कानेटकर, विष्णू गोपाळ
विष्णू गोपाळ कानेटकरांचा जन्म सोलापूर येथे झाला. हरिभाई आणि देवकरण शाळेत शालेय शिक्षण संपवून फर्ग्युसन महाविद्यालयामधून त्यांनी बी.एस्सी. पदवी घेतली. १९३४मध्ये आय.पी. म्हणजे त्या वेळची इम्पिरियल पोलीस ह्या परीक्षेत गणित विषयात सर्वोच्च गुण मिळवून ते पहिले आले व पोलीस खात्यात रुजू झाले. सौराष्ट्र व राजस्थानातील गुंड व दरोडेखोरांच्या टोळ्यांचा नि:पात करून तेथे त्यांनी सुव्यवस्था निर्माण केली, हा त्यांच्या कारकिर्दीचा मानबिंदू ठरावा.
१९४९मध्ये पुण्याचे डी.एस.पी. म्हणून काम करत असताना सौराष्ट्रात भूपत नामक दरोडेखोराने धुमाकूळ घातला होता. भूपतने जवळपास ऐंशी लोकांचा बळी घेतला होता. श्रीमंत जमीनदार व राजकारण्यांना मारून त्यांची संपत्ती तो लुटायचा व त्यांतील काही हिस्सा गरिबांमध्ये वाटायचा. हा भूपत शंकराचा भक्त होता. त्यामुळे गरीब लोक त्याला शंकराचा अवतार मानत. छोट्या संस्थानांचे राजे घाबरून त्याला आश्रय देत. पोलीस अधिकारी व पोलीस दलाचे संपूर्ण खच्चीकरण झाले होते. सूचना देऊन दरोडा घालण्याइतका तो धीट झाला होता. घाबरून तेथील पोलीस चक्क पलायन करीत व भूपतला मोकळे मैदान मिळे. अशा परिस्थितीत उच्च अधिकारी सौराष्ट्रात जाण्यास तयार नसत. १९५१मध्ये परिस्थिती फारच बिकट झाल्यामुळे त्या वेळचे देशाचे गृहमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी कानेटकरांना सौराष्ट्रात जाण्याबद्दल विचारणा केली. कानेटकरांनी हे आव्हान लगेच स्वीकारले. दोन बढत्या मिळून ते आय.जी. म्हणून राजकोट येथे (सौराष्ट्राची राजधानी) रवाना झाले.
‘कानेटकरचा बच्चा आला आहेस खरा; पण इतर अधिकार्यांप्रमाणे दोन दिवसांत लंगोटी धरून पळून जाशील’, अशी धमकीवजा चिठ्ठी पाठवून भूपतने कानेटकरांचे स्वागत केले. कानेटकर दुसर्या दिवसापासूनच कार्यरत झाले. स्वत: जातीने मोहिमा आखून, पोलिसांबरोबर गावोगावी दरोडेखोरांचा मागोवा घेत फिरू लागले. आपले प्रमुख जातीने रात्रंदिवस कशाचीही पर्वा न करता आपल्याबरोबर वणवण करीत आहेत हे अनुभवल्यावर पोलिसांचे मनोधैर्य वाढू लागले. सुरुवातीस त्यांनी थोडे अपयश अनुभवले; पण खचून न जाता त्यांनी लढा चालू ठेवला व शेवटी भूपतचा उजवा हात मानला जाणारा ‘देवायत’ मारला गेला. भूपतला हा मोठा धक्का होता. त्या पाठोपाठ त्याचा ‘बच्चू’ नामक साथीदार जिवंत पकडला गेला. कानेटकर यांनी पोलिस खात्याचा चेहरामोहराच बदलून टाकला होता. हे बघून, ‘तू लंगोटी धरून पळ काढशील’, असे लिहिणारा भूपत घाबरून, स्वत:चे कुटुंब सोडून पाकिस्तानात पळून गेला. सौराष्ट्रातल्या जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला. ह्या कार्याबद्दल कानेटकर यांना १९५४ चे पोलीस शौर्यपदक त्या वेळचे राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद ह्यांच्या हस्ते देण्यात आले. यानंतर राजस्थानात सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांची जयपूरला बदली झाली. तेंव्हा राजकोटचा रेल्वे फलाट पोलिसांनी भरला होता. साश्रू नयनांनी अधिकार्याला निरोप देणारे पोलीस जनतेने प्रथमच पाहिले.
