काणेकर, अनंत आत्माराम
अनंत काणेकर यांचा जन्म मुंबईला झाला. मुंबईतील गिरगावच्या चिकित्सक समूह हायस्कूलमधून ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले (१९२२). सेंट झेवियर महाविद्यालयामधून संस्कृत विषयात बी.ए.पदवी संपादन केली (१९२७), आणि १९३०-३२ मध्ये वकिलीची सनद घेतल्यानंतर त्यांनी मुंबईत वकिली सुरू केली. ती जेमतेम २-३ वर्षे केल्यावर अन्य व्यवसाय-वाटचालीसमवेत त्यांनी साहित्याच्या प्रांतात मुशाफिरी केल्याचे दिसते.
महाविद्यालयीन दिवसात ‘चांदरात आणि इतर कविता’ या त्यांच्या कविता संग्रहातल्या काही कविता काणेकरांनी लिहिल्या होत्या. त्याच वेळी सुटीतल्या दोन-अडीच महिन्यांत ‘डॉल्स हाउस’ या इब्सेनच्या नाटकाचा मराठी अनुवाद त्यांनी केला. दुसरी गोष्ट त्या आठ-दहा दिवसांत करून टाकली ती म्हणजे हस्तलिखितात पडलेल्या ‘चांदरात’मधल्या बर्याच कवितांपैकी तीस-बत्तीस कवितांचा इंग्रजी अनुवाद करून टाकला (१९२७).
साधारण १९३० ते १९३५ या कालखंडात मराठी नाट्यक्षेत्रात नवे वारे वाहू लागले. वा.वा.भोळे यांचे ‘सरलादेवी’, वर्तकांचे १९३३मधले ‘आंधळ्यांची शाळा’, १९३४मधले अत्र्यांचे ‘घराबाहेर’ ही नाटके नव्या प्रवाहाची निदर्शक म्हणून नमूद करण्यासारखी आहेत. याच काळात अनंत काणेकरांनी इब्सेनच्या ‘डॉल्स हाउस’चे ‘घरकुल’ या नावाने मराठी रूपांतर केले. त्याला प्रसिद्धीचा प्रकाश मात्र १९४१ साली दिसला. काणेकरांनी जे नाट्यलेखन केले, ते मुख्यतः रूपांतरित स्वरूपाचे असून ‘निशिकांताची नवरी’ (गोल्डस्मिथ- १९३८), ‘फास’ (डब्ल्यू. ओ. सोमिन- १९५०), ‘पतंगाची दोरी’ (जेम्स बॅरी- १९५१), ‘झुंज’ (जॉन गॉल्सवर्दी- १९७४) ही त्यांची ‘घरकुल’खेरीज इतर रूपांतरित नाटके होत. प्रसंगनिष्ठ विनोदाने रसिकांचे मनोरंजन करणारे बाळबोध वळणाचे ‘निशिकांताची नवरी’ हे नाटक व ‘पतंगाची दोरी’मधील प्रमुख व्यक्तिचित्रण सरस साधले आहे. ‘फास’मध्ये दोनच पात्रे असून त्यातील उत्कंठा अखेरपर्यंत कायम ठेवण्याचे त्यांचे कसब निःसंशय कौतुकास्पद आहे, असा अभिप्राय डॉ.अ.ना.देशपांडे (आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास) यांनी नोंदविला आहे.
काणेकरांनी एकांकिका लेखनाच्या क्षेत्रातही रूपांतराचा प्रयत्न केला. ‘धूर आणि इतर एकांकिका’ (१९४१) या संग्रहातील ‘सैंपाकणी’, ‘धूर’, ‘श्री शिवाजी शहाजी भोसले’, ‘पैजार’ आणि ‘बांदिवलीत डॉक्टर’ या एकांकिका स्वतंत्र स्वरूपाच्या तर ‘आत्महत्या’, ‘बांदिवलीच्या मास्तरणी’ व ‘संप’ या रूपांतरित आहेत. ‘डिक्टेटर’ ही मात्र भाषांतरित आहे.
