Skip to main content
x

गुर्टू, शोभा विश्वनाथ

     ठुमरी गायकीमध्ये मोलाची भर टाकून, ती परंपरा लोकप्रिय करून, जगती आणि जागती ठेवण्याचे योग्य श्रेय शोभा गुर्टू यांच्याकडे जाते.
 शोभा विश्‍वनाथ गुर्टू (पूर्वाश्रमीच्या भानुमती शिरोडकर) यांचा जन्म बेळगाव येथे झाला व त्यांचे नंतरचे सारे आयुष्य मुंबईत गेले. मूळच्या गोव्यातील कलोपजीवी कुळातील असल्यानेच सूर-तालाचे बाळकडू त्यांना मिळाले. त्यांची आई मेनकाबाई शिरोडकर व आजीही गायिका होत्या. मेनकाबाई अत्यंत रूपवती, अदा करून ठुमरी गाणार्‍या गायिका म्हणून विख्यात होत्या व त्यांना भूर्जीखाँ व घम्मनखाँकडून मिळालेली तालीम भानुमतीने
  बालवयात जवळून पाहिली. आईच्या  शेजारी बसून ही तालीम, तिचा रियाझ ऐकणे आणि अदाकारी पाहणे यातून त्या बरेच शिकल्या. त्या स्वतःही नथ्थनखाँ यांच्याकडे जयपूर घराण्याची ख्याल गायकी शिकल्या, मात्र त्यांचा स्वाभाविक कल ठुमरीकडेच राहिला.
 लग्नानंतर त्यांचे सासरे नारायणनाथ गुर्टू (बेळगावमधील पोलीस उच्चाधिकारी, एक रसिक व सतारवादक) यांच्या पाठिंब्यामुळे त्या गाणे वाढवू शकल्या. किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, लता मंगेशकर या समकालीन कलाकारांशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते.
 ठुमरीगायन हे एकंदर मराठी मध्यमवर्गीयांनी उपेक्षिलेले क्षेत्र असे म्हणता येईल. त्याला असलेला तवायफ समाजाचा संदर्भ, शृंगारभावनेचे वरकरणी दाखविण्याचे वावडे इ. अनेक कारणे त्यामागे असू शकतात. अशा अस्तंगत होणार्‍या ठुमरीला आपलेसे करून ते जनमानसात रुजवण्याचे मोठे काम शोभा गुर्टू यांनी केले.
 पूरब वा बनारसी ढंग आणि पंजाबी ढंगातील हरकती-मुरक्यांचे प्रमाणबद्ध मिश्रण करून शोभा गुर्टू यांची गायकी पेश झालेली दिसते. गाण्यात असलेली स्वरलयीची उपज, खटका, पुकार, यथायोग्य केलेली रागमिश्रणे, लयीचा मेळ साधून शब्दांचे नजाकतदार व अर्थवाही उच्चारण, शब्दांची मात्रांच्या मधल्या अवकाशातील ठेवण आणि मुख्य म्हणजे प्रगल्भता ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. शोभा गुर्टूंचा आवाज अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होता. काहीशा बसक्या, जाड, मर्दानी आवाजाचा वापर त्यांनी खुबीने ठुमरी गायकीसाठी केला. या आवाजाच्या लगावामुळे त्यांचे भावदर्शन उथळ लाडिक, हलके न होता संयमित होत असे.
 त्यांच्या ठुमरी गायकीत शालीनता, विद्वत्ता व तरीही रसिलेपणा होता. याची साक्ष त्यांच्या अनेक मैफलींमधून आणि ध्वनिमुद्रणांवरून पटते. मैफलीतील गाण्यात
  मानेच्या, हाताच्या, भुवयांच्या हालचाली, स्मितहास्य अशी माफक अदाकारी असायची. ही अदाकारी सांगीतिक आविष्कारापासून अलग, उथळ आणि केवळ शारीरिक नसायची. ती शब्द व संगीताबरोबर एकजीव असायची. त्यातून श्रोत्यांशी मोकळा संवाद साधला जाई. देशा-विदेशांत त्यांनी सर्व महत्त्वपूर्ण रंगमंचांवरून प्रस्तुती केली. बिरजू महाराजांच्या कथक नृत्यासह गायनही केले.
 ठुमरी-दादरा घाटातील कजरी, सावन, झूला, चैती, फाग, होरी, बारहमासा, ‘केसरिया बालम पधारो म्हारे देस’सारखा राजस्थानी मांड असे विविध प्रकार त्या लालित्याने पेश करत. ठुमरीच्या दीपचंदी, जत, कहरवा, दादरा या प्रचलित ठेक्यांबरोबरच त्यांनी अष्टरूपक- सारख्या अप्रचलित तालांतही गायन केले. मैफलीत त्या
