Skip to main content
x

जोशी, आत्माराम भैरव

       भारतातील १९५० सालानंतरच्या कृषी शिक्षण व संशोधन कार्यातील महत्त्वाच्या योगदानाबद्दल तसेच ज्यांच्या संशोधन व विकासाभिमुख दृष्टीने भारतात हरितक्रांती झाली त्यांच्यापैकी एक असलेल्या आत्माराम भैरव जोशी यांचा जन्म जबलपूर (मध्य प्रदेश) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे झाले. त्यांनी १९३२मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण केली. पुढील शिक्षणाकरता जोशी यांनी नागपूर येथील विज्ञान महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि त्यांनी १९३७मध्ये ही नागपूर विद्यापीठाची बी.एस्सी. पदवी प्राप्त केली. त्यांनी प्रथम वर्गात सुवर्णपदकही मिळवले. त्यांची पुढील सर्व वाटचाल कृषिविज्ञानक्षेत्रात झाली. नवी दिल्ली येथील भा.कृ.सं.सं.तील (पुसा इन्स्टिट्यूट) ‘इकॉनॉमिक बॉटनी’ या विषयात त्यांनी असोसिएटशिप प्राप्त केली. ही पदवी एम.एस्सी.(कृषी)च्या समकक्ष होती. एम.एस्सी. झाल्यानंतर जोशी यांनी त्याच संस्थेत संशोधन साहाय्यक म्हणून कामास सुरुवात केली. जोशी यांनी त्यांच्या कर्तृृत्वाने पुढे या संस्थेचे प्रमुख म्हणूनही कार्य केले. ही संस्था देशात व परदेशात नावारूपाला आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. १९४७मध्ये पीएच.डी. पदवी अभ्यासक्रमासाठी इंग्लंड येथे जाण्याकरता त्यांची निवड झाली. त्यांनी १९५०मध्ये केंब्रिज विद्यापीठातून ‘सायटोजेनेटिक्स’ या विषयात पदवी प्राप्त केली. भारतात परतल्यानंतर भा.कृ.अ.सं.त निरनिराळ्या पदांवर काम करत १९५९मध्ये त्यांची वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली. भा.कृ.सं.सं.स ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’ म्हणून १९५८मध्ये मान्यता मिळाली आणि ही संस्था भारतातील उच्च कृषी शिक्षणाची मातृसंस्था म्हणून गौरवली गेली. या संस्थेचे पहिले अधिष्ठाता म्हणून १९६१मध्ये डॉ. जोशी यांनी कामास सुरुवात केली. शैक्षणिक कार्यक्रमात अनेक बदल घडवून भारतातील कृषी समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. पुढे १९६५मध्ये याच संस्थेचे ते संचालक झाले. दोन वर्षे भा.कृ.अ.प.चे ते उपमहानिर्देशक म्हणून कार्यरत होते.

       डॉ. जोशी यांच्यावर १९६०-१९६१ या काळात भा.कृ.अ.सं.ने भारतातील गहू पिकाच्या संशोधनाचे जाळे विणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. या संस्थेचे अधिष्ठाता म्हणून काम करताना या गहू प्रकल्पाची जबाबदारी त्यांना पेलावी लागली. हीच भारतातील समन्वित पीक संशोधनाची गंगोत्री होती. एका पिकावर विविध विषयांचे तज्ज्ञ एकत्रित आणून देशातील अनेक संशोधन केंद्रांवर सर्वंकष चाचण्या करून पिकांच्या जातीविषयी, उत्पादन तंत्राविषयी माहिती मिळवणे, हा याचा प्रमुख उद्देश होता. आधी भारतात गहू पिकावर संशोधन होतच होते. परंतु एका राज्यातील संशोधनाचा दुसर्‍या राज्यातील संशोधनाशी संबंध येत नव्हता व खुलेपणाने माहितीही दिली जात नव्हती. समन्वित संशोधन प्रकल्पाद्वारे निरनिराळ्या भू-हवामान विभागात लागवड पद्धतीत एकाच वेळी चाचण्या होऊ लागल्यामुळे पिकांच्या जाती, लागवडी इ.संबंधी दोन-तीन वर्षांतच त्यांचे शिफारशींचे निर्णय घेणे शक्य होऊ लागले. पूर्वी या गोष्टींना १०-१० वर्षे लागत. पुढे अनेक पिकांवर व पद्धतींवर अशा समन्वित प्रकल्पाच्या संशोधन योजना सुरू होऊन त्यांच्या शिफारशी प्रसारित करणे शक्य झाले. त्यामुळे उत्पादनवाढीचे लक्ष गाठणे शक्य झाले. याच प्रयत्नातून मेक्सिकन जातीच्या बुटक्या गव्हाच्या, भाताच्या, संकरित मका, ज्वारी व बाजरी पिकाच्या जाती निर्माण होण्यास मदत झाली. ही सर्व परिस्थिती ‘हरितक्रांती’ची सुरुवात होण्यास साहाय्यभूत ठरली. भारत १९६०पर्यंत अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात गहू, ज्वारी, मका आयात करत असे. ती परिस्थिती पुढील दहा वर्षांत पालटून भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. डॉ. जोशी यांच्या या महान कार्याचा गौरव म्हणून १९७६मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