‘घरकुल’च्या प्रसिद्धीचे १९४१ हे वर्ष मराठी नाट्यवाङ्मयाच्या इतिहासात आणखी एका दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. १९४०च्या सुमारास मराठी रंगभूमी अगदी मोडकळीस आली होती. १९३३ ते १९४० या काळात मराठी रंगभूमीला ज्यांच्यामुळे प्रगतीची आणि वैभवाची अवस्था प्राप्त झाली त्या ‘नाट्यमन्वंतर’ आणि ‘बालमोहन’ या नाटक कंपन्यांच्या कर्तृत्वाचा बहर या कालखंडाच्या अखेरीस बराचसा ओसरून गेला होता. अत्र्यांना रंगभूमीपेक्षा रजतपटाचे आकर्षण अधिक वाटू लागले. १९४०च्या आसपास मराठी रंगभूमी चैतन्यहीन झाली होती. बोलपटांचा वाढता प्रभाव, नाट्यकला निर्वासित होण्यास कारणीभूत ठरत होता. १९४१च्या सुमारास मो.ग.रांगणेकरांनी वृत्तपत्र सृष्टीचा त्याग करून नाट्यसृष्टीत पदार्पण केले. ‘नाट्यनिकेतन’मधून नव्या नाटकांचे आगमन होऊ लागले. त्यात संस्थापनेपासून अनंत काणेकरांचा सहभाग होता. अनंत काणेकरांच्या ‘चांदरात’मधल्या काही कवितांचा समावेश रांगणेकरांच्या नाटकात झाला आहे. ज्योत्स्ना भोळे यांनी ही गीते समरसून गाइली आणि ती अत्यंत लोकप्रिय झाली. विशेषतः ‘आला खुशीत समिंदर’, ‘चल ग सखे रानामधे, चाफ्याचं फूल तुझ्या कानामधे’ अशा कविता फार लोकप्रिय झाल्या. ‘तू माझी अन् तुझा मीच’, ‘एकलेपणाची आग’ अशी काणेकरांची भावगीते वर्तकांनी हौसेने आपल्या नाटकात घातली. भावगीतकार म्हणून काणेकरांची महाराष्ट्रभर कीर्तीही झाली आणि ‘आता कशाला उद्याची बात’ या गाण्याने तर पुढे लोकप्रियतेचा कळस गाठला. ‘प्रभात’ कंपनीच्या ‘माणूस’ चित्रपटाची पटकथा काणेकरांनी लिहिली, आणि रंगभूमीबरोबरच रजतपटामध्येही काणेकरांचे नाव झाले.
यापूर्वीच्या काणेकरांच्या ‘चांदरात’ १९३३ मधील कवितांनी तोवर मराठी काव्याच्या प्रांतात सर्वांचे लक्ष वेधले होते. प्रचलित कवितेची धाटणी बदलून तिची ‘चाल’ आधुनिक आकर्षक आणि वास्तवाभिमुख होण्याच्या पाऊलखुणा ‘चांदरात’मध्ये आहेत. माधवराव पटवर्धनांनी म्हटल्याप्रमाणे या कवितेत आशेचे उद्गार, निराशेचे निःश्वास, विनोदाचा विलास आणि विडंबन विहारही आहे. विविध रुचीच्या रसिकांना रंगविण्याचे त्यात भरपूर सामर्थ्य आहे. अतिरिक्त व विसंगत कल्पना आणि शैली यांची विडंबने (विशेषतः रविकिरण मंडळाच्या काळातील कवितांबाबत) विनोदप्रिय रसिकांना मार्मिक वाटण्याजोगी आहेत आणि प्रेमगीते चाहणार्या रसिकांची हौस पुरविण्याचे भरपूर सामर्थ्य या कवितेत आहे. ‘कवने’, ‘दोन भक्त’ यांमधील कविकल्पनेचे तत्कालीन समीक्षकांनी कौतुक केले. काणेकरांनी ‘मराठी कवितेच्या क्षेत्रात नव्या मनूच्या पताका फडकविल्या’ असे के. नारायण काळे या त्यांच्या समकालीन समीक्षकाच्या दृष्टीतून दिसते.
