Skip to main content
x

घारे, मुकुंद अनंत

मुकुंद अनंत घारे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे वडील अनंत घारे हे बांधकाम ठेकेदार होते, तर आई इंदिराबाई घारे या गृहिणी होत्या. घारे कुटुंब हे मूळचे बारामतीचे. आजोबा गोविंद घारे बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे शिक्षक असणारे वडीलही या क्षेत्रात आले.

घारे यांनी शालान्त परीक्षेनंतर १९५०मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात बी.एस्सी.साठी प्रवेश घेतला आणि  १९५४मध्ये ते पदवीधर झाले. पुढच्या काळात त्यांनी भूगर्भातील पाणी जोखून त्याचे पुनर्भरण करण्यासाठी ग्रामविकासाची कास धरली.

घारे यांनी काही वर्षे वडिलांच्या बांधकाम व्यवसायात  अनुभव घेतला. १९६६मध्ये ते शशिकला कोकणे यांच्याशी विवाहबद्ध झाले. आणि त्याच वर्षी भूगर्भशास्त्र या विषयात एम.एस्सी.ला प्रवेश घेतला आणि १९६८मध्ये एम.एस्सी. पूर्ण केले. भूगर्भशास्त्र या विषयात ते एम.एस्सी.ला पुणे विद्यापीठात प्रथम वर्ग मिळवून पहिले आले होते. त्यांनी जीवाश्मशास्त्र (पॅलिएन्टॉलॉजी) या विषयावर संशोधन सुरू केले आणि १९७४मध्ये पुणे विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. त्यामध्ये त्यांना भूगर्भशास्त्राबरोबरच वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, भूजलशास्त्र, समुद्रातील विविध प्रकारचे जीव आदींचा अभ्यास करता आला. या संशोधन कार्याकरता त्यांनी त्या वेळी नर्मदेचे संपूर्ण खोरे पालथे घातले. तेव्हाच त्यांनी तेथील आदिवासी, भौगोलिक, सामाजिक व पर्यावरणीय परिस्थिती यांचा अभ्यास केला. या सर्वांशी त्यांचे नाते कायमचे जुळून गेले. नर्मदा खोर्‍याचे सर्वांगीण महत्त्व लक्षात आल्यामुळेच  त्यांनी नर्मदा बचाव आंदोलनाला सुरुवातीपासूनच निःसंदिग्ध पाठिंबा दिला.

पीएच.डी.साठीचे संशोधन करतानाच त्यांनी, भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘जिओ-एक्प्लोरर्स’ या नावाने एक संस्था स्थापन केली आणि बॉक्साइट, मँगेनीज, लोह, खडकातील फॉस्फेट आदी खनिजांच्या खाणींचे खनन करण्याची कंत्राटे घेण्यास सुरुवात केली. राज्यभर १९७१च्या दुष्काळाने हाहाकार माजवला होता, तेव्हा खेड्यापाड्यांतून पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्यामुळे अडीचशे स्वयंसेवी संस्थांचा महासंघ असलेल्या ‘अफार्म’च्या कामाचे महत्त्व खूपच वाढले होते. शासनाने देखील ग्रामीण भागातील जनतेसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची विशेष योजना सुरू केली. अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये घारे यांनी एक भूगर्भ व भूजलशास्त्रज्ञ या नात्याने ‘अफार्म’ संस्थेचे सल्लागार म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि त्याअंतर्गत ग्रामीण भागात विविध ठिकाणी जमिनीखालील पाण्याचा शास्त्रीय पद्धतीने शोध घेण्यासाठी सर्वत्र भटकंती सुरू केली. सुरुवातीला व्यवसायाचा भाग म्हणून जरी हे कार्य सुरू केले, तरी ग्रामीण जनतेचे दुःख व हालअपेष्टा त्यांना दिसत होत्या. या कार्याचा परिपाक म्हणून घारे यांनी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गोवा या राज्यांमधून भूगर्भात पाणी असलेल्या सुमारे तीन हजार जागांची निवड केली. एक प्रथितयश भूगर्भ व भूजलशास्त्रज्ञ म्हणून ‘अफार्म’ संस्थेच्या माध्यमातून पाणलोटक्षेत्र विकास, जलनियोजन व जलव्यवस्थापन, भूगर्भातील पाण्याचा शोध घेऊन कूपनलिकांसाठींच्या जागांची पाहणी, हातपंप दुरुस्तीचे प्रशिक्षण, ग्रामीण विकासात महिलांचा सहभाग, यांसारखे बहुविध कार्यक्रम त्यांनी राबवले.

