. पुढे ते या राज्याचे महसूल सचिव आणि वित्त सचिव या पदापर्यंत पोहोचले. या पदापर्यंत पोहोचणारे ते सर्वांत कमी वयाचे प्रशासकीय अधिकारी असावेत. याच दरम्यान सुट्टीवर लंडनला असताना त्यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेत सचिव म्हणून काम पाहिले होते. या गोलमेज परिषदेत महात्मा गांधीही सहभागी झाले होते. मध्यप्रांत आणि वऱ्हाडच्या वतीने तत्कालीन केंद्र-सरकारला सादर केलेल्या निवेदनाबद्दल त्यांना १९३५ मध्ये केंद्र - राज्य वित्तीय संबंधांसाठीचा पुरस्कार मिळाला होता.

         जुलै १९३९ मध्ये देशमुख यांची नियुक्ती रिझर्व्ह बँकेत लियाझन ऑफिसर म्हणून झाली. भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यातला दुवा म्हणून ते काम पाहू लागले. तीन महिन्यांनंतरच ते केंद्रीय बँक मंडळाचे सचिव झाले. डिसेंबर १९४१ मध्ये रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांनी कारभार स्वीकारला आणि दि. ११ ऑगस्ट १९४३ रोजी सी.डी. देशमुख हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले. ते रिझर्व्ह बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते.

          त्यांच्याच कार्यकाळात दि. १ जानेवारी १९४९ रोजी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण झाले. या परिवर्तनासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया त्यांच्याच देखरेखीखाली पूर्ण झाली.

          १९४९ साली रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण झाले तेव्हा अधिकोषण कंपन्यांच्या नियमांसाठीचे कायदे तयार करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. स्वतंत्र भारताची पहिली वित्तसंस्था, औद्योगिक वित्त महामंडळ अर्थात इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (आयएफसीआय) स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ग्रामीण भागात पतपुरवठ्याची यंत्रणा मजबूत करण्यासाठी देशमुख यांनीच पुढाकार घेतला होता. त्यांच्या या योगदानामुळे कृषी क्षेत्राला कर्जपुरवठा सुकर झाला आणि रिझर्व्ह बँकेतून प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत कर्ज पोहोचण्याची यंत्रणा तयार झाली.

          जुलै १९४४ मध्ये ब्रेटन वुड्स परिषद झाली. या परिषदेत सी.डी. देशमुखांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. या परिषदेत आंतरराष्ट्रीय नाणे निधी(इंटरनॅशल मॉनिटरी फंड) आणि आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास अधिकोष (इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट) या दोन संस्था स्थापन करण्याचा निर्णय झाला. विकसनशील देशांसाठी या दोन्ही संस्था महत्त्वाच्या ठरल्या. डॉ. सी. डी. देशमुख या दोन संस्थांच्या संचालक मंडळाचे दहा वर्षे सदस्य होते. १९५० मध्ये या दोन्ही संस्थांच्या झालेल्या वार्षिक बैठकीत सी. डी. देशमुखांनी अध्यक्षस्थान भूषवले होते.

         सप्टेंबर १९४९ मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सी.डी. देशमुख यांची अमेरिका आणि युरोप या देशांचा विशेष वित्तीय राजदूत म्हणून नेमणूक केली. त्या वेळी सी.डी. देशमुख यांनी गव्हाच्या कर्जासाठी अमेरिकेशी वाटाघाटी केल्या होत्या.

        १ एप्रिल १९५० रोजी नियोजन आयोगाची स्थापना झाली आणि नेहरूंनी त्यांची या आयोगावर सदस्य म्हणून नेमणूक केली. त्यानंतर लगेचच स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली. सलग सहा वर्षे त्यांनी देशाचे वित्तमंत्री म्हणून धुरा वाहिली. त्यानंतर नेहरूंशी मतभेद झाल्यामुळे जुलै १९५६ मध्ये वित्तमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिला.

        वित्तमंत्री असताना त्यांनी दोन पंचवार्षिक योजनांची आखणी केली आणि त्यांच्या कारकिर्दीत एका पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी झाली. ते वित्तमंत्री असताना वित्तीय सुधारणा होण्यासाठी नवा कायदा तयार झाला होता. हा कायदा तयार करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.

