Skip to main content
x

ढोणुक्षे, बचाराम लक्ष्मण

बी. एल. ढोणुक्षे

         चाराम लक्ष्मण ढोणुक्षे यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील माघाळ या गावी झाला. त्यांचे बालपण मुमेवाडी या गावी गेले. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुमेवाडी व उत्तुर येथे झाले व माध्यमिक शिक्षण आंतरभारती शिक्षण मंडळाच्या उत्तुर विद्यालयात झाले. ते दहावीची परीक्षा गडहिंग्लज केंद्रात प्रथम क्रमांकाने, तर पुणे बोर्डात ५६व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांना भारत सरकारची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. ढोणुक्षे यांंना महाविद्यालयीन शिक्षणासाठी वि.स. खांडेकर यांनी समाजसेवक बाबा आमटेंकडे पाठवले. ढोणुक्षे यांनी आनंद निकेतन महाविद्यालयात प्री-युनिव्हर्सिटी व बी.एस्सी. (कृषी) भाग-१पर्यंतचे शिक्षण घेतले. दोन्ही वर्षी ते नागपूर विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांना सर ऑर्थर ब्लॅनेरहॅसॉट स्मृती सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. ते दोन वर्षे बाबा आमटे यांच्या घरीच राहिले. त्यांनी आनंदवन मित्रमेळावे, श्रमसंस्कार छावण्या, भारत जोडो अभियान यात सहभाग घेतला. तसेच त्यांनी सोमनाथला श्रमिक कार्यकर्ते विद्यापीठ उभारण्याच्या कामात भाग घेतला. ते बी.एस्सी. (कृषी) परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. त्यांनी नागपूर कृषी महाविद्यालयात विद्यार्थी मंडळाचे सचिव व हॉस्टेल प्रीफेक्ट म्हणून काम पाहिले. नंतर ढोणुक्षे यांची भा.कृ.अ.सं., नवी दिल्ली येथे एम.एस्सी. (अनुवंश) अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली. एम.एस्सी. (अनुवंश) परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. त्यानंतर त्याच संस्थेत त्यांची पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी निवड झाली. ढोणुक्षे यांना नवी दिल्ली येथील भा.कृ.अ.प. यांची शिष्यवृत्ती मिळाली व ते पीएच.डी. झाले.

        ढोणुक्षे यांनी भा.कृ.अ.सं.त गव्हावर संशोधन केले. त्यांनी गॅमा किरणोत्सर्जनाचा वापर करून नवोद्गम पद्धतीने ‘फिनाल कुलर’ म्युटेशनचा शोध लावला. या संस्थेत त्यांना डॉ. ए.बी. जोशी, डॉ. एम.एस. स्वामिनाथन, डॉ. एम.व्ही. राव यांसारख्या जागतिक ख्यातीच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभले.

        ढोणुक्षे यांनी १९७५पासून दापोलीच्या बा.सा.को.कृ.वि.त निरनिराळ्या पदांवर कार्य केले. ते वनस्पती जैवतंत्रज्ञान कक्षाचे संस्थापक प्राध्यापक व प्रमुख; तर वनशास्त्र महाविद्यालयाचे संस्थापक सहयोगी अधिष्ठाता होते. त्यांनी या दोन संस्था भक्कम पायावर उभारून नावारूपाला आणल्या. त्यांनी ऊती संवर्धन प्रयोगशाळेची स्थापना केली व हरितगृहाची उभारणी केली. त्यांनी ‘जैविक विविधता प्रांगण’ व ‘चरक वनौषधी उद्यान’ विकसित केले. त्यांनी वनरोपवाटिका तयार करून शेतकर्‍यांना वाजवी दरात रोपे उपलब्ध करून दिली. ढोणुक्षे यांनी बा.सा.को.कृ.वि.तून बी.एस्सी. (वनशास्त्र), एम.एस्सी. (अनुवंशशास्त्र व रोप-पैदासशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र) आणि पीएच.डी. (अनुवंशशास्त्र व रोप-पैदासशास्त्र) हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात पुढाकार घेतला.

        ढोणुक्षे यांनी तृणधान्ये, द्विदल पिके, भाजीपाल्याची पिके, फळपिके इ. विविध पिकांवर मूलभूत संशोधन केले. त्यांनी पिकांच्या विविध जातींच्या वर्गीकरणाचे नमुनारूप १५व्या आंतरराष्ट्रीय अनुवंशशास्त्र परिषदेत मांडले. त्यांनी भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग व भा.कृ.अ.प. यांचे आंबा व कोकम पिकांवरील ऊती संवर्धन योजनेचे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून काम केले. त्यांचे १३० शोधनिबंध प्रकाशित झाले. त्यांनी २१ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादांमध्ये भाग घेतला. त्यांनी नेदरलँडस्, बेल्जियम, फ्रान्स या देशांचा अभ्यासदौरा केला.

        ढोणुक्षे यांनी महाराष्ट्र शासनाच्या ऊती संवर्धन व जनुकीय रूपांतरित पिकांच्या उपसमित्यांचे सदस्य म्हणून काम केले. ढोणुक्षे यांना नवी दिल्ली येथील भारतीय अनुवंशशास्त्र व रोप-पैदासशास्त्र सोसायटी यांनी सदस्य म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यांना पुण्यातील महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी संस्थेने संशोधन क्षेत्रात भरीव कार्य करणार्‍या वनस्पतिशास्त्रज्ञास देण्यात येणारा डॉ. आर.बी. एकबोटे पुरस्कार प्रदान केलेला आहे.

ढोणुक्षे यांनी आपल्या मुलांनाही चांगले घडवले. मोठा मुलगा पंकज नेदरलँड्स येथून जैवतंत्रज्ञान या विषयात एम.एस्सी., पीएच.डी., तसेच जर्मनी येथून पोस्टडॉक्टरेट झाले. जगप्रसिद्ध ‘नेचर’ यांसारख्या नियतकालिकांमध्ये त्यांचे संशोधन प्रकाशित झाले. मुलगी वृषाली नेदरलँड्स येथून हरितगृह तंत्रज्ञानात एम.एस्सी. झाली. मुलगा महेश कॉम्प्युटर इंजिनीअर असून दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे कार्यरत आहे.

- संपादित

ढोणुक्षे, बचाराम लक्ष्मण