Skip to main content
x

धोंगडे, माणिक पंंढरीनाथ

        कृषि-अर्थशास्त्र या शाखेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या माणिक पंढरीनाथ धोंगडे यांचा जन्म सोलापूर येथे झाला. सोलापूर जिल्ह्यातील करकंब व मोडलिंब येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर घरच्या शेतीची पार्श्‍वभूमी असल्यामुळे वडीलभावाच्या सल्ल्यानुसार त्यांनी १९५१मध्ये पुणे कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९५५मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली व लगेचच कृषि-अधिकारी म्हणून बडोदा येथे आपल्या कामास सुरुवात केली. नोकरीत असतानाच त्यांनी कृषि-अर्थशास्त्र या विषयात पुणे विद्यापीठाच्या एम.एस्सी. (१९६२) व पीएच.डी. (१९७९) या पदव्या प्राप्त केल्या. आपल्या ३७ वर्षांच्या कार्यकालात त्यांनी कृषी खाते, कृषी महाविद्यालय पुणे, म.फु.कृ.वि., राहुरी येथे कृषि-अर्थशास्त्र या विषयात संशोधक, साहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक व विभाग प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. काही काळ त्यांनी पुणे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्यपदही भूषवले. धोंगडे यांनी कृषी विद्यापीठाच्या अनेक संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले आहे. ‘Cost of cultivation of principle Crops’’ या भारत सरकारच्या व महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त प्रकल्पाला, तसेच ‘Survey of irrigation projects, Farmers attitude’’ या प्रकल्पाला त्यांनी अनेक वर्षे मार्गदर्शन केले.

        आपल्या कार्यकालात अनेक एम.एस्सी. व पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून ६० शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या लेखनसंपदेत सात पुस्तके, विविध संशोधन अहवाल, ‘बळीराजा’ मासिकातील शेती व्यवस्थापन तंत्र आणि मंत्र ही लेखमाला, ‘शेतकरी’ मासिकातील शेती उद्योगातील यक्षप्रश्‍न ही लेखमाला, स्पर्धा परीक्षांसाठी कृषीविषयक घटकांवर लेखन, आकाशवाणीवरची भाषणे इत्यादींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

        आदिवासी प्रशिक्षण संस्था, पुणे येथे स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना १० वर्षे त्यांनी मार्गदर्शन केले.

        ज्ञानप्रबोधिनी, विज्ञानवर्धिनी (एम.ए.सी.एस.) व हिंंद स्वराज्य ट्रस्ट यांच्या ग्रामीण विकास योजनांच्या कामात यथायोग्य सहभाग दिला होता. त्यांच्या कृषि-अर्थशास्त्र विषयातील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून ‘महाराष्ट्र सोसायटी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स’ व ‘प्रा. ऊलेमाले प्रतिष्ठान’ अमरावती यांच्या विद्यमाने त्यांना २००० मध्ये ऊलेमाले पुरस्कार मिळाला होता. तसेच पुणे महानगरपालिका सुवर्णमहोत्सवी वर्षाचे (२०००) गौरवपदही त्यांना देण्यात आले होते.

- डॉ. मुकुंद दत्तात्रेय भागवत

धोंगडे, माणिक पंंढरीनाथ