स्वतःचा व्यवसाय, तसेच ‘अफार्म’ संस्थेचे सल्लागार म्हणून काम करत असतानाच नवे तंत्रज्ञान शिकण्याच्या तीव्र इच्छाशक्तीमुळेच त्यांनी जेरुसलेम येथून ‘भूगर्भातील पाण्यावरील संशोधन’ (१९८०) या अभ्यासक्रमातील पदविका प्राप्त केली. घारे यांना  महाराष्ट्राबरोबरच अन्य  राज्यातील सरकारांनी त्यांच्या ज्ञान व अनुभवाचा लाभ उठवण्यासाठी वेळोवेळी निमंत्रित केले.

डॉ. घारे यांची १९८९मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्य विज्ञान व तंत्रज्ञान परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये निवड झाली आणि जवळपास २०१०पर्यंत ते सदर परिषदेच्या कार्यात सक्रिय होते. तसेच ‘युनिसेफ’सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेनेदेखील त्यांच्या कार्याची दखल घेतली व स्थानिक पातळीवरील युवक तंत्रज्ञांना हातपंप दुरुस्ती, जमिनीत ड्रिल मारणे या स्वरूपाचे विविध प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना पाचारण केले. डॉ. घारे यांनी १९९१पासून २००७पर्यंत ‘अफार्म’च्या अध्यक्षपदाची धुरा अत्यंत समर्थपणे वाहिली. त्यांनी ‘अफार्म’ संस्थेच्या माध्यमातून देशभर स्वयंसेवी संस्थांचा मोठा प्रभाव निर्माण केला.

 लातूर येथील प्रलयंकारी भूकंपानंतरच्या पुनर्वसनाच्या  कार्यात सहभागी होऊन ‘अफार्म’च्या माध्यमातून डॉ. मुकुंद घारे यांनी उस्मानाबाद व लातूर परिसरात व राज्यातील दुष्काळी भागात पाणलोट क्षेत्र विकासाचे कार्य सुरू केले. या परिसरात कार्य करण्यासाठी राज्यभरातून आलेल्या स्वयंसेवी संस्थांची एक समन्वय समिती तयार करण्याच्या कामी डॉ. घारे यांनी पुढाकार घेतला आणि भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कार्यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच देश व राज्यातील तीनशेहून अधिक संस्थांचे ते सक्रिय मार्गदर्शक बनले. जागतिक बँक, युनिसेफ, देशातील अनेक राज्यांतील पाण्याविषयीच्या उच्चस्तरीय समित्यांचे, तसेच ‘कपार्ट’सारख्या राष्ट्रीय संस्थेचे सदस्य या नात्याने डॉ. घारे यांनी पर्यावरण, पिण्याचे पाणी आणि वापराच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन, पाणलोट क्षेत्र विकास, सार्वजनिक आरोग्य, आदी प्रश्‍नांवर काम केले.

‘राजीव गांधी वॉटर मिशन’अंतर्गत पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश व तमिळनाडू या राज्यांच्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठीच्या योजनेचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी केंद्र शासनाने डॉ. घारे यांच्यावर टाकली होती. त्यानंतर डॉ. घारे यांनी २००७मध्ये ‘अफार्म’मधून निवृत्ती पत्करली. त्यांनी ‘यशदा’मध्ये वि.स. पागे अध्यासनाचे प्रमुख मार्गदर्शन म्हणूनही कार्य केले.

डॉ. घारे यांनी जीवाश्मशास्त्र (पॅलिएन्टॉलॉजी) या विषयावर आजवर ७६, जलशास्त्र (हायड्रॉलॉजी) या विषयावर १५, तर पाण्याशी संबंधित विषयांवर २७ संशोधनपर लेख लिहिले. त्याचबरोबर देशभर फिरून त्यांनी विविध विषयांवर व्याख्याने देऊन विविध पातळीवर जनजागृती करण्याचे कसोशीने प्रयत्न केले.

डॉ. घारे यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने पुणे येथील संचेती रुग्णालयात झाले.

- प्रशांत कोठडिया 

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].