नव्या वस्तुनिष्ठ भावना, कल्पना यथार्थतेने व्यक्त करण्याच्या दृष्टीने काव्यातील परंपरागत संकेत अपुरे पडतात, असा अनुभव आल्यामुळे आणि त्या अनुभवाशी एकनिष्ठ राहण्याचे काणेकरांनी ठरविल्यामुळे त्यांनी १९३१ नंतर काव्यलेखन कमी केले. ‘चांदरात’च्या दुसर्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत काणेकरांनी याचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात, “आजूबाजूच्या जगाकडे पाहिल्यानंतर ज्या वस्तुनिष्ठ भावना किंवा कल्पना माझ्या मनात उत्पन्न होतात, त्या गद्यात मी चांगल्या तर्हेने व्यक्त करू शकेन किंवा त्यांपैकी ज्या काव्यात व्यक्त करण्यासारख्या असतील, त्या व्यक्त करण्याचे नवीन माध्यम मला अजून सापडत नसेल.” स्वतःच्या प्रतिभेच्या वैशिष्ट्यांशी आणि मर्यादांशी एकनिष्ठ राहण्याची काणेकरांची ही वृत्ती निःसंशय अभिनंदनीय आहे. तसेच बदलत्या काळाची व व्यक्तित्वाची हाक ओळखण्याची त्यांची कुशलताही लक्षणीय आहे. ‘चौकोनी आकाश’मधून (१९७४) त्यांच्या संपादित कवितांच्या प्रा.रमेश तेंडुलकर यांच्या निरीक्षणातून ही बाब पुनः अधोरेखित झाली आहे.
कथाकार काणेकरांचा एक वेगळा दृष्टीकोन त्यांच्या कथासंग्रहातून प्रत्ययाला येतो. ना.सी.फडके, वि.स.खांडेकर, य.गो.जोशी, वि.वि.बोकील, द.र.कवठेकर इत्यादी लेखकांच्या कथावाङ्मयापासून काणेकरांची कथा बहुधा अलिप्त राहिलेली आहे. अतिरेकी भावव्याकुलता, योगायोग इत्यादीपासून ती दूर आहे. वर उल्लेखिलेली बदललेली भूमिका बहुधा कथालेखनाबाबतही कार्यरत झाली असावी. कारण त्यांच्या कथालेखनात भावना व बुद्धी या दोन्ही शक्तींच्या विकासाला यथाप्रमाण वाव मिळालेला आहे. सुरुवातीच्या म्हणजे १९२५-३० पर्यंतच्या कथांत सौंदर्यात सत्य पाहण्याची वृत्ती आहे. पुढील कथांत मात्र सत्यात सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न आहे. सुरुवातीला कल्पनावादात रमणारी त्यांची लेखणी पुढे यथार्थदर्शन घडवू लागली आहे. ‘रक्ताची खूण’ (१९२५) पेक्षा ‘प्रेमाचा मोसम’ (१९३६) मधील व्यक्तिदर्शन वास्तवतेच्या संभाव्य अपेक्षा पूर्ण करणारे आहे.
काणेकरांचे लघुनिबंध हे त्यांच्या साहित्यविश्वाचे आणखी एक आणि अनोखे लक्षणीय दालन आहे. आपल्या विचारांची मांडणी ते आटोपशीर, आकर्षक आणि ठसठशीतपणे करतात. ना.सी.फडके, वि.स.खांडेकर अशा लघुनिबंध लेखकांपेक्षा त्यांचा लघुनिबंध तंत्रशरणतेला दूर करून आणि तत्त्वजडतेला बाजूस सारून मोकळा-ढाकळा, मिस्कील, स्वतंत्र आणि गप्पिष्ट असूनही मनात विचारांचे सहज आरोपण करणारा आहे. त्यांच्या स्वभावाप्रमाणेच त्यांचा लघुनिबंधही हवेहवेसे चित्र निर्माण करणारा, वास्तव अनुभवांशी सलगी करणारा आहे तरी त्यात कल्पकता आहे. धक्का देऊन विषयाची नवी बाजू प्रकाशात आणणारा, रसिकाला सहभागी करून घेणारा आहे. काणेकरांची स्पष्ट आणि परखड विचारसरणी त्यातून प्रकट होते. दृष्टी प्रगतीशील असून सामाजिक विषमता तिला अगदी अमान्य आहे. ‘पिकली पाने’ (१९३४), ‘शिंपले आणि मोती’ (१९३६), ‘तुटलेले तारे’ (१९३८), ‘उघड्या खिडक्या’ (१९४५), ‘नवे किरण’ (१९४७), ‘विजेची वेल’ (१९५६), ‘पांढरी शिडे’ (१९५७) व ‘खिडकीतले तारे’ (१९६४) हे त्यांचे लघुनिबंध संग्रह त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर उभे करतात. हे व्यक्तिमत्त्व लौकिक जीवनाशी समन्वय साधणारे आहे. संकेतप्रियता आणि रूढ समजुतींना धक्के देण्याची त्यांची पद्धत खेळकर असूनही इच्छित परिणाम साधते. सामाजिक टीकाकाराची भूमिका घेऊनही मिस्कील, सहज, हळुवार अशी ही टीका रसिकास भावते. ‘घड्याळाचे गुलाम’, ‘झोपेचे फायदे’ अशा सहज आठवण्यासारख्या लघुनिबंधांतून त्यांच्या अनौपचारिक लेखनशैलीचा प्रत्यय वाचकांना येतो.
