Skip to main content
x

दोशी, ललित नरोत्तम

      लित नरोत्तम दोशी यांचा जन्म कच्छ (गुजरात) मधील एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव कांताबेन. कमी शिकलेल्या आई-वडिलांची इच्छा आपली तिन्ही मुले उच्चशिक्षित व्हावी अशी असल्याने ते मुंबईला आले. शिक्षणासाठी बोरीबंदरजवळ त्यांच्या मित्राच्या लहानशा घरात ते राहिले. ललित यांचे  शालेय शिक्षण भरडा न्यू हायस्कूलमध्ये झाले. सेंट झेवियर्स महाविद्यालयात शिकून त्यांनी मुंबई विद्यापीठ येथून अर्थशास्त्रातील एम.ए. ही पदवी सुवर्णपदकासह प्राप्त केली.त्यांनी मुंबईच्या जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजची पदविका मिळविली. यापुढे त्यांनी युनायटेड किंगडमच्या लीड्स युनिव्हर्सिटीची 'मॅनेजमेंट ऑफ पब्लिक एण्टरप्रायझेस' ही परीक्षा दिली.

      ललित दोशी यांनी १९६६मध्ये वयाच्या चोविसाव्या वर्षी उच्च शिक्षण पूर्ण होताच प्रशासनिक सेवेत पदार्पण केले. आपल्या सव्वीस वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी महाराष्ट्र शासन, तसेच केंद्र शासनाच्या अधीन महत्त्वपूर्ण पदांवर काम केले. यांत महाराष्ट्र औद्योगिक विकास निगमचे (एम.आय.डी.सी.) मुख्य कार्यकारी अधिकारी, हाउसिंग, संस्थात्मक वित्त आणि नियोजन (इन्स्टिट्यूशनल फायनान्स अ‍ॅण्ड प्लॅनिंग) विभागात सचिव, महाराष्ट्र राज्य औद्योगिक आणि गुंतवणूक महामंडळाचे (स्टेट इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र, सिकॉम) प्रबंध संचालक व महाराष्ट्र शासन (उद्योग) खात्याचे सचिव (१९९२ ते १९९४) यांचा आणि नंतर १९८५ ते १९९० पर्यंत भारत सरकारच्या पेट्रोकेमिकल्स मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून झालेल्या नेमणुकांचा समावेश होतो.

      वरिष्ठ पदांवर ललित यांच्या नेमणुका आणि भारत सरकारने अचानक अवलंबलेल्या आर्थिक उदारीकरण नीती या घटना एकाच वेळी घडत गेल्या. सर्व पदांवर परिश्रम आणि निष्ठापूर्वक कार्यरत असताना आपल्या पदाचा विचार न करता जे-जे कोणी त्यांच्याकडे आले, त्यांना मदत करण्याचा ललित यांनी सदैव प्रयत्न केला आणि अधीनस्थ त्यांच्याकडे मार्गदर्शन व सल्ला विचारण्यासाठी मोकळेपणाने येत.

      सर्वसामान्यांच्या दृष्टीने ललित असे समर्थ प्रशासक होते, की लालफितीला बाजूला सारून ते स्वत: मदत करीत असत. त्यांनी मुख्यत: औद्योगिक व नागरी विकास विभागात काम केले आणि शहरी कमाल जमीन धारणा कायद्याला (अर्बन सीलिंग अ‍ॅक्ट) व्यावहारिक बनवून विकास कार्याला गतिमान केले व त्यांच्या या कामगिरीचे कौतुक झाले. देशात पेट्रोकेमिकल्स उद्योगाच्या विकासासाठी धोरण निर्धारित करण्याशी ते निगडित होते. कार्यक्षम, परिश्रमी, इमानदार व सेवाभावी ललित दोशी यांना भ्रष्टाचाराचा कधी स्पर्श झाला नाही. हा निरभिमानी प्रशासक नियमांचे कटाक्षाने पालन करी; पण रचनात्मक कार्यात कधी बाधा पडू देत नसे. ललित मितभाषी, सदाचारी, विनीत वृत्तीचे असून अर्थशास्त्रीय प्रशासनात त्यांचे बहुमूल्य योगदान स्मरणीय राहिले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या सोबत औद्योगिक धोरणाविषयी माहिती देण्यासाठी १९९४ मध्ये उद्योग सचिव या नात्याने ललित दोशी स्वित्झर्लंड येथे गेले असताना त्यांचे अकस्मात निधन झाले.

     - अरुण बोंगिरवार / भरत दोशी

दोशी, ललित नरोत्तम