Skip to main content
x

जोशी, नारायण गजानन

नारायण जोशी यांनी टीकाकार व मार्मिक काव्य-परीक्षक म्हणून लौकिक मिळविलाच, पण विशाल दृष्टीचे विचारवंत कवी म्हणूनही त्यांचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे आहे. आंजर्ले या जन्मगावच्या रम्य निसर्गाचा व तिथल्या चालीरीती, तिथले सण, उत्सव व व्रतवैकल्ये, आजीची गीते आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी ह्यांचा त्यांच्यावर बालपणी चांगलाच ठसा उमटला. बालपणापासून असलेली संगीताची आवड त्यांनी व्यासंगाने जोपासली.

महाड येथील वास्तव्यात जोशींनी खूप वाचन केले. १९२९ साली त्यांची बाबाराव सावरकरांची व १९३० साली मॅट्रिकच्या अभ्यासाच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट झाली, आणि त्यांच्या प्रभावी लेखनप्रणालीचा व लोकमान्यांच्या विचारप्रणालीचा प्रभाव जोशींवर पडला. महाड सोडून सौराष्ट्रातील भावनगरच्या शामळदास महाविद्यालयामध्ये त्यांनी १९३१मध्ये पदार्पण केले. पहिल्या वर्षी त्यांना संस्कृत विषयातील ‘विद्याराम शिष्यवृत्ती’ व इंटरला ‘ग्रेडेशन स्कॉलरशिप’ मिळाली. इंग्लिश विषय घेऊन ते बी. ए. (ऑनर्स) झाले. १९३७ साली ते इंग्लिश व संस्कृत विषय घेऊन एम.ए. झाले. नंतरच्या काळात बडोदा विद्यापीठात ते मराठी व इंग्लिश ह्या विषयांचे अध्यापन करीत. १९३८ साली गुजरातीतील ‘मानसी’ मासिकात ‘महाराष्ट्रना दिदेरो: ज्ञानकोशकार केतकर’ हा लेख त्यांनी लिहिला. महाविद्यालयात असतानाच त्यांनी स्फुट काव्यरचना केली. त्यांचे ‘जीवनयोग’ नावाचे देशभक्तिपर खंडकाव्य १९४२साली प्रसिद्ध झाले. चिंतनात्मक काव्याचा हा एक चांगला नमुना आहे. ‘कविता’ (१९४७) या भावगीतात्मक कवितांच्या संग्रहातील शेवटची अभंगात्मक गीते वातावरण निर्माण करतात. १९५०साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘विश्वमानव’मध्ये त्यांच्या तत्त्वचिंतनशील प्रतिभेची झेप दिसून येते. यामध्ये भावात्मकता व चिंतनशीलता हातात हात घालून प्रकट होतात. त्यांचे मुक्तछंद व मुक्तशैली यांचे प्रयोग लक्ष वेधून घेतात. १९५९मध्ये त्यांनी संपादित केलेल्या ‘प्राचीन गीत भांडार’मध्ये मध्ययुगीन मराठी गीतांचा संग्रह असून त्याला वेधक अशी प्रस्तावना आहे. ‘मराठी छंदोरचना’ (१९५४) ह्या ग्रंथातून माधवराव पटवर्धनांच्या ‘छंदोरचना’चा मागोवा घेत त्यांनी छंदोरचनेचा लयदृष्ट्या पुनर्विचार मांडला आहे. या ग्रंथावरच जोशींना डॉक्टरेटची पदवी मिळाली. ‘मराठी छंदोरचनेचा विकास’ (१९५७) ह्या ग्रंथात त्यांनी मराठी पद्यरचनेचा ऐतिहासिक विकास दर्शविला आहे व वैशिष्ट्यपूर्ण नमुने सादर केले आहेत.

पांडित्य प्रदर्शनामुळे त्यांचे काव्य काही ठिकाणी क्लिष्ट व दुर्बोध झाले आहे, पण कवी अनिलांची मानवतावादी निबंधकाव्य लिहिण्याची परंपरा जोशींनी परिणत अवस्थेला नेली. ‘माझ्या राजाला नाव कुणी ठेवू नका’ सारखी सरस गीतेही ते लिहू शकले. मर्मज्ञ व साक्षेपी काव्यचिकित्सक जोशी यांचा ‘साहित्य विवेचन’ (१९६९) हा समीक्षात्मक ग्रंथ होय. याशिवाय ‘आमच्या बा’ (कस्तुरबा गांधी चरित्र, १९४६) व ‘बापू माझी आई’ (१९४८) हे दोन गुजरातीतून मराठीमध्ये केलेले त्यांचे अनुवाद-ग्रंथ होत. सद्भिरुचिसंपन्न ना. ग. जोशी हे स्वतःच्या निर्मितीशी प्रामाणिक होते व काव्यातील नव्या प्रवाहांचे स्वागत करण्याच्या वृत्तीचे होते. अहमदाबाद येथील आठ वर्षांच्या वास्तव्यात जोशी यांनी तेथील महाराष्ट्र समाजाच्या पत्रिकेच्या संपादनाची धुरा वाहिली.

- वि. ग. जोशी

जोशी, नारायण गजानन