या संदर्भात त्यांनी निर्माण केलेले ‘गणूकाका’ हे पात्र विरोधी भूमिकेसाठी आणि संघर्षासाठी आले आहे. त्यांच्या स्वतःच्या स्वभावधर्माप्रमाणे त्याची अखेर समन्वयात होते. आख्यायिका, दंतकथा, चुटके इत्यादींचा वापर, उपहास विनोद यांच्याद्वारा दांभिकतेचा आणि प्रतिगामी वृत्तीचा हसत-खेळत घेतलेला परामर्श, यामुळे हे लघुनिबंध आकर्षक आणि विचारांना चालना देणारे ठरतात. या लघुनिबंधांचे खरे बळ भावनात्मकतेत किंवा कल्पनाविलासात नसून खेळकर वृत्तीची जोड असलेल्या प्रगमनशील स्वरूपाच्या मार्मिक वैचारिकतेत आहे आणि त्यांच्या विचारांच्या स्वतंत्रतेत आहे.
१९३५ ते १९४१ या काळात ‘चित्रा’ साप्ताहिकाचे संपादक म्हणून काणेकरांचा वृत्तपत्रसृष्टीशी निकटचा संबंध आला. त्यात समकालीन प्रचलित नाट्यसृष्टीची, सिनेसृष्टीची चाहूल, यथार्थवादी विचार इत्यादींचा परामर्श येतो.
काणेकरांनी ‘अनन्तिका’ (१९७९-१९८१) या त्यांच्या आत्मकथनात्मक लेखांच्या संकलनपर स्मृतिलहरींतून त्यांची जीवनसरिता (म्हणजे अनन्तिका) प्रकाशित केली. या आठवणी त्यांनी अत्यंत तन्मयतेने सांगितल्या आहेत. काणेकरांनी वाङ्मयीन प्रयोग केले, असे लोक म्हणतात त्यावर काणेकरांचे म्हणणे असे की, मी साहित्यामध्ये प्रयोग करण्याऐवजी साहित्यानेच माझ्यावर प्रयोग केले आहेत! ‘अनन्तिके’तून अनंत काणेकर व्यक्ती आणि सन्माननीय साहित्यिक यांची वळणे सुबोध शैलीत प्रकट झाली आहेत. त्यांची स्मरणे चित्रदर्शी आहेत. आठवणी नेमक्या व तपशील समूर्त करणार्या आहेत. स्वतःचे मूल्यमापन तटस्थपणे करण्याची त्यांची पद्धती आत्मलेखनाला एक विश्वसनीयता व उंची प्राप्त करून देते.
१९३१ च्या दरम्यान काणेकरांचा कल कम्युनिस्ट विचारसरणीकडे जाऊ लागला होता. पुढे रशियाचा प्रवास वगैरे करून आल्यानंतर ‘धुक्यातून लाल तार्याकडे’ (१९४०-१९६७-१९७१), ‘आमची माती आमचे आकाश’ (१९५०) अशी नव्या प्रकारची प्रवासवर्णने काणेकरांनी लिहिली. मराठीतील प्रवासवृत्तलेखन आधुनिक अभिरुचीच्या दिशेने वाटचाल करू लागल्याची स्पष्ट चिन्हे अनंत काणेकरांच्या पुस्तकात उमटली आहेत. पहिल्यात युरोपच्या व दुसर्यात रशियाच्या प्रवासाचा वृत्तान्त आलेला आहे. चित्रकार दलालांबरोबर जो आनंद त्यांनी लुटला, तो ‘आमची माती---’ मध्ये शब्दबद्ध करून ठेवला आहे. या प्रवासवर्णनांवर काणेकरांच्या व्यक्तित्वाची व त्यांच्या मर्मस्पर्शी रसिकतेची छाप पडली आहे. भटकंतीची आवड त्यांना अखेरपर्यंत होती.