१९६०मध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली. कठोर पण नि:स्पृह, धुतल्या तांदळासारखे स्वच्छ व कोणाच्याही दबावाला बळी न पडणारे अशी त्यांची प्रतिमा होती. आयुक्त असताना एका वाढदिवशी इन्स्पेक्टर फ्रॅमरोज पुष्पगुच्छ घेऊन आले. त्यांनी खूप विनवण्या केल्यावर कानेटकरांनी त्यातील एक गुलाब घेतला व सदिच्छेशिवाय दुसरे काही न आणण्याची विनंती केली. त्याच काळात इजिप्तच्या एका उच्चाधिकार्याची चोख सुरक्षा व्यवस्था ठेवल्यामुळे खूश होऊन त्याने उंटाच्या कातड्याचे दोन मौल्यवान स्टूल्स पाठवले. दुसर्याच दिवशी कानेटकरांनी ही भेट आयुक्तांच्या कार्यालयात पाठवून दिली. ‘मी माझं कर्तव्य बजावले, त्यासाठी मोबदल्याची आवश्यकता नाही,’ असे त्यांनी कळवून टाकले.
ह्या काळात कानेटकरांच्या पत्नी कुसुमताई ह्यांनीही त्यांना साथ दिली. अहोरात्र काम करणार्या सामान्य पोलिसांच्या घरांची अवस्था वाईट होती. पावसाळ्यात गळणार्या घरांमुळे मुले व बायका बर्याचदा पलंगाखाली आश्रय घेत. अशावेळेस पोलीस लाइन्समध्ये जाऊन त्या त्यांची विचारपूस करत. गळकी घरे, नहाणी घर व इतर दुरावस्था कानेटकरांमार्फत सरकारच्या (प्रशासनाच्या) नजरेसमोर आणण्याचा त्या प्रयत्न करीत. पोलिसांच्या बायकांना सक्षम करण्यासाठी त्यांना शिवणाचे प्रशिक्षण, शिवणाची यंत्रे देणे असे उपक्रम सुरू करून त्याचा पाठपुरावा त्यांनी केला.
कानेटकरांची शेवटची नियुक्ती दिल्लीला झाली. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक व याच दलाचे ते पहिले महासंचालक झाले. कानेटकरांनी सैन्याप्रमाणेच या दलाच्या बटालिअन्स तयार केल्या. हे दल भारतीय सैन्याच्या तोडीस तोड करण्याचा मान कानेटकरांकडेच जातो. पोलिसांचे मानसिक स्वास्थ्य त्यांच्या कौटुंबिक स्थैर्यावर अवलंबून असते याची जाणीव कानेटकरांना होती. त्यामुळेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्राजवळ त्यांनी पोलिसांच्या कुटुंबांची निवासव्यवस्था केली. पुणे जिल्ह्यात पवना धरणाजवळ हे केंद्र उभारले आहे. या परिसरात पोलिसांसाठी निवासस्थाने आणि शाळाही उभारल्या आहेत. ‘टेल्स ऑफ क्राइम’ आणि ‘क्राइम इन द फ्यूचर’ या दोन पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे.
कानेटकर सेवानिवृत्त झाल्यावर जवळजवळ वीस वर्षांनी ‘लोकसत्ते’त मुंबईबद्दल अग्रलेख आला होता. त्यात शेवटची ओळ होती, ‘कानेटकर व पिंपुटकरांसारखे अधिकारी लाभल्याशिवाय मुंबई शहराला भवितव्य नाही.’