        इंपिरिअर ऑफ इंडिया या बँकेचे राष्ट्रीयीकरण याच दरम्यान झाले. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया या नावाने ही बँक रूढ झाली.

        त्यांच्याच कार्यकाळात खाजगी विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि आयुर्विमा महामंडळाची स्थापना झाली.

        १९५६ मध्ये वित्तमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सी.डी. देशमुख यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारले. १९५६ ते १९६० या काळात त्यांनी देशभरातल्या विद्यापीठीय शिक्षणात सुधारणा केल्या.

         १९६२ ते १९६७ या काळात त्यांनी दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरुपद सांभाळले. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेक संस्थांच्या उभारणीत त्यांचा वाटा मोठा होता. भारतीय सांख्यिकी संस्था (इंडियन स्टॅटिस्टिक इन्स्टिट्यूट (आयएसआय)  या संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि १९४५ ते १९६४ पर्यंत या संस्थेचे अध्यक्षपद भूषवले. याच दरम्यान ते वित्तमंत्रीही होते तेव्हा १९५१-१९५२ या वर्षी भारतीय सांख्यिकी संस्थेमार्फत राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाची सुरुवात झाली.

         भारताच्या संस्कृतीची माहिती जगभरात पोहोचावी या उद्देशाने सी.डी. देशमुख यांनी साली ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ची स्थापना केली. या  संस्था निर्माण झाल्यापासून ते तहहयात या संस्थेचे ते अध्यक्ष होते.

         १९५७ ते १९६० या कालावधीत ते ‘नॅशनल बुक ट्रस्ट’चे मानद अध्यक्ष झाले. १९६३-६४ या वर्षी दिल्लीच्या भारतीय सार्वजनिक प्रशासन संस्थेचे आणि १९६५ ते १९७४ या कालावधीत ते आर्थिक विकास संस्थेचे अध्यक्ष होते. १९५९ ते १९७३ या कालावधीत देशमुख हैदराबादच्या प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालयाच्या संचालक मंडळाचे प्रमुख होते. त्यांच्या पत्नी दुर्गाबाई देशमुख या ‘आंध्र महिला सभा’ या समाजसेवी संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्ष होत्या. या संस्थेच्या माध्यमातून आपल्या पत्नीसह सी.डी.देशमुख यांनी साक्षरता प्रसार, कुटुंबनियोजनासारख्या सामाजिक कार्यात भाग घेतला होता. १९४४मध्ये ब्रिटिश सरकारने ‘सर’ किताब देऊन त्यांचा सन्मान केला. १९५२ मध्ये केम्ब्रिजमधल्या जीजस महाविद्यालयाने माजी विद्यार्थी सी.डी. देशमुख यांना भारतीय आंतरराष्ट्रीय वित्त आणि व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल ‘ऑनररी फेलो’ हा सन्मान दिला.

        १९५९मध्ये त्यांनी सरकारी सेवेत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना रॅमन मॅगसेसे फाउण्डेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला. सी.डी.देशमुख यांना संस्कृत भाषेची आवड होती. १९६९मध्ये त्यांचा संस्कृत भाषेतील कवितांचा काव्यखंड प्रकाशित झाला होता. १९७५मध्ये भारत सरकारने देशमुख यांना ‘पद्मविभूषण’ देऊन गौरविले.

        अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ प्रिन्स्टन, लंडनमधील लाइस्टर, पुणे विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, अलाहाबाद विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ आणि ओस्मानिया विद्यापीठ, तसेच भारतीय सांख्यिकी संस्था या संस्थांनी डॉक्टरेट ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला.

        आपल्या कारकिर्दीत त्यांनी प्रशासकीय, वित्तीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अनमोल कार्य केले. तत्त्वनिष्ठता आणि वस्तुनिष्ठता, विज्ञान-संस्कृती, काल्पनिकता, समर्पकता आणि प्रामाणिकपणा अशा आगळ्यावेगळ्या गुणधर्मांमुळे सी.डी. देशमुख यांनी असाध्य गोष्टी साध्य केल्या आणि स्वत:ची ओळख जगभरात निर्माण केली.

         - नितीन केळकर

देशमुख, चिंतामण द्वारकानाथ