Skip to main content
x

काणे, दत्तात्रेय विष्णू

त्तात्रेय विष्णू काणे यांचे मूळ गाव इचलकरंजी. वडील विष्णू बलवंत काणे राजदरबारी उत्तम हार्मोनिअम वादक म्हणून होते. त्यामुळे संगीताचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले. त्यांच्या आईचे नाव काशीताई होते.
सुरुवातीला तिथेच काही काळ पं. काळेबुवा  (बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचे एक शिष्य) यांच्याकडेच काणे यांनी तालीम घेतली. कलासक्त श्रीमंत नारायण घोरपडे यांचे काण्यांकडे लक्ष गेले व त्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांनी पुण्याला गांधर्व महाविद्यालयात पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे शिक्षणासाठी पाठवले.  नारायण घोरपडे यांचे देहावसान झाल्यावर  काणे यांचे शिक्षण बंद पडले. परंतु त्या काळात ते ‘संगीत विशारद’ झाले. प्रो. ग.ह. रानडे यांनी काणे यांना डॉ. भडकमकरांची शिष्यवृत्ती मिळवून दिली व त्यांचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे आणखी एक नामांकित गायक पं. मिराशीबुवा यांच्याकडे सुरू झाले. ग्वाल्हेर गायकीचे राग, तानपलटा, बोलबनाव त्यांच्या गळ्यावर अतिशय सुंदर रितीने चढले.
याच काळामध्ये काणे यांना उ. विलायत हुसेन खाँ साहेबांचे गाणे ऐकायला मिळाले. त्यांच्या गायकीचा काण्यांवर खूप प्रभाव पडला आणि त्यांनी आग्रा घराण्याचे गाणे शिकायचे ठरवले. त्यासाठी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या साहाय्याने त्यांनी इचलकरंजीत एक मोठा गंडाबंधन समारोह केला. खाँ साहेबांना त्या काळी काणेबुवांनी एक हजार रुपये गुरुदक्षिणा दिली. त्या समारंभाचे अध्यक्ष ना.सी. फडके हे होते. विलायत हुसेन खाँ साहेबांनी काणेबुवांना आपल्या मुलाप्रमाणे शिकवले.
त्या वेळी काणेबुवा मुंबईत दादासाहेब आपटेंच्या घरी राहून शिकत असत. तेव्हा त्यांचे अनेक गायक -वादकांशी संबंध प्रस्थापित झाले. केसरबाई केरकर यांचाही काणे यांच्या गाण्यावर प्रभाव होता. उ. अब्दुल करीम खाँ साहेबांचे गाणेही त्यांनी खूप ऐकले होते. तसेच काणे कोल्हापूरला उ. भुर्जी खाँ साहेबांकडेही जात असत. उ. फैयाज खाँ साहेबांच्या गाण्याचे तर ते भक्तच होते. तसेच मास्तर कृष्णराव व बालगंधर्व यांच्याही गाण्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता.
ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर, तसेच किराणा या चारही घराण्यांतून अनेक गोष्टी घेऊन, त्या गोष्टींचा विचार करून काणे यांनी स्वत:ची अशी एक स्वतंत्र शैली विकसित केली. काणे बालगंधर्वांची नाट्यपदे व भजनेही अत्यंत सुंदर गात असत. उ. विलायत हुसेन खाँ साहेब गेल्यावर साधारणपणे १९६० नंतर काणे यांनी आपला मुक्काम हलविला व ते इचलकरंजी येथे कायमस्वरूपी स्थायिक झाले.

इचलकरंजी येथे काणे शेतीवाडी करत संगीताचा प्रचार-प्रसार करू लागले. यातून अनेक शिष्यगण तयार झाले. काण्यांनी इचलकरंजीला बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांच्या नावाने एक संस्था सुरू केली. बाळकृष्णबुवांचे हे एक भव्य स्मारक इचलकरंजीत सध्या दिमाखाने उभे आहे. पु.ल. देशपांडे यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन झाले. बाळकृष्णबुवांच्या तीन दिवस पुण्यतिथीचा महोत्सव काणे करीत, तसेच पलुस्करांची पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा हेही अनेक कार्यक्रम करत. त्यामुळे अनेक नामवंत गायक वादकांचे येणे-जाणे तिथे सुरू झाले.
नवीन पिढीसाठी काणे यांनी शास्त्रीय व नाट्यसंगीत स्पर्धा सुरू केली. आयुष्यभर संगीतातील शाश्वत मूल्यांचा अभ्यास करून पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांची परंपरा पुढे चालू ठेवण्याचा त्यांनी अखंड प्रयत्न केला. नरेंद्र कणेकर, शरद जांभेकर, हृषिकेश बोडस, शिवानंद पाटील, मंगला जोशी, रेखा रायरीकर, मंगला आपटे, मंजूषा पाटील हे त्यांचे काही नावाजलेले शिष्य. इचलकरंजी भागात काणे यांनी अनेक शिष्य तयार केले. तसेच भजनी मंडळीतून रागदारीचा भजनाद्वारे प्रसारही केला.
गांधर्व महाविद्यालयाने काणे यांना ‘संगीताचार्य’ ही पदवी बहाल केली, तसेच फाय फाउण्डेशनने ‘उत्तम गुरू व उत्तम गायक’ म्हणून त्यांना पुरस्कार प्रदान केला. आकाशवाणीचे ते मान्यता प्राप्त गायक होते. मधुमेहाच्या विकाराने मिरजेेच्या मिशन रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या नावाने ‘पं. द. वि. काणेबुवा संगीत प्रतिष्ठान’ ही संस्था कार्यरत आहे.

     — मंजुषा पाटील

काणे, दत्तात्रेय विष्णू