दिघे, दिलीप कमलाकर
दिलीप कमलाकर दिघे यांचा जन्म मुंबई येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिलीप दिघे दि. १६ ऑक्टोबर १९६५ रोजी भारतीय वायुसेनेच्या सेवेत रुजू झाले. १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धाच्या वेळी फ्लाइट लेफ्टनंट दिघे यांच्यावर लढाऊ विमानाद्वारे भूसेनेचा मार्ग निर्धोक करण्याची अवघड जबाबदारी सोपविण्यात आली.
त्यांनी लढाऊ विमानातून शत्रूच्या रणगाड्यांवर प्रतिकूल परिस्थितीतही अचूक बॉम्बहल्ला केला. यामध्ये पाकिस्तानचे चार रणगाडे उध्वस्त झाले. त्याचबरोबर फ्लाइट लेफ्टनंट दिघे यांनी आपल्या कौशल्याचा पुरेपूर वापर करीत पाकिस्तानची अनेक लढाऊ वाहने, तसेच तोफगोळ्यांची दोन ठाणी उध्वस्त केली. यामुळे शत्रू सैन्याचे कंबरडेच मोडले. तसेच, शत्रूसेनेच्या मानसिक धैर्यावरही विपरीत परिणाम झाला. यामुळे प्रामुख्याने छांब विभागात पाकिस्तानी सैन्याची अपरिमित हानी झाली. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीचा ‘वीरचक्र’ देऊन गौरव करण्यात आला.
-संपादित