जाधव, गजानन नारायण
मासिकांची मुखपृष्ठे, विविध लेख, कथांसाठीची रेखांकने, व्यक्तिचित्रे व निसर्गचित्रांसाठी प्रसिद्ध असलेले चित्रकार गजानन नारायण ऊर्फ ग.ना. जाधव यांचा जन्म कोल्हापूरचा; परंतु त्यांची कर्मभूमी मुंबई-पुणे होती. त्यांच्या आईचे नाव तानाबाई. परिस्थितीमुळे त्यांचे शालेय शिक्षण केवळ चौथ्या इयत्तेपर्यंत झाले. लहानपणापासून ते चित्रकलेत रमत. अठराव्या वर्षी त्यांनी चित्रकलेच्या ग्रेड परीक्षा दिल्या व प्रत्येक वेळी अव्वल यश संपादन केले. इथूनच त्यांच्या चित्रकलेचा प्रवास सुरू झाला. घरीच गणपतराव वडणगेकर व बाबूराव पेंटर यांच्याकडून चित्रकलेचे धडे घेणे सुरू झाले. पुढे बाबा गजबर, माधवराव बागल, चित्रकार जांभळीकर या गुरूंचेही त्यांना मार्गदर्शन मिळत गेले. १९४२ मध्ये त्यांचा विवाह इंदिरा कदम यांच्याशी झाला.
रेखाटनांवरचे प्रभुत्व पाहून माधवराव बागल यांनी जाधवांना शंकरराव किर्लोस्करांकडे पाठविले. चित्रकलेतले ज्ञान, कौशल्य व श्रम बघून शंकररावांनी जाधवांना किर्लोस्कर कंपनीत नोकरीस ठेवून घेतले. त्यांना संधी मिळावी म्हणून माधवराव बागल यांनी शिफारसपत्र दिले होतेच. जाधवांच्या आयुष्याला येथे दिशा मिळाली. किर्लोस्कर कंपनीत, ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ व ‘मनोहर’ या मासिकांसाठी मुखपृष्ठ व आतील मजकुरांसाठी रेखाचित्रे काढण्याचे काम होते. सतरा वर्षांच्या या प्रयोगशील चित्रकाराने हे काम करताना विविध तंत्रे वापरून अनेक प्रयोग केले. ही नोकरी चालू असतानाच त्यांनी मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून १९५३ मध्ये जी.डी. आर्ट पेन्टिंगचा अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत पूर्ण केला.
या कंपनीत मासिकांचे काम करताना खऱ्या अर्थाने जाधवांच्या प्रतिभेला वाव मिळत होता. इथे त्यांचा चित्रकलेबरोबर वाङ्मयाचाही अभ्यास होत होता. मासिकांसाठी आलेले लेख, कथा, कविता आधी वाचून त्यावर चित्रे काढावी लागत असत. जाधव चित्रण योग्य प्रसंग निवडत व त्यांचे तेवढेच उत्कृष्ट, परिणामकारक चित्र वा रेखाटन करीत. मोठमोठ्या साहित्यिकांचा सहवास व मार्गदर्शन मिळाल्यामुळे कलेला पोषक असे वातावरण त्यांना लाभले.
चित्राचा विषय, त्याची मांडणी, त्यातली गती, भावनेचा आविष्कार, कुंचल्यावरील प्रभुत्व, रंगातली कलात्मकता यामुळे अल्पावधीतच साऱ्या महाराष्ट्रातील लोक त्यांना ओळखू लागले. मासिकांच्या मुखपृष्ठासाठी ग.ना.जाधव, दलाल आणि सिरूर हे तीन कलाकार प्रसिद्ध होते. या सर्वांनी चित्रांबद्दल एक अभिरुची निर्माण केली. जाधवांनी चित्रातून महाराष्ट्राची कालानुरूप बदलत चाललेली संस्कृती, ग्रमीण संस्कृती, सण, उत्सव, कला, नामांकित व्यक्तिमत्त्वे यांचा परिचय वाचकांना करून दिला. दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठांवरील कौटुंबिक प्रसंग-चित्रांमुळे वाचकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित होत असे. अशा चित्रांच्या माध्यमातून आपोआपच वाचकांवर भारतीय संस्कृती व परंपरांचे संस्कार होत असत. ना.सी फडके यांच्या ‘अंजली’ मासिकासाठी व डॉ. सरोजिनी बाबर यांच्या अनेक पुस्तकांसाठी तसेच अनेक कथा, कादंबऱ्या साठीही त्यांनी रंगचित्रे काढली.
सुरुवातीपासून पेन्सिल, चारकोल, पेन व शाईचा योग्य वापर, ब्रश व फटकाऱ्यातील विविधता, काळ्या-पांढऱ्या रंगातील आकारांची समर्पक, ठसठशीत मांडणी यांमुळे त्यांची चित्रे वैशिष्ट्यपूर्ण ठरत असत. अशा प्रकारे रेखाटनांमध्ये ते विविध तंत्रांचा अवलंब करीत. ब्रॉड स्ट्रोक, बारीक टोकाने पण हळुवारपणे हाताने काढलेली ओघवती व सफाईदार रेषा, रचनाकौशल्य, योग्य ठिकाणी मनुष्याकृतीचा वापर, यामुळे चित्राची गुणवत्ता वाढत असे. स्केचिंग करताना रेल्वेत बसलेले प्रवासी, रस्त्यावरील भिकारी, नदीवरील यात्रेकरू यांची चित्रे ते ‘स्नॅपशॉट’प्रमाणे काढत. ते कुठेही प्रवासात, गायनाच्या मैफलीत लग्न-समारंभात, कार्यक्रमात, सण-उत्सवांत प्रत्यक्ष त्या प्रसंगाची चित्रे काढीत. हा जिवंत प्रसंग चित्रात पकडण्यासाठी त्यांच्या खिशात नेहमी स्केचबुक व पेन्सिल असायची. त्यांना हे व्यसनच होते. घाईघाईत टिपलेले ते स्केच फावल्या वेळेत व्यवस्थित करून, कटिंग, पेस्टिंग व माउण्ट करून ठेवत.