‘निळे डोंगर तांबडी माती’ (१९५७), ‘रक्ताची फुले’ (१९५९), ‘खडक कोरतात आकाश’ (१९६४), ‘लाल तार्यांच्या प्रकाशात’ (१९६७), ‘राखेतील निखारे’ (१९४०), ‘बोलका ढलप्या’ (१९५९), ‘हिरवे कंदील’ (१९४४), ‘पाण्यावरल्या रेषा’ (१९६३), ‘निवडक गणूकाका’ (१९६४), ‘प्रकाशाची दारे’ (१९७०), ‘निळ्या ठिणग्या’ (१९७२) ही पुस्तके त्यांच्या व्यासंगी आणि रसिक व्यक्तिमत्त्वाची साक्ष देतात. आयुष्यात निरंतर, अखेरपर्यंत लेखनरत राहणारा साहित्यिक म्हणून त्यांची आठवण मराठी रसिकांना आहे.
अनेकविध उपक्रमांत रमून जाण्याची काणेकरांना आवड होती. तो त्यांचा स्वभाव होता. सभा, संमेलने, अध्यक्षपदे, प्रकाशने, व्याख्याने, पुस्तकांना प्रस्तावना, नवोदितांना उत्तेजन अशा साहित्याशी संलग्न उपक्रमांनी त्यांचे अखेरचे वीस वर्षांचे जीवन आनंदात गेले.
औरंगाबादच्या ३९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाने ते सन्मानित झाले, त्या वेळी विशिष्ट वाङ्मयीन व इतर प्रश्नांबद्दलची आपली मते त्यांनी इतरांचा विरोध असतानाही ठणकावून मांडली. विशेषतः संयुक्त महाराष्ट्रासंबंधी! काणेकरांना विविध मानसन्मान प्राप्त झाले. १९६५ मध्ये शासनाद्वारा ‘पद्मश्री’ या पदवीने ते सन्मानित झाले. विश्वकोशनिर्मिती मंडळाचे ते सदस्य होते. १९५७ ते १९६५ या काळात ते साहित्य अकादमीचे सदस्य होते. साहित्य, संस्कृती आणि शिक्षण या क्षेत्रांत त्यांनी घेतलेला हा सहभाग निःसंशय मोलाचा होता.
वि.स.खांडेकर म्हणतात त्याप्रमाणे ‘एका तरुण राहिलेल्या शहाण्या माणसाचा हा जीवनप्रवास आनंददायी होता.’ अखेरपर्यंत त्यांची वाटचाल स्वतंत्र वृत्तीने झाली. वृत्ती टवटवीत, ताजी राहिली. स्वतःतील ‘कॉमन मॅन’ त्यांनी कायम ठेवला. ७४ वर्षे आनंदाचे झाड फुलवीत त्यांनी कालक्रमणा केली.
अनंत काणेकर यांची मराठी साहित्यातील थोरवी फार मोठी आहे. पण आपली साहित्यातील थोरवी इतरांना जाणवू न देता वागण्याचा नि बोलण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या गप्पा तर खूप रंगायच्या, कारण त्यांना अहंतेचा स्पर्श नसायचा. दुसऱ्याला अवघड वाटेल असे वागण्याचा त्यांचा स्वभावच नव्हता. एक समंजस माणूस, असे त्यांचे थोडक्यात वर्णन करता येईल. ‘समंजस माणूस स्वतःच्या मर्यादा जाणतोच; पण इतरांच्या मर्यादांविषयी क्षमाशील असतो. म्हणूनच काणेकर सर्वांना हवेहवेसे वाटायचे.’ असे डॉ.स.गं.मालशे त्यांच्यासंबंधी म्हणतात.
मराठी साहित्याचे समीक्षक आणि अभ्यासक प्रा.स.गं. मालशे यांच्या वरील अवतरणातून अनंत काणेकरांची समंजस मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते. ‘रूपेरी वाळू आणि तिची भावंडे’ या काणेकरांच्या पुस्तकाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात मालशे यांनी वरील उद्गार नोंदले आहेत (१९८४), ते वेगळ्या संदर्भात. म्हणजे काणेकरांच्या ‘मी महाकवी’ या लेखाबाबत काणेकरांचा जन्मजात मिस्किलपणा आणि साध्या विषयात तत्त्वसुंदर आशय पाहण्याची हातोटी यांमुळे मराठी समीक्षकांची त्यांनी घेतलेली मजेदार फिरकी (खलील जिब्रान आणि त्याचे साहित्य या संदर्भात) या ओघात हे निरीक्षण आले असले, तरी अनंत काणेकरांच्या स्वभावधर्माचा ते चपखल परिचय करून देणारे आहे.
१. केळकर अविनाश, संपादक; ‘अनंत काणेकर : व्यक्ती आणि वाङ्मय’.
२. डॉ. देशपांडे अ.ना; ‘आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास’.