  यमन, सोहनीसारख्या रागांतील एखादी बंदिशही बंधी ठुमरीसह गात. मास्टर दीनानाथांच्या धाटणीची ‘शांतदांत कालिका ही’, ‘नाचत ना गगनात नाथा’सारखी नाट्यपदे त्या मैफलीत गात. उर्दू गझलचाही त्यांचा चांगला व्यासंग होता. अनेक गझलांना त्यांनी स्वरबद्ध करून त्याही उत्तम रितीने पेश केल्या. बेगम अख्तर यांचा प्रभाव त्यांच्या गझल गायनावर होता व त्यांना ‘छोटी अख्तरी’ असे संबोधले गेले. ठुमरीच्या बाजाची काही भजनेही त्या गात.
 पारंपरिक रचना तर त्या गातच आल्या; पण त्या स्वतःही उत्तम वाग्गेयकार होत्या. त्यांनी काही ठुमर्‍या, बंदिशी स्वतः रचून, त्यांची सांगीतिक बांधणी केली, त्या मैफलींतून पेशही केल्या. ‘रंगी सारी गुलाबी चुनरिया’, ‘मोरे सैंया बेदर्दी’, ‘पतझड़ आई सखिया’ ही पतझडची रचना, ‘सैंया निकस गए मैं ना लड़ी थी’ (संत कमालीचे पद) इ. अनेक ठुमर्‍या-दादर्‍यांची निर्मिती त्यांनी केली. ठुमरीसाठी सामान्यपणे न वापरलेले रागही त्यांनी वापरले, उदा. बिभास व भटियार (आ जा रे आ जा मीत पिहरवा), जनसंमोहिनी (मोरे घर आए). ठुमरीसह त्यांनी काही बंदिशींची निर्मितीही केली.
 ‘धन्य ते संताजी धनाजी’, ‘कलावंतीण’, ‘लाल माती’ इ. मराठी व ‘पाकीजा’, ‘दस्तक’, ‘प्यासी औरत’, ‘फागुन’, ‘प्रहार’ अशा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. ‘मैं तुलसी तेरे आंगन की’ या चित्रपटातील ‘सैंया रूठ गए’ या दादर्‍याच्या गायनासाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायना’चा फिल्मफेअर पुरस्कार (१९७८) मिळाला.
 मराठी भावगीताच्या क्षेत्रातही शोभा गुर्टूंनी आपला ठसा उमटवला. संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी त्यांच्याकडून ठुमरीचा ढंग असणारी ‘उघड्या पुन्हा जहाल्या’, ‘त्यांनीच छेडले ग’, ‘बोल कन्हैया’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘रे नंदलाला तू छेडू नको’, (काव्य : उमाकांत काणेकर), ‘अधीर याद तुझी’ (वंदना विटणकर) ही भावगीते, तसेच दशरथ पुजारी यांनी ‘अहो जाईजुईच्या फुला’ व ‘तुझी सुरत मनात भरली’ (काव्य : शांता शेळके) अशी भावगीते गाऊन घेतली आणि तीही रसिकप्रिय ठरली. त्यांचा पुत्र व विख्यात ड्रमर त्रिलोक गुर्टू यांच्यासाठी त्यांनी फ्युजन- प्रकारच्या रचनाही गायल्या. त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्या, आकाशवाणी व दूरदर्शन या माध्यमांतून त्यांची कला रसिकांसमोर सातत्याने येत राहिली.
 ‘संगीत नाटक अकादमी’ सन्मान (१९८७), ‘पद्मभूषण’ (२००२), ‘लता मंगेशकर’ पुरस्कार, ‘शाहू महाराज’ सन्मान, ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार, इ. पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला. त्यांच्या साफल्यपूर्ण जीवनाची अखेर मुंबईत झाली. सरला भिडे, शुभा जोशी, धनश्री पंडित, राजश्री पाठक यांसारख्या प्रवीण शिष्याही त्यांनी तयार केल्या. महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांचा शिष्यवर्ग आहे. त्यांचे दोन्ही पुत्र संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत.

डॉ. शुभदा कुलकर्णी, चैतन्य कुंटे

गुर्टू, शोभा विश्वनाथ