Skip to main content
x

देशमुख, सदानंद नामदेव

    सदानंद देशमुखांचे प्राथमिक शिक्षण व बालपण अमदापूर (जि. बुलढाणा) या त्यांच्या जन्मगावी झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते चिखली येथील शिवाजी महाविद्यालयात दाखल झाले. प्रथम श्रेणीत एम.ए. पदवी प्राप्त करून ते प्राध्यापक झाले. ग्रामीण शेतकर्‍याच्या कुटुंबात जन्म झाल्याने त्या जीवनातील दारिद्य्र, दुःख व अभाव यांचे भयावह वास्तव त्यांच्या कथांतून चित्रित होत असते.

१९९८ साली प्रसिद्ध झालेली व लोकप्रिय ठरलेली त्यांची ‘तहान’ कादंबरी ‘शेतकर्‍यांच्या मुलांना अर्पण’ केलेली असून ते लिहितात, ‘मूल्यहीन समाजव्यवस्थेत आपली जीवनमूल्ये जपणार्‍यांना एक अटळ संघर्ष करावा लागत आहे. तणावग्रस्त अवस्थेत जगणारी राघोजी शेवाळेची व्यक्तिरेखा मला अस्वस्थ करून गेली. गेल्या चार-पाच वर्षांपासून मी या कादंबरीची मांडामांड करण्यात आणि लेखनात गुंतून गेलो होतो.’ आजचे खरे खेडे साहित्यातून अंकित करण्याची जागरूकता त्यांच्यात असून ग्रामीण समाजाच्या पडझडीचे आशयविश्व शब्दबद्ध करण्याचा त्यांना ध्यास आहे. ग्रामीण भागातच वास्तव्य असल्याने तिथल्या सामान्य स्त्री-पुरुषांच्या भाव-विचारविश्वाचे ते निष्ठेने वास्तववादी चित्र उभे करतात. त्यांच्या भाषाशैलीचा एक नमुना पाहा - ‘आपुन काई एवढ्या वाळल्या नाई. नवराबी चांगला जाडाच्या जाडा हाये. मंगसन्या ही पोरगी कावून अशी झिंगळ्या वाणाची पैदा झाली आशीनं? वाळल्या बोंबिलाच्या कांडीवाडी दिसते... दिवस असताना तुपली आबळ झाली आसंल’ (रगडा). अनेक साप्ताहिकांतून व नियतकालिकांतून देशमुखांचे साहित्य प्रकाशित झाले.

‘लचांड’ (१९९३), ‘उठावण’ (१९९४), ‘महालूट’ (१९९५) हे कथासंग्रह आहेत. ‘बारोमास’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. वर्षातील बारा महिने दुष्काळाच्या खाईत होरपळणार्‍या असहाय, ग्रामीण कुटुंबाच्या अपेक्षाभंगाचे अस्वस्थ करणारे चित्रण, कादंबरीत आहे.

६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद  देशमुख यांनी भूषविले आहे. त्यांच्या साहित्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

- वि. ग. जोशी/ आर्या जोशी 

देशमुख, सदानंद नामदेव