Skip to main content
x

गोसावी, राघवगिरी शिवगिरी

        कोल्हापूर परंपरेतील एक धाडसी चित्रकार राघवगिरी यांच्या जलरंग वापरण्याच्या पद्धतीत कोल्हापूरच्या परंपरेतील नाजूकपणा नसे. किंबहुना, मुक्तपणे ब्रशचे फटकारे मारत त्यांचे चित्र साकार होई. तैलरंग वापरताना ते ब्रश व रंग हत्यारांसारखे वापरीत. ‘कलानिकेतन’ या कलाशिक्षण देणाऱ्या कोल्हापुरातील संस्थेचे ते संस्थापकही होते.

        कोल्हापूरच्या जवळच असलेल्या बहिरेश्वर येथे राघवगिरी शिवगिरी गोसावी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शंकरगिरी गोसावी यांचे नातलग शिवगिरी संतोषगिरी गोसावी हे एकटेच होते; म्हणून त्यांनी वारसा पुढे चालू राहण्याकरिता १९५० मध्ये राघवगिरी यांना दत्तक घेतले.

        लहानपणी नगरपालिकेच्या शाळेत त्यांना शिंदे नावाचे कलाशिक्षक लाभले. त्यांच्या संस्कारांमुळे त्यांंना चित्रकार व्हावे असे वाटू लागले. शालेय शिक्षण संपल्यानंतर दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये राघवगिरी यांनी कलाशिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिथे त्यांना गु.नि.सोळंकी नावाचा जीवाभावाचा मित्र मिळाला आणि त्यांनी कोल्हापूर सोडून मुंबईची वाट धरली. त्या वेळी मुंबईत राहणे फार कठीण होते. सोळंकी ज्या ठिकाणी काम करीत होते, तिथे आपले काम संपल्यानंतर  गोसावी झोपायला जात. पुन्हा सकाळी जे.जे. स्कूलमध्ये जाणे, असा त्यांचा दिनक्रम असे. पण हे फार काळ चालले नाही व ते पुन्हा कोल्हापूरला परतले.

        कोल्हापुरात महाद्वार रस्त्याला महालक्ष्मी मंदिराजवळ त्यांचे घर होते. घरची परिस्थितीही चांगली होती. त्यांनी आपल्याच घरात, गोसावी वाड्यात चित्रकलेचे धडे देण्या-घेण्यास सुरुवात केली. रंकाळ्यावर जमणारी कलाप्रेमी मंडळी वाड्यावर येऊ लागली. यातूनच संस्थेची कल्पना पुढे आली. हे करत असतानाच त्यांनी शिक्षणही पूर्ण केले.

        गोसावी जलरंग जोमदार पद्धतीने व सहजतेने  हाताळत. पण एवढ्यावर न थांबता त्यांनी सतत कोल्हापूर परंपरेला धरून नसणारे वेगवेगळे प्रयोग केले. त्यांनी तैलरंगाचा वापर जलरंगाप्रमाणे केला व ‘इंपॅस्टो’ पद्धतीनेही केला. त्यांच्या प्रयोगशील चित्रांना विविध पारितोषिके मिळाली. त्यांच्या ‘काका’ या व्यक्तिचित्राला बॉम्बे आर्ट सोसायटीचे कांस्यपदक मिळाले. या व्यक्तिचित्रात वृद्धपणातही आपले करारी व्यक्तिमत्त्व कायम ठेवलेल्या एका निग्रही माणसाचे चित्रण आहे.

        गोसावी पुढील आयुष्यात दम्याच्या व्याधीमुळे या माध्यमात काम करू शकले नाहीत. मात्र त्यांनी जलरंग माध्यमात चित्रनिर्मिती केली. त्यात जोमदार व प्रयोगशील आविष्कार करण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असे. मुंबईत शिकत असताना त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील प्रयोगशीलता अनुभवली होतीच. पण कोल्हापुरातील पारंपरिक संस्कार व मुंबईत अनुभवलेले आणि परदेशातील पुस्तकांतून बघितलेली प्रयोगशील मुक्त अभिव्यक्ती या दोन प्रकारच्या कलामूल्यांमध्ये त्यांची निर्णयशक्ती आंदोलित होत राहिली.

        शांतिनिकेतनसारखे काही करावे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी १९५४ साली ‘कलानिकेतन आर्ट एज्युकेशन सोसायटी’ची कोल्हापुरात स्थापना केली. त्यांनी अत्यंत जिव्हाळ्याने ही संस्था केवळ गरीब मुलांकरिता चालविली. त्यांनी स्वत: स्थापन केलेल्या कलानिकेतन कलामहाविद्यालय या संस्थेचे प्राचार्यपद अखेरपर्यंत भूषविले. घरच्या सधनतेचा उपयोग त्यांनी आपल्या शिक्षणसंस्थेसाठी केला.

        ते दम्याच्या विकाराने आयुष्यभर ग्रसलेले होते. त्यामुळे तरुणपणातच तैलरंग त्यांना वर्ज्य झाले व अतिशय प्रगल्भ असे कलागुण असूनही ते आयुष्याच्या उत्तरार्धात जलरंगातही चित्रे काढू शकले नाहीत.

        - व्यंकटेश बिदनूर

गोसावी, राघवगिरी शिवगिरी