       डॉ. जोशी यांनी दिल्लीतील भा.कृ.अ.सं. व कृ.अ.प. या संस्थांमध्ये प्रथमपासूनच काम केल्यामुळे त्यांची कृषी संशोधन व विकासाबद्दलची दृष्टी विशाल होऊन प्रादेशिक समस्यांबद्दलचे आकलन परिपूर्ण झाले. केवळ उत्तम व जातिवंत वाण करून न थांबता त्यांचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांच्या शेतावर दाखवणे महत्त्वाचे आहे, अशी त्यांची धारणा होती. संशोधकांबरोबरच राजकीय नेतृत्वदेखील महत्त्वाचे असते असा त्यांना अनुभव आला. आय.ए.आर.आय.चे अधिष्ठाता म्हणून काम करताना त्यांची व अण्णासाहेब शिंदे यांची (शिंदे कृषी विभागाचे पार्लमेंटरी सेक्रेटरी असताना) ओळख झाली. या ओळखीचे मैत्रीत रूपांतर होऊन आय.ए.आर.आय.च्या प्रायोगिक विभागाला शिंदे यांच्या वरचेवर भेटी झाल्या. याच सुमारास (१९५८-१९६६) मेक्सिको येथून आलेल्या गव्हाच्या जातींच्या चाचण्या सुरू होत्या. या जातींच्या गव्हाची उत्पादनक्षमता ३५ ते ४० क्विंटल प्रति हेक्टर होती. डॉ. जोशी यांनी या नव्या वाणांचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांच्या शेतावर घेण्याची कल्पना सूचवली. अण्णासाहेब शिंदे यांना ही कल्पना पसंत पडून त्यातूनच ‘राष्ट्रीय प्रात्यक्षिक योजने’चा जन्म झाल्याचे डॉ. जोशी यांनी नमूद केले आहे. पुढे त्यांना १९६७-६८मध्ये आय.ए.आर.आय.च्या प्रायोगिक क्षेत्रास भेट देत असताना सूर्यफूल व सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर प्रात्यक्षिके घेण्याची कल्पना सूचवली.

       त्या काळी राज्यातील शेती विभाग या कामास तयार नव्हता. परंतु केंद्रीय कृषी मंत्री सुब्रह्मण्यम व अण्णासाहेब शिंदे यांनी या सर्व सरकारी खात्यांना त्याचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे या दोन पिकांच्या प्रात्यक्षिकांना सर्व राज्यांत सुरुवात झाली. मध्य प्रदेश तर सोयाबीन राज्य झाले. आज महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश इ. राज्यांत सोयाबीन व सूर्यफूल या दोन पिकांना महत्त्व येऊन तेलबियांचे उत्पादन वाढले. हे सर्व डॉ. जोशी व त्या वेळच्या राजकीय नेतृत्वाच्या दूरदृष्टीमुळे होऊ शकले. डॉ. जोशी हे पहिल्या शैक्षणिक आयोगाचे (कोठारी आयोग) सदस्य होते. त्यांनी १९६०-१९६५ या काळात प्रत्येक राज्यात एका कृषी विद्यापीठाची स्थापना करण्याबद्दल आग्रह धरला. प्रायोगिक तत्त्वावर उत्तर प्रदेशमध्ये पंतनगर येथे पहिले कृषी विद्यापीठ सुरू झाले. त्यानंतर पंजाब व मध्य प्रदेशमध्ये कृषी विद्यापीठांची स्थापना झाली. आज भारतभर ३६पेक्षा अधिक कृषी विद्यापीठे आहेत. शिक्षण, संशोधन व विस्तार कार्य एकत्रित करण्याचा प्रयत्न यामुळे साध्य होतो. डॉ. जोशी संशोधन व विकास कार्यात गुंतलेले होते, तरी ते स्वतः नियमित शैक्षणिक जबाबदारी पार पाडत होते. त्यांनी एकंदर ४६ विद्यार्थ्यांना एम.एस्सी. व पीएच.डी. या पदव्यांकरता मार्गदर्शन केले आहे. त्यांची व्याख्याने अतिशय उद्बोधक व समस्यांना भिडणारी होती.

