Skip to main content
x

डुम्बरे, रघुनाथ बाबूराव

        घुनाथ बाबूराव डुम्बरे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. ओतूर येथील माध्यमिक शाळेतूून ते १९५८मध्ये इयत्ता ११वी उत्तीर्ण झाले. त्यांनी परभणी येथील शासकीय कृषी महाविद्यालयातून १९६३मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी विशेष प्रावीण्यासह प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. नंतर ते महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्यामध्ये पुणे मुक्कामी कृषी अधिकारी म्हणून हजर झाले. त्यांनी सप्टेंबर १९६३ ते मे १९६६पर्यंत या पदावर काम केले. या काळातच त्यांनी प्रतिनियुक्तीवर पुणे विद्यापीठाची कीटकशास्त्र विषयामध्ये एम.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम श्रेणीमध्ये संपादन केली.

         त्यांनी १९७१ ते १९७४ या काळात अमेरिका येथील पेनसिल्व्हानिया राज्य विद्यापीठामधून कीटकशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली व ते दापोलीतील बा.सा.को.कृ.वि.त पुन्हा रुजू झाले. त्यानंतर तेथे त्यांनी सेवानिवृत्त होईपर्यंत म्हणजे फेब्रुवारी १९९९पर्यंत अधिव्याख्याता, प्राध्यापक - कीटकशास्त्र विभागप्रमुख आणि संशोधन संचालक अशा विविध पदांवर काम केले. डॉ. डुम्बरे यांचे संशोधक म्हणून भात आणि आंबा पिकांवरील काम विशेष उल्लेखनीय आहे. भातावरील महत्त्वाच्या किडी - खोड किडा, तपकिरी तुडतुडे इ.चा जीवनक्रम, त्यांची लक्षणे, प्रभावी कीटकनाशक इ.चा सखोल अभ्यास करून उपाययोजना सूचवल्या. तसेच एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीही काही किडींसाठी संशोधिल्या. विक्रम व फाल्गुना या जातींमध्ये गादमाशीस मोठ्या प्रमाणावर प्रतिकारशक्ती असून त्यांचा वापर केल्यास कीड आटोक्यात राहते. तसेच या किडी नियंत्रणात बेडूकसुद्धा उपयोगी पडतात, त्यासाठी त्यांच्या प्रजनन काळात त्यांना पकडण्यावर बंदी घालण्याचा निर्णय शासनाने घेतला.

         डॉ. डुम्बरे यांनी आंबा, काजू, नारळ या पिकांवरील तुडतुडे, ढेकण्या, फुलकिडे, गेंड्या-सोंड्या भुंगा, खोडकिडा यांच्या नियंत्रणासाठी संशोधन करून उपाययोजना सूचवून त्या अमलातही आणल्या. बा.सा.को.कृ.वि.च्या संशोधन संचालक पदावर असताना त्यांनी विद्यापीठाच्या कृषी, पशुवैद्यकीय आणि मत्स्य या तिन्ही शाखांतील संशोधन व विकास कार्यक्रमाला योग्य दिशेने गतिमान केले. या शाखांसाठी दीर्घकालीन अ.भा. संशोधन प्रकल्प व काही संशोधन प्रकल्पांद्वारे आर्थिक साहाय्य मिळवले. त्यामुळे विद्यापीठाच्या सर्व प्रक्षेत्रांवर संशोधन कार्यासाठी प्रयोगशाळा, इमारती, अद्ययावत उपकरणे अशा पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. तसेच त्यांनी राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा, राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स यांसारख्या प्रतिष्ठित संशोधन संस्थेच्या सहकार्यानेदेखील काही संशोधन प्रकल्प हाती घेतले. संशोधन संचालक या नात्याने त्यांनी भात बीज उत्पादन आणि आंबा-काजूची मोठ्या संख्येने कलमे तयार करण्याचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

         डॉ. डुम्बरे यांचे संशोधनात्मक लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. तसेच १४ तांत्रिक लेख आणि शेतकर्‍यांसाठी २० लेख मराठी मासिकातून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून व दूरदर्शन मुंबईवरून कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. डॉ. डुम्बरे यांनी २१ एम.एस्सी. (कृषी) विद्यार्थ्यांना आणि एका पीएच.डी. विद्यार्थ्याला मार्गदर्शन केले आहे.

- डॉ. विजय अनंत तोरो

डुम्बरे, रघुनाथ बाबूराव