Skip to main content
x

जांभळीकर, श्रीपाद गोपाळ

चित्रकार

सांगलीच्या कलापरंपरेत ज्या कलाकारांचे नाव घेतले जाते, त्यांत पंत जांभळीकरांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. कला क्षेत्रात पंत जांभळीकर या नावानेच ते संबोधिले जात.

श्रीपाद गोपाळ जांभळीकरांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांचे मूळ गाव इचलकरंजीजवळील कोल्हापूर जिल्ह्यातील जांभळी. बालपणी दीड वर्षाचे असताना वडिलांचे निधन झाल्याने मामांच्या घरी त्यांचा सांभाळ झाला. त्यांच्याकरिता आईने फार काबाडकष्ट सोसले. बेळगावात त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. शालेय जीवनात चित्रकलेच्या विषयात विशेष प्रगती पाहून तत्कालीन कलाशिक्षक अष्टेकर मास्तरांनी त्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले.

चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याकरिता त्यांनी मुंबईच्या सर जे.जे. स्कूलऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. जे.जे.चे तत्कालीन प्रिन्सिपल कॅ. ग्लॅडस्टन सॉलोमन यांचे ते आवडते विद्यार्थी होते. घरच्या गरिबीमुळे शिष्यवृत्तीच्या आधारे त्यांनी शिक्षण पुरे केले. ते १९३० साली पदविका परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ‘डॉली कर्सेटजी’ पुरस्कार आणि ‘सुवर्णपदक’सारखे अनेक बहुमान त्यांनी प्राप्त केले. शैक्षणिक काळात त्यांनी निसर्गचित्रण व व्यक्तिचित्रण या विषयांवर प्रभुत्व मिळविले. त्या सोबतच त्या काळात भारतीयत्व जपणार्‍या ‘बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ या कलाचळवळीच्या ‘वॉश टेक्निक’ शैलीतही त्यांनी दर्जेदार चित्रनिर्मिती केली. त्यांच्या अशा चित्रांना भारतातील प्रदर्शनांमधून मान्यताही मिळाली.

विद्यार्थिदशेत लंडनमधील एका प्रदर्शनात त्यांचे चित्र विकले गेले, त्या काळी त्या रकमेत पदविका परीक्षेचे शुल्क व इतर खर्च भागविता आला. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने त्यांना सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टची शिष्यवृत्तीदेखील मिळाली.

जे.जे.मधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अर्थार्जनासाठी व्यावसायिक व्यक्तिचित्रणासोबतच चित्रकलेच्या खाजगी शिकवण्याही सुरू केल्या. एका ब्रिटिश विद्यार्थिनीच्या आग्रहामुळे इंग्लंडला जाण्याची संधी त्यांच्याकडे चालत आली होती. परंतु कौटुुंबिक अडचणीमुळे विदेशवारीचा बेत त्यांना रहित

करावा लागला. पुढे मुंबईच्या वास्तव्यात त्यांनी ‘द मॉडर्न आर्ट क्लासेस’ आणि ‘स्टूडिओ ओरिएंट’ अशा संस्था स्थापन करून चित्रकला शिक्षणाचे कार्य सुरू केले.

त्यांनी १९४२ मध्ये, दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी          बॉम्बहल्ल्याच्या भीतीने जांभळीकरांनी कुटुंबियांच्या आग्रहास्तव मुंबई सोडली व ते सांगलीला स्थायिक झाले. सांगलीजवळ माधवनगर येथे ‘मॉडर्न आर्ट क्लासेस’ आणि ‘शोभा फोटो स्टूडिओ’ची स्थापना करून त्यांनी कलाशिक्षणाची पुनः सुरुवात केली. पश्‍चिम महाराष्ट्र, सांगली, कोल्हापूर व कर्नाटक सीमेलगतचे अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे कलाशिक्षणाकरिता येऊ लागले.

त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कलानिर्मितीद्वारे देशविदेशांत नावलौकिक मिळविला. गुजर, धामणीकर, दत्तोपंत ओतारी, ग.ना. जाधव, बसवंत, बी.आर. शेंडगे, नार्वेकर, कल्याण शेट्ये, व्ही.जी. पाटील, असे पंतांचे मार्गदर्शन लाभलेले अनेक विद्यार्थी आहेत. पंतांनी स्वतः इंडियन डेकोरेटिव्ह आर्ट, मॉडर्न शैलीतली रचनाचित्रे, निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे आणि म्यूरल्स अशा सर्व प्रकारची कलानिर्मिती केली. पण लौकिक अर्थाने ते चित्रकलेचे गुरुकुल चालविणारे आदर्श कलाशिक्षक म्हणून नावाजले गेले.

त्यांच्या निसर्गचित्रांत अचूक आरेखन, परिप्रेक्ष्याचा सुयोग्य वापर, जलरंगाचे प्रवाहीपण व रंगछटांद्वारे छायाप्रकाश व त्रिमिती निर्माण करण्याचे कौशल्य दिसून येते. त्यांच्या निसर्गचित्रांची हाताळणी काहीशी मुक्त होती. व्यक्तिचित्रणातही त्यांनी अशाच प्रकारचे स्वातंत्र्य घेण्यास सुरुवात केली होती. त्या काळात जे.जे. स्कूलमध्ये जोमात असलेल्या भारतीय पुनरुज्जीवनवादी शैलीतही त्यांनी अत्यंत दर्जेदार अशी वॉश टेक्निकमधील चित्रे रंगविली. त्यांच्या अशा चित्रांतले वास्तववादी रेखन, रचनेतून व रंगलेपनातून साधलेले वेगळेपण आणि एकावर एक असे रंगलेपन करीत निर्माण केलेले गूढ वातावरण हे त्या काळात कलाकृतीचा वेगळाच अनुभव देणारे ठरले.

सांगलीत स्थिरावल्यामुळे ते मुख्य कलाक्षेत्रापासून काहीसे दूर गेले होते. हळूहळू त्यांची चित्रनिर्मितीही कमी झाली. सांगलीमधील कलारसिकांसाठी १९८३ मध्ये त्यांनी समकालीन आणि जुन्या मान्यवर कलावंतांच्या चित्र-शिल्पांचे भव्य प्रदर्शन भरविले. त्यांत आबालाल रहिमानपासून बाबूराव सडवेलकरांपर्यंतचे कलाकार समाविष्ट होते. व्ही. शांताराम यांनी ‘शकुंतला’ या चित्रपटाचे कलानिर्देशन पंत जांभळीकरांनी करावे म्हणून सुचवले होते. त्याकरिता पौराणिक प्रसंगांचा अभ्यास करून जांभळीकरांनी स्केचेस केली होती; पण ते प्रत्यक्षात झाले नाही.

त्यांनी स्वा. वि.दा. सावरकर, डॉ. हेडगेवार, गोव्याचे माजी मुख्यमंत्री बांदोडकर, मास्टर दीनानाथ मंगेशकर, गुरुदेव रानडे, अंबूराव महाराज अशा अनेक मान्यवरांची व्यक्तिचित्रे रंगविली.

कलानिर्मितीबरोबर ते संगीत, संस्कृत साहित्याचे जाणकार होते.  हसतमुखाने सतत शाब्दिक कोट्या आणि नकला करणे हा त्यांचा स्वभाव होता. चार कलावंत एकत्र जमले की जांभळीकरांच्या नकला हमखास होत असत. 

पंत जांभळीकरांनी आपल्या जीवनाला व कलानिर्मितीला आध्यात्मिक अधिष्ठान दिले होते. वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.

- वासुदेव कामत

 

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].