Skip to main content
x

कानोले, विश्वेश्वरराव अंबादासराव

कानोले,तात्यासाहेब

       राठवाड्यातील एक प्रसिद्ध इतिहासप्रेमी, उत्कृष्ट इतिहास संशोधक विश्वेश्वरराव अंबादासराव कानोले हे तात्यासाहेब या नावाने ओळखले जातात. त्यांचा जन्म नांदेड येथे झाला. तात्यासाहेबांना मुळातच इतिहास, साहित्य, धर्म या क्षेत्रांमध्ये रुची होती. फार्शी, गुरुमुखी, पंजाबी, उर्दू या भाषांवरही त्यांचे प्रभुत्व होते. १९६२ मध्ये बीड येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, नांदेड येथे भरलेल्या महानुभाव परिषदेचे उद्घाटक, महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख व पुरातत्त्व समितीचे सदस्य, नांदेडच्या गोदातीर संशोधन मंडळाचे संस्थापक इ.च्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.

विद्यार्थिदशेपासूनच तात्यासाहेबांना इतिहासाविषयी आकर्षण होते. त्यातून त्यांनी ऐतिहासिक वस्तूंच्या संकलनाची व संग्रहाची आवड जोपासली. जुन्या पोथ्या संकलित करण्याच्या वेडातून त्यांनी जवळपास दोन हजार हस्तलिखितांचा संग्रह केला; एवढेच नव्हे, तर त्यांनी नांदेड येथे हस्तलिखित ग्रंथाचे एक प्रदर्शनच आयोजित केले होते. त्यांच्या या कामाचे खुद्द द.वा. पोतदार यांनी कौतुक केले व तात्यासाहेबांना आपले शिष्य मानले.

तात्यासाहेबांनी नांदेड येथे गोदातीर इतिहास संशोधन मंडळाची स्थापना करून स्थानिक इतिहास संशोधनास चालना दिली. स्वत: राज्य व राष्ट्रीय स्तरावरील इतिहास परिषदांमधून नांदेड व परिसरातील इतिहासासंबंधी संशोधन शोधनिबंधाच्या माध्यमातून सादर केले.

मराठीचे आद्यकवी मुकुंदराज हे मूळचे अंबाजोगाईचे होते. नेताजी पालकरांचे वृद्धापकाळी वास्तव्य नांदेड जिल्ह्यात तामसा येथे होते. संत नामदेवांचे जन्मगाव नरसी हे सोलापूरजवळ नसून मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी पुराव्याच्या आधारे सिद्ध केली. याशिवाय शिखांचे दहावे गुरू गुरुगोविंदसिंग यांच्या संक्षिप्त चरित्राचे लेखनही तात्यासाहेबांनी केले व प्रसिद्ध केले. विशेष म्हणजे, तत्कालीन राष्ट्रपती मा. ग्यानी झैलसिंग यांनी आपल्या नांदेड भेटीत तात्यासाहेबांशी शिखांच्या इतिहासाविषयी चर्चा केली. नांदेड व परिसरासंबंधी तात्यासाहेबांनी उपयुक्त संशोधन केले. नांदेड परिसरात सापडलेल्या उत्तर चाणक्यकालीन शिलालेखांची माहिती, नांदेड शहराचे धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व, मुहम्मद गवान याने नांदेडमधील वसविलेली वजिराबादची वस्ती, नांदेडची प्राचीन कवी परंपरा, पन्नास वर्षांपूर्वीचे नांदेड, नांदेड क्षेत्र माहात्म्य इ. महत्त्वपूर्ण व रोचक माहिती तात्यासाहेबांनी आपल्या संशोधनातून पुढे आणली. विविध शोधनिबंध, पुस्तिका, वृत्तपत्रातील लेख इ.च्या माध्यमातून केलेले सर्व लेखन संकलित केल्यास नांदेडचा इतिहास एकत्रित उपलब्ध होऊ शकेल. त्यांचे लेखन फक्त इतिहासापुरते मर्यादित नसून धार्मिक, साहित्यिक, संत साहित्य, नाट्य इत्यादींशी संबंधित आहे. नांदेडच्या प्राचीन कवी परंपरेची ओळखही त्यांनी करून दिली आहे. यामध्ये कवी वामन पंडित, रघुनाथ शेष यांपासून श्रीधर महाराज कंदकुर्तीकर इ. कवींची माहिती दिली आहे.

हस्तलिखितांचा संग्रह हे तात्यासाहेबांचे महत्त्वपूर्ण कार्य होय. त्यांच्या संग्रही संस्कृत व मराठी हस्तलिखितांचा संग्रह होता. संस्कृतमध्ये मुद्गलभट्ट वैद्य यांचा विमलबोध’, विमलदेव चौहान यांचा प्रबोधचंद्रिका’, रघुनाथ शेषांचा तंत्रदर्पण’, देशिकेंद्र चिंतामणी कृत गुरुभागवत’, बोपदेव कृत हरिलीलाया प्रमुख ग्रंथांचा समावेश होता. याशिवाय, ज्योतिषशास्त्रावरील मुहूर्त कल्पकद्रुम’, ‘तिथिदीपिका’, ‘कालसिद्धान्त’, ‘वर्षफलपद्धतीहे महत्त्वाचे ग्रंथही त्यांच्या  संग्रही होते.

मराठी हस्तलिखितांच्या यादीत ज्ञानेश्वरीची महाराष्ट्रातील सर्वांत प्राचीन प्रत, एकनाथांचे एकादशी माहात्म्य’, मुक्तेश्वराचे महाभारत’, वामन पंडितांची यथार्थ दीपिका’, ‘दासबोधया महत्त्वाच्या ग्रंथांसह शेकडो मराठी ग्रंथांची हस्तलिखिते त्यांच्या संग्रही होती. अशा प्रकारे आपल्या प्रत्यक्ष कार्यातून तात्यासाहेबांनी इतिहास संशोधनाचा आदर्श भावी पिढीस घालून दिला. विशेष म्हणजे, हस्तलिखितांच्या संग्रहातून आपल्या इतिहासाचे जतन केले; स्थानिक इतिहासाला प्राधान्य देऊन संशोधनाच्या माध्यमातून तो पुढे आणला. तात्यासाहेबांनी केलेले नांदेडविषयीचे संशोधन भावी पिढीसाठी मार्गदर्शक म्हणून आजही उपयुक्त आहे.

संपादित

कानोले, विश्वेश्वरराव अंबादासराव