       डॉ. जोशी यांनी मूलभूत व व्यावहारिक बाबींवर संशोधन केले आहे. त्यात कापूस, बार्ली, राई व ट्रिटिकेल यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी कपाशी पिकातील संकरित जोम व भिन्न प्रजातींच्या संकरीकरणाबद्दलचे महत्त्वाचे संशोधन केले आहे. तीळ पिकातील गुणसूत्राबद्दलचे त्यांचे संशोधन जगभर मान्य झालेले आहे. डॉ. जोशी यांनी सुचवलेल्या पद्धतीने जगातील पहिला संकरित कापूस वाण डॉ. सी.टी. पटेल यांनी निर्माण केला (एच ४). त्याकरता हजारो हातांना काम मिळाले. या संकरित कापसामुळे कापूस उत्पादनात लक्षणीय भर पडून कापड गिरण्यांची भरभराट झाली. त्यांनी इंडियन जर्नल ऑफ जेनेटिक्स अँड प्लँट ब्रिडिंगमध्ये संशोधनपर लेख लिहिले आणि या नियतकालिकाचे संपादक म्हणून अनेक वर्षे कार्य केले.

       डॉ. जोशी यांना कृषी संशोधनामध्ये केलेल्या महत्त्वाच्या कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय संस्थांवर काम करण्याची संधी प्राप्त झाली. त्यांनी इंटरनॅशनल टीम फॉर इंप्रूव्हमेंट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रीसर्च ऑर्गनायझेशन इन इंडोनेशिया - सदस्य (१९६९); एफ एक्स ओ प्रोजेक्ट मॅनेजर फॉर इंपप्रूव्हमेंट ऑफ फिल्ड क्रॉप प्रॉडक्टिव्हिटी इन इजिप्त - सदस्य (१९७२-७६); इंटरनॅशनल पोटॅटो रीसर्च इन्स्टिट्यूट, लिमा (पेरू) - बोर्ड ऑफ डायरेक्टर्स; टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी कमिटी ऑफ कन्सल्टेटिव्ह ग्रुप ऑन इंटरनॅशनल अ‍ॅग्रिकल्चर रीसर्च वॉशिंग्टन यू.एस.ए., मनिला (फिलिपिन्स) - सदस्य (१९७७-७८); इंटरनॅशनल क्रॉप रीसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी एरिड ट्रॉपिक्स-हैदराबाद, इकाडी (सिरिया), ईटा (नायजेरिया), सिएट (कोलंबिया) या संस्थांमार्फत संशोधन करत असलेल्या पिकांच्या जगातील बहुतेक उपलब्ध जातींचा व संबंधित रानटी जातींचा संग्रह केला असून त्या योग्य तर्‍हेने जतन केल्या जात आहेत. हे सर्व काम रिओडी जानेरो-ब्राझील येथे जैवविविधतेसंबंधी झालेल्या जागतिक बैठकीच्या आधारे इंटरनॅशनल बोर्ड ऑफ प्लँट जेनेटिक रिसोर्सेस, रोम (इटली)-सदस्य (१९७४-१९७७); इंटरनॅशनल सर्व्हिसेस फॉर नॅशनल अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च हेग-सल्लागार (१९८१-१९८२); वर्ल्ड बँक मिशन टू टांझानिया-सदस्य (१९७९) या संस्थांमध्ये कार्यरत होते.

       डॉ. जोशी १९७२-१९७६ या दरम्यान नॅशनल कमिटी फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या समितीचे सदस्य होते. ते १९७७-८० या कालावधीत म.फु.कृ.वि.चे कुलगुरू होते. या काळात त्यांनी विद्यापीठामध्ये संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल करून संस्था नावारूपाला आणली. डॉ. जोशी यांना इंडियन सायन्स अ‍ॅकेडमी, इंडियन अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेस, नॅशनल अ‍ॅकेडमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चर सायन्सेस, महाराष्ट्र अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन बोटॅनिकल सोसायटी यावर सदस्य म्हणून कार्य केले. त्यांनी इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लँट ब्रीडिंग, अध्यक्ष (१९६२ व १९६९) म्हणूनही कार्य केले. त्यांना इंडियन अ‍ॅग्रिकल्चरल रीसर्च इन्स्टिट्यूट - नवी दिल्ली; जी. बी. पंत कृषी विद्यापीठ पंतनगर (उत्तर प्रदेश); मराठवाडा कृषी विद्यापीठ - परभणी (महाराष्ट्र) या विद्यापीठांनी ‘सन्माननीय डॉक्टर ऑफ सायन्स’ या पदवीने गौरविले आहे. त्यांना १९७६मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार प्रदान केला व याच साली त्यांना नॉर्मन बोरलॉग पुरस्कारही प्राप्त झाला.

       जागतिक कीर्तीचे कृषितज्ज्ञ डॉ. स्वामिनाथन् यांनी ‘डॉ. जोशी हे गेल्या शतकातील महत्तम कृषी शास्त्रज्ञ होते’, असा उल्लेख केलेला आहे.

- डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

जोशी, आत्माराम भैरव