Skip to main content
x

धनेश्वर, नागेश रामचंद्र

अप्पा धनेश्वर

   पुणे जिल्ह्यातील धनकवडीचे महान योगी शंकरमहाराज यांचे अंतरंग शिष्य म्हणून डॉ. नागेश रामचंद्र तथा अप्पा धनेश्वर ओळखले जातात. ‘‘डॉक्टरी हा धंदा नाही, तर जनता-जनार्दनाची सेवा आहे. गरीब-श्रीमंत भेद न करता सर्वांची सेवा कर. द्रव्याचा लोभ ठेवू नको. परिग्रहवृत्ती ठेवू नको,’’ असा श्री गुरू शंकरमहाराज यांनी डॉ. धनेश्वरांना उपदेश केला होता आणि डॉ. धनेश्वरांनी हा गुरु उपदेश आदेश मानून आयुष्यभर सेवा म्हणूनच वैद्यकीय व्यवसाय केला. अत्यंत साधेपणाने आध्यात्मिक आनंद अनुभवला. त्यांना गुरुकृपेने अष्टसिद्धी प्राप्त झाल्या होत्या; पण त्यांनी कोणत्याही सिद्धीचा वापर केला नाही. त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला. तेव्हासुद्धा, परमेश्वर नियंत्रित जीवन-मृत्यूच्या कार्यात सिद्धीचा वापर हा हस्तक्षेप ठरेल, या भावनेने त्यांनी सिद्धीचा उपयोग केला नाही.

नागेश रामचंद्र धनेश्वर या थोर सिद्धपुरुषाचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव जानकीबाई होते. धनेश्वर हे घराणे मूळचे बीड जिल्ह्यातील दोंदगावचे. नागेश धनेश्वर वयाच्या दहाव्या वर्षीच मातृसौख्याला पारखे झाले. पुढे चुलतभाऊ गोपाळराव धनेश्वर यांनी नागेश व त्यांच्या दोन भावंडांचा संभाळ केला. अगदी जन्मतःच त्यांना नाथपंथीय योगीपुरुषाची कृपा लाभलेली होती, अशी अनेक लक्षणे त्यांच्या बाललीलांत दिसत होती. एका नागाने फणा काढून त्यांच्यावर सावली धरली होती म्हणून त्यांचे नावही नागनाथ, नागेश्वर, नागेश असे ठेवण्यात आले, अशी एक कथा त्यांचे चरित्रकार सांगतात.

नागेशराव १९१८ साली मॅट्रिकची परीक्षा विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. घराशेजारीच एक आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य राहत होते, त्यामुळे आपणही वैद्य व्हावे असे नागेशरावांना वाटत होते. पण खुद्द त्या वैद्यराजांनीच त्यांना ‘एम.बी.बी.एस.’ होण्यास सांगितले. त्यानुसार नागेशराव विशेष गुणांसह एम.बी.बी.एस. झाले. आता ते एम.डी. होतील असे अनेकांना वाटले. पण गावच्या गरीब, मध्यमवर्गीय लोकांना एम.डी.च्या स्पेशालिस्टची नव्हे, तर सर्व रोग, व्याधींवर उपचार करणाऱ्या जनरल फिजिशिअनची गरज आहे हे लक्षात घेऊन, नागेशरावांनी पुढील उच्च शिक्षण न घेता गावी जाऊन एक दवाखाना सुरू केला व गुरू शंकर महाराजांच्या आदेशानुरूप रुग्णसेवेस प्रारंभ केला. अगदी माफक दरात, तसेच गरीबांवर विनामूल्य औषधोपचार केले.

नागेश शालेय शिक्षण घेत होते तेव्हा श्रीगुरू शंकर महाराज सर्वप्रथम एका फकिराच्या वेषात त्यांना भेटले व ‘रामकाठी’ नावाची सिद्धविद्या त्यांना प्रदान केली. त्यानंतर डॉक्टर होऊन अहमदनगरला रेल्वेने परत येत असताना नागेशराव ऊर्फ अप्पा स्टेशन मास्तराच्या घरी गेले असताना तेथे शंकरमहाराजांशी त्यांची पुन्हा भेट झाली. हाच तो शालेय जीवनात भेटलेला फकीर म्हणून अप्पांना शंकर महाराजांची खूण पटली.

दौंडहून  निघून अप्पा नगरला घरी पोहोचले, तर घरात वडिलांशी बोलत बसलेल्या शंकर महाराजांना पाहून त्यांना शंकर महाराजांच्या नेमक्या स्वरूपाची ओळख पटली. पुढे शंकर महाराजांनी अखेरपर्यंत डॉ. धनेश्वरांची साथ केली. त्यांना आपले सर्वस्व दिले व अंतरंग शिष्य बनविले.

डॉ. धनेश्वर शंकरमहाराजांच्या इतके निकटवर्ती झाले, की १९३० साली शंकरमहाराजांनी समाधी घेण्याचा निर्णय केवळ डॉ. धनेश्वरांमुळे सतरा वर्षे पुढे ढकलला. डॉक्टर म्हणून डॉ. धनेश्वरांकडे जेवढे रुग्ण येत, तेवढेच लोक आध्यात्मिक प्रश्न व प्रापंचिक अडचणी घेऊन येत होते. स्वतःच्या,आपल्या अधिकाराचा कोठेही फारसा उच्चार न करता डॉ.धनेश्वर वागत असत. खरं तर, ते सिद्धयोगी होते; पण ते स्वतःस शंकर महाराजांचा सामान्य शिष्य मानत असत.

ते सर्व वाद्ये वाजवीत असत. संगीत-चित्रकला याची त्यांना विशेष आवड होती. या कलांमध्ये त्यांना ईश्वर-दर्शन घडत असे. परमार्थासाठी कोणत्याही गोष्टीचा अव्हेेर न करता समग्रपणे जीवन हे परमेश्वराचीच लीला म्हणून स्वीकारावे, असा त्यांचा विचार होता. अशा समग्र जगण्याला ते ‘जीवनयोग’ म्हणत. १९७९ मध्ये वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी त्यांना किडनीचा विकार झाला. डॉ.धनेश्वरांनी पूर्वसूचनेनुसार १३ जानेवारी १९८० रोजी पहाटे देहत्याग केला.

  विद्याधर ताठे

धनेश्वर, नागेश रामचंद्र