Skip to main content
x

देव, माधव गजानन

       डॉ. माधव गजानन देव हे भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील एक अग्रगण्य संशोधक आहेत. सामाजिक बांधीलकीने प्रेरित होऊन समाजाचे स्वास्थ्य टिकविण्याबरोबरच वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण व संशोधनविषयक सुधारणा घडवून आणण्यात डॉ. देव यांनी मोलाचे कार्य केले आहे.

मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे त्यांचा जन्म व शालेय शिक्षण झाले. तेथीलच गाजरा राजा वैद्यकीय महाविद्यालयामधून १९५५ साली त्यांनी वैद्यकीय पदवी प्राप्त केली. पुढे दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेतून डॉ. रामलिंगस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विकृतिशास्त्र (पॅथॉलॉजी) या शाखेतील  एम.डी., तसेच पीएच.डी. या पदव्या प्राप्त केल्या.

त्याच संस्थेच्या विकृतिशास्त्र विभागात १९७४ ते ७८ सालांदरम्यान प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना, त्यांनी डॉ. रामलिंगस्वामी यांच्यासह भारतीय उपखंडात आढळून येणाऱ्या अनेक विकारांवर मूलभूत संशोधनासह प्रथिनऊर्जा कुपोषणविषयक विकारांवरही विशेष संशोधन केले. हे संशोधन गॉयटरसारख्या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी अन्नपदार्थात वापरल्या जाणाऱ्या मिठातील आयोडीनची मात्रा निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर मानदंड मानले जाते. पेशी विभाजन तसेच रासायनिक कर्कजन्य पदार्थांवरही त्यांनी संशोधन केले.

भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील डॉ. देव यांच्या मौलिक संशोधनास राष्ट्रीय स्तरावरील ‘यंग सायंटिस्ट’, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. भारतातील विज्ञान, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व प्रतिष्ठित संस्थांनी त्यांना मानद फेलोशिप  प्रदान करून डॉ. देव यांचा गौरव केला आहे. भारतातील इंडियन सायन्स अकॅडमीचे १९७८ साली सर्वात तरुण मानद सचिव होण्याचा विरळा बहुमानही डॉ. देव यांच्या नावावर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रॉकफेलर फाउंडेशन फेलो, अमेरिकेतील बेथेस्डा येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’ द्वारे १९९७ साली फॉगॅर्टी स्कॉलर यांसारख्या प्रतिष्ठित बहुमानासह १९९० साली पॅरिस विद्यापीठात मानद प्राध्यापक, असे सन्मान डॉ. देव यांना प्राप्त झाले आहेत.

१९७८ साली ते मुंबईतील कर्करोग संशोधन केंद्राचे संचालक झाले. तेथे त्यांनी तंबाखूजन्य मुखाच्या कर्करोगग्रस्त पेशींची वाढ होण्यास आवश्यक असणारा एक नवीन पॉलिपेप्टाइड घटक शोधून काढला. पारजनुक प्राण्यांची, विशेषत: कर्करोग संशोधनासाठी उपयुक्त असणाऱ्या पारजनुक उंदरांची, निर्मिती करण्यासाठी या नव्या घटकाचा उपयोग होतो. कर्करोगावरील या बहुमोल संशोधनाच्या सन्मानार्थ १९९९ साली ‘अमेरिकन सोसायटी ऑफ कॅन्सर रिसर्च’ या प्रतिष्ठित संस्थेच्या संशोधन जर्नलवर त्यांचे छायाचित्र छापून त्यांना गौरविण्यात आले.

ऐंशीच्या दशकात त्यांनी भारतात सर्वप्रथम संपूर्णपणे देशी तंत्रज्ञानाचा वापर करून कुष्ठरोगावरील प्रभावी लस विकसित केली. कुष्ठरोग हा मानवजातीसाठी एक महाभयंकर शाप आहे. जगातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे पाच ते दहा टक्के लोकांत कुष्ठरोग होण्याची शक्यता असते. कुष्ठरोगाच्या महाभयंकर व्याधीने ग्रस्त असणाऱ्या जगातील बारा दशलक्ष पीडितांपैकी सुमारे एक तृतीयांश रुग्ण भारतात आढळून येत असत.

या रोगास कारणीभूत असणाऱ्या मायक्रोबॅक्टेरियम लेपरी या जीवाणूचा शोध जरी १०० वर्षांपूर्वी लागला असला, तरी त्याची प्रयोगशाळेत वाढ करणे अशक्यप्राय आहे. पण पन्नासच्या दशकात डॉ.व.रा. खानोलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत कुष्ठरोगग्रस्त रुग्णाच्या शरीरातून प्रयोगशाळेत संवर्धन करता येणारा एक सूक्ष्मजीव शोधून काढला होता. त्याला ‘आय.सी.आर.सी. बॅसिलस’ असे नाव दिले गेले होते. या जीवाणूवर आधारित लस निर्माण करण्याच्या संशोधनास देव यांनी सुरुवात केली. या लसीद्वारे सुदृढ निरोगी व्यक्तीत कुष्ठरोगाची लागण रोखली जात असल्याचा, तसेच कुष्ठरोगपीडित रोग्यात रोगाची तीव्रता कमी करण्यात मदत करीत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कुष्ठरोगावरील या लसीच्या चाचणीद्वारे कुष्ठरोगाने पीडित रोग्यांत प्रतिकारशक्ती निर्माण होऊन निरोगी व्यक्तींत कुष्ठरोगाविषयी प्रतिकारशक्ती विकसित झाल्याचे सिद्ध करण्यात आले. कुष्ठरोगाची लागण झाल्यापासून त्याची लक्षणे दिसू लागण्यात काही व्यक्तींत दशकाहून अधिक काळ लागू शकतो. कुष्ठरोगाचे जंतू रोग्याच्या शरीरात दहा वर्षांपेक्षा अधिक काळ वास्तव्य करून राहू शकत असल्यामुळे देव यांनी कुष्ठरोगावरील लसीच्या चाचणीनंतर लसीकरण झालेल्या रुग्णांची, तसेच निरोगी व्यक्तींची एक दशकाहून अधिक काळ तपासणी करून ही लस अत्यंत प्रभावी व सुरक्षित असल्याचे दाखवून दिले.