त्यांची निसर्गचित्रेही दर्जेदार असत. आउटलाइन व जलरंग माध्यमावर त्यांची हुकमत होती. रंगलेपनातील धीटपणा, पारदर्शकता, काही ठिकाणी पांढरा रंग वापरून ‘ग्वॉश’ पद्धतीचे चित्रण, अपारदर्शक पोस्टर कलर्सचा ब्रश व नाइफने केलेला वापर, यांमुळे चित्र आकर्षक व्हायचे. जलरंग माध्यमातील ‘दादा’ या त्यांच्या चित्रास १९७१ मध्ये महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनात प्रथम पारितोषिक मिळाले होते. महाराष्ट्राच्या इतिहासाचे प्रतीक असलेले त्यांचे ‘कल्याणचा खजिना’ हे चित्र त्यांनी भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भेट दिले होते. हे चित्र आजही दिल्लीला राष्ट्रपती भवनाच्या संग्रहात विराजमान आहे. दिल्लीच्या तालकोटा मैदानावर १९५१ मध्ये ‘कृषिप्रधान हिंदुस्थान’ हे कृषिप्रदर्शन आयोजित केले होते. महाराष्ट्राच्या स्टॉलवर जाधवांच्या चित्रांचे प्रदर्शन होते. भाऊ किर्लोस्करांनी किर्लोस्करवाडीहून या प्रदर्शनासाठी चाळीस जणांचा जामानिमा स्वखर्चाने दिल्लीला पाठविला होता. प्रदर्शन बघायला आलेल्या पंडित नेहरूंनी या मराठी कलासाधकाचे भरभरून कौतुक केले. मार्च १९६१ च्या ‘स्त्री’ मासिकाच्या मुखपृष्ठावरील पंडित नेहरू, इंदिरा गांधी व लहानगा राजीव गांधी या तीन पिढ्यांच्या चित्रावर पंडितजी खूश झाले. त्या चित्रावर त्यांनी स्वाक्षरी केली. याच प्रसंगी जाधवांनी पंडित नेहरू व इंदिरा गांधींचे केलेले एक मूळ चित्र नेहरूंना भेट दिले.
जलरंगांच्या व्यक्तिचित्रातील ग.ना. जाधव यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे होते. रंगात आधुनिकतेची छाप, पण मॉडर्न आर्टची दुर्बोधता नाही. चित्रात कुठेही विकृती नाही. त्यात भावनेचा आविष्कार व गतीही होती. तंत्र, प्रतिभा, भावना आणि बुद्धी यांचा सुरेख संगम या कलासाधकात पाहायला मिळतो.
पुणे विद्यापीठातील कर्मवीर शिंदे व ना. यशवंतराव चव्हाण, नवीन विद्याभवनातील पंडित जवाहरलाल नेहरू, ‘ल.का.कि.’ यांच्या संग्रहातील लक्ष्मणराव किर्लोस्कर व शंतनुराव किर्लोस्कर, बालगंधर्व कला दालनातील बालगंधर्व, नाशिक येथील कला महाविद्यालयातील ‘अरुणा’ हे चित्र, अशी अनेक उत्तम चित्रे ग.ना.जाधवांच्या कौशल्याची साक्ष देतात. प्रसिद्ध लेखक वि.द. घाटे यांच्या प्रत्यक्ष सिटिंंगवरून काढलेल्या ‘दादा’ या चित्रास तर पुरस्कार मिळाला.
त्यांनी अनेक नामांकित व्यक्तींची प्रत्यक्ष सिटिंगवरून काढलेली चित्रे आहेत; त्यांत कलामहर्षी बाबूराव पेंटर, गणपतराव वडणगेकर, कर्मवीर भाऊराव पाटील, म.म. दत्तो वामन पोतदार, प्र.के.अत्रे, शिल्पकार तालीम, शंकरराव किर्लोस्कर, शंतनुराव किर्लोस्कर, कवयित्री शांता शेळके, ह.ना. आपटे, ना.सी. फडके, मालती किर्लोस्कर, अनंत काणेकर, चित्रकार अलमेलकर, चित्रकार रवींद्र मिस्त्री, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कवी मनमोहन, गोपीनाथ तळवलकर यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारतर्फे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे टपालतिकीट काढण्यात आले तेव्हा लक्ष्मणराव किर्लोस्करांचे छायाचित्र न घेता त्या तिकिटाचे डिझाइन किर्लोस्कर यांच्या आग्रहावरून ग.ना. जाधव यांच्याकडून घेतले गेले व तेच शासनाने प्रसिद्ध केले.
ग.ना.जाधव यांना चित्रात वास्तवता दाखवायला आवडायची; पण आधुनिक कलेचेही ते निरीक्षण करत. त्यांचे आवडते चित्रकार म्हणजे व्हॅन गॉग, मातिस, मॉदिग्लियानी, रेम्ब्रां, पिकासो, हुसेन व रझा हे होते. ग.ना.जाधवांचे वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी निधन झाले.
- डॉ. नयना कासखेडीकर