Skip to main content
x

जाधव, भास्कर बंडू

             भास्कर बंडू जाधव यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील आसद या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत, तसेच उच्च माध्यमिक शिक्षण आसद गावाजवळील देवराष्ट्र येथील यशवंतराव विद्यालयामध्ये झाले. पुढे त्यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन प्रथम श्रेणीत बी.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली. त्यांनी १९७५मध्ये म.फु.कृ.वि.मधून वनस्पती-शरीरक्रियाशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवीदेखील प्रथम श्रेणीत संपादन केली. ही पदवी प्राप्त केल्यावर १ ऑगस्ट १९७५पासून बा.सा.को.कृ.वि, दापोलीअंतर्गत प्रादेशिक भात संशोधन केंद्र, कर्जत (रायगड) येथे भात शरीरक्रियाशास्त्रज्ञ या पदावर रुजू झाले. त्यांनी १९८६मध्ये भा.कृ.अ.सं., नवी दिल्ली येथून वनस्पति- शरीरक्रियाशास्त्र या विषयात पीएच.डी. पदवी मिळवली. टेक्सास कृषी अभियांत्रिकी विद्यापीठ, अमेरिका येथून त्यांनी वनस्पतिशास्त्रातील प्रगत तंत्रज्ञानासंबंधी प्रशिक्षण घेतले.

            डॉ. जाधव यांना शैक्षणिक काळात विविध शिष्यवृत्त्या  मिळाल्या होत्या. त्यामध्ये गुणवत्ता शिष्यवृत्ती, पी.जी. भट शिष्यवृत्ती, १९६९-१९७५ या काळात नॅशनल लोन स्कॉलरशिप व पीएच.डी.च्या अभ्यासक्रमासाठी भा.कृ.अ.प., नवी दिल्लीतर्फे सीनियर फेलोशिप यांचा समावेश होतो. बा.सा.को.कृ.वि.तील संशोधन केंद्रामध्ये त्यांनी विविध पदांवरील जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडल्या. त्यामुळे त्यांची २००८मध्ये संशोधन संचालक म्हणून नेमणूक झाली. त्यांच्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळामध्ये त्यांनी वनस्पती शरीरक्रियाशास्त्राच्या दृष्टीने सुधारित वाणांचा विविधांगी अभ्यास केला. खरीप हंगामातील कमी सूर्यप्रकाश आणि अतिवृष्टीमुळे संचित जल परिस्थितीत भाताच्या वाणाने दिलेला उत्तम प्रतिसाद हा त्या वाणाच्या पानातील हरितद्रव्य-ब या घटकाच्या अधिक प्रमाणामुळे असतो, हे जाधव यांनी प्रयोगाअंती सिद्ध केले आहे. कोकण प्रांतात औषधी आणि सुगंधी वनस्पती पिकांत मोठ्या प्रमाणात जैविक विविधता आढळते. त्यांचे संवर्धन करण्यातही डॉ.जाधव यांचा मोठा सहभाग आहे. औषधी व सुगंधी वनस्पती संशोधन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक या नात्याने त्यांनी कोकण विभागातील एकूण ७०१ वनस्पतींचे मूल्यांकन करून, जतन करण्यासाठी राष्ट्रीय जनुकीय संग्रहालय, नवी दिल्ली येथे पाठवले. यांपैकी ४८० औषधी वनस्पतींची राष्ट्रीय स्तरावर नोंदणी झाली आहे. त्यामुळे या औषधी वनस्पतींचे दुसरे कोणीही एकस्व घेऊ शकणार नाहीत. डॉ. जाधव यांना भारतीय वनस्पती -शरीरक्रियाशास्त्र संस्थेचा १९९६-१९९७ फेलो पुरस्कार, श्रीसागरेश्‍वर शास्त्रज्ञ पुरस्कार (२००१), राष्ट्रीय गौरव पुरस्कार (२००४), डॉ. अण्णासाहेब शिंदे उत्कृष्ट कृषिशास्त्रज्ञ पुरस्कार (२००९), असे पुरस्कार मिळाले.

          डॉ.जाधव यांनी लिहिलेल्या ‘औषधी व सुगंधी वनस्पती लागवड’ या पुस्तकास मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता लाभली. औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यासाठी याचा उपयोग अनेकांना झाला. त्यांनी २१ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी, तर २ विद्यार्थ्यांना पीएच.डी.च्या अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शन केलेले आहे.

- संपादित

जाधव, भास्कर बंडू