डॉ. देव यांच्या कुष्ठरोग, कर्करोग, तसेच गॉयटर कुपोषणावरील संशोधनास आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉ. देव यांचे १२०हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत.

दिल्लीतील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये प्राध्यापक, मुंबईच्या कर्करोग संशोधन केंद्राचे संचालक (१९७८ ते १९९५) अशा जबाबदारीच्या पदांबरोबर डॉ.देव यांनी मुंबईच्या जसलोक रुग्णालयातील संशोधन प्रयोगशाळांचे संचालक (१९९७ ते १९९८), मॉरिशस येथील एस.एस.आर. सेंटर फॉर मेडिकल स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च, मॉरिशस विद्यापीठ (१९९८ ते २०००) ही पदे भूषवित या संस्थांना नावलौकिक प्राप्त करून दिला. पुणे येथील आरोग्य विज्ञान प्रशालेत मानद व्याख्याते, तसेच राष्ट्रीय एड्स संशोधन केंद्राच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणूनही डॉ. देव यांनी काम पाहिले आहे. देशातील नामवंत शास्त्रज्ञांच्या सहकार्याने डॉ. देव यांनी ‘इंडियन असोसिएशन ऑफ कॅन्सर रिसर्च’ या संस्थेची मूहूर्तमेढ रोवली. देशातील, तसेच जगभरातील अनेक संस्थांचे सल्लागार म्हणूनही डॉ. देव कार्यरत आहेत.

अलीकडील काळात २००१ सालापासून डॉ.देव ‘मुव्हिंग अकॅडमी ऑफ मेडिसीन व बायोमेडिसीन’ या संस्थेशी उपाध्यक्ष, तसेच सचिव या नात्याने निगडित आहेत. मुव्हिंग अकॅडमीची स्थापना करण्यात डॉ. देव यांचा क्रियाशील सहभाग आहे. या अकॅडमीची संकल्पना क्रांतिकारी आहे. वैद्यकीय शाखेतील मूलभूत, तसेच आधुनिक ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या संस्थेद्वारे फिरती शिबिरे घेण्यात येतात. या उपक्रमाद्वारे आधुनिक ज्ञान विद्यार्थ्यांच्या दाराशी नेऊन त्याद्वारे आधुनिक ज्ञानाच्या संक्रमणातील दरी दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. ही संकल्पना राबविताना डॉ. देव यांची वैद्यकीय शिक्षणाविषयी असलेली आस्था व विद्यार्थ्यांविषयी असलेली तळमळ दिसून येते.

वैद्यकीय शिक्षण, संशोधन, तसेच उपचारक्षेत्रात आयुष्यभर कार्यरत असणार्‍या डॉ. देव यांचा अनेक मानसन्मान देऊन गौरव करण्यात आला आहे. डॉ. देव यांचा भारत सरकारतर्फे १९९० साली ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे. त्यांना मिळालेल्या इतर अनेक सन्मानांत १९६६ साली ‘डॉ.व.रा. खानोलकर पुरस्कार’, १९७२ साली ‘अमृत मोदी रिसर्च फाउण्डेशन अवॉर्ड’, १९८६ साली ‘शकुंतला अमीरचंद’ पुरस्कार, १९८८ साली ‘ओमप्रकाश भसीन’ पुरस्कार, १९८९ साली रौप्यमहोत्सवी ‘आय.सी.एम.आर.’ संशोधन पुरस्कार, १९९२ साली ‘आर.डी. बिर्ला’ राष्ट्रीय पुरस्कार, व ‘हरी ओम अलेम्बिक संशोधन कोष’ पुरस्कार, इन्सातर्फे १९९३ साली ‘जवाहरलाल नेहरू बर्थ सेंटेनरी व्हिजिटिंग फेलोशिप’, नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसद्वारे २००२ साली ‘एमिरिटस प्रोफेसर लाइफटाइम’ अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे. अमेरिकेतील ए.पी.आय.एन.ए. या संस्थेतर्फे अलीकडेच २००८ साली डॉ. देव यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.

डॉ. देव यांनी राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर १९७८ साली बी.सी. गुहा इन्सा व्याख्यान, १९८० साली आय.सी.एम.आर. बसंती देवी अमीर चंद व्याख्यान १९८७ साली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रौप्यमहोत्सव, १९८८ साली इंडियन सायन्स काँग्रेस अमृत महोत्सव, साराभाई व्याख्यान, या व अशा प्रतिष्ठित व्यासपीठांवर अनेक व्याख्याने दिलेली आहेत.

डॉ. सिद्धीविनायक बर्वे

देव, माधव गजानन