Skip to main content
x

गुंडे, जयकुमार बंडू

                शास्त्रशुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोनातून शेती करण्यात अग्रेसर असणाऱ्या जयकुमार बंडू गुंडे यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली या खेडेगावातील सधन शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण कोल्हापूर येथेच झाले. त्यांनी १९७३मध्ये वडिलांचा मृत्यू झाल्यावर शिक्षणाला रामराम ठोकला. त्या वेळेस घरी १८ एकर असलेली शेती त्यांचे भाऊ अजय गुंडे हे सांभाळत असत. शेतीची आवड नसल्यामुळे गुंडे यांनी कोल्हापूर येथे मोटारसायकल विक्रीचे दुकान काढले, परंतु दुकानात नुकसान झाल्यावर व भावाच्या एकट्याच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी पडल्यामुळे त्यांनी नाइलाजाने व अनिच्छेने शेती व्यवसायात लक्ष घालण्याचे ठरवले.

               गुंडे यांनी १९९०मध्ये वयाच्या ३४व्या वर्षी प्रत्यक्ष शेती करण्यास प्रारंभ केला. जिद्द, चिकाटी व सूक्ष्म निरीक्षणदृष्टी या गुणांमुळे त्यांनी दोनच वर्षांत विक्रमी उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. भुईमुगासंबंधी वर्तमानपत्रातली बातमी वाचून त्यांनी भुईमुगाचे उत्पन्न घ्यायचे असा निश्‍चय केला व त्या वर्षी त्यांनी हेक्टरी २० क्विंटल उत्पन्न घेऊन विक्रम केला. सलग तीन वर्षे त्यांनी या उत्पन्नात वाढ केली. १९९०मध्ये त्यांनी हेक्टरी २० क्विंटल, १९९१मध्ये २८ क्विंटल तर १९९२ला त्यांनी ३२ क्विंटल भुईमुगाचे उत्पन्न घेतले. सदर उत्पन्न घेताना त्यांनी हायटेक तंत्र वापरले. उत्पन्न घेण्याआधी त्यांनी जमिनीची मशागत केली, तसेच उपलब्ध प्रक्षेत्रामध्येच जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याबाबत विचार केला. या विचारातूनच भाभा अणुसंशोधन केंद्राने तयार केलेली भुईमुगाची रोपे लहान असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी दोन रोपांच्या मधली जागा कमी केली व रोपांच्या लागवडीची संख्या वाढवली. त्यामुळे एका शेतात जास्तीत जास्त रोपे बसून उत्पन्न वाढले. तसेच कोणत्याही पिकाची लागवड करण्याआधी गुंडे त्या त्या पिकाचे शरीरशास्त्र समजून घेऊन , इतरांनी घेतलेल्या त्या पिकाचे निरीक्षण करण्यावर त्यांचा प्रयत्न  राहिला आहे. त्या पिकासंबंधीचे संशोधनात्मक, शास्त्रशुद्ध पद्धतींचे वाचन करतात. आवश्यकता असल्यास इतर शेतकऱ्यांचे  मार्गदर्शनही ते घेतात, इतरांच्या शेतात त्या पिकाचे कशामुळे नुकसान झाले, ते लक्षात घेतात व चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतात व ते पीक शास्त्रशुद्ध दृष्टीने घेण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नामुळेच १९९७मध्ये गुंडे यांनी हेक्टरी ७५ क्विंटल वाळलेल्या भुईमुगाचे पीक ९० दिवसांत घेण्याचा राष्ट्रीय विक्रम केला.

               कोणताही एक वाण तयार करण्याऐवजी गुंडे यांनी शास्त्रशुद्ध व वैज्ञानिक पद्धतीने शेती करण्यावर अधिक भर दिला. त्यामुळेच त्यांनी वीस वर्षे सातत्याने विक्रमी उत्पन्न घेतले. भुईमुगासोबतच गुंडे यांनी सोयाबीनचे हेक्टरी ५ टन, तर टोमॅटोचे हेक्टरी १०० टन उत्पन्न घेण्यामध्येही सातत्य ठेवले आहे.

               भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांचे भुईमूग व आघारकर संशोधन संस्था, पुणे यांचे सोयाबीन यांचेे ब्रीडरसीड गुंडे यांनी आपल्या शेतात वाढवले. तसेच भुईमुगासाठी वापरले जाणारे पॉलीथीन मलचिंग तंत्रज्ञान गुंडे यांनी वापरले व त्याचा आवश्यकतेनुसार विकास केला. त्याचबरोबरीने इक्रिसॅटच्या रुंद वरंबा व सरी पद्धतीचाही वापर केला.

               गुंडे यांच्या भुईमुगाच्या संदर्भातील ज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी गुजरात, राजस्थान, कर्नाटक, परभणी कृषी विद्यापीठ, कृषी खाती, धारवाड विद्यापीठ इत्यादी ठिकाणी चर्चासत्रे, कार्यशाळा यासाठी त्यांना आमंत्रित केले गेले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन इचलकरंजी फाय फाऊंडेशनतर्फे २०००मध्ये त्यांना राष्ट्रीय पारितोषिक देण्यात आले, तर २००१मध्ये भुईमूग व सोयाबीन यांच्या विक्रमी उत्पन्न घेण्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना कृषिभूषण पुरस्कार देऊन गौरवले. केंद्रीय कृषी मंत्रालय व आय.सी.ए.आर. यांच्यातर्फे त्यांची २०११मध्ये ग्राऊंडनट इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. देशातील प्रमुख संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ व आजूबाजूच्या परिसरांतली शेतकर्‍यांनी त्यांच्या शेताला भेट देऊन भुईमुगाच्या पिकाची पाहणी केली. तसेच चीन, अमेरिका, एस्राएल, मलेशिया, व्हिएतनाम येथील शास्त्रज्ञांनीही गुंडे यांच्या शेतीला भेट दिली. याशिवाय आकाशवाणी आणि दूरदर्शनवरही त्यांच्या मुलाखती झाल्या. आजूबाजूच्या परिसरांतील शेतकऱ्यांना ते विनामूल्य मार्गदर्शन करून सहकार्य करतात.

               गुंडे यांचा १९७७मध्ये जयश्री पाटील यांच्याशी विवाह झाला. त्यांना आपल्या कामामध्ये पत्नीचे सर्वंकष सहकार्य लाभलेले आहे. तसेच त्यांचे भाऊ अजय गुंडे हे त्यांच्यासोबत कार्यरत आहेत.

- डॉ. अर्चना कुडतरकर

गुंडे, जयकुमार बंडू