Skip to main content
x

कांत, वामन रामराव

वा. रा. कांत

वा.रा.कांत ह्यांचा जन्म नांदेड येथे झाला. तिथेच त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी ते हैद्राबाद येथे गेले, पण इंटरनंतर त्यांना शिक्षण सोडून द्यावे लागले. त्यानंतर ‘विहंगमाला’या नियतकालिकाचे संपादन करत असतानाच ‘विहंग’ प्रेसचे व्यवस्थापनही वा.रा.कांत यांनी केले (१९२८). निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपीक म्हणून नोकरी केल्यानंतर (१९३३-१९४५) निजाम सरकारच्याच हैद्राबाद व औरंगाबाद येथील आकाशवाणी केंद्रांमध्ये मराठी विभागप्रमुख म्हणून (१९४५-१९६०) आणि भारतीय आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरही मराठी विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले (१९६०-१९७०).

वा.रा.कांत यांनी १९२५ पासून काव्यलेखनास सुरुवात केली. ‘बाई कालिके’ ही त्यांची प्रसिद्ध झालेली पहिली कविता (मंदारमाला, १९२८). ‘पहाटतारा’ हा त्यांचा पहिला कविता संग्रह (१९३०), त्यानंतर ‘फटत्कार’ (१९३३), ‘रुद्रवीणा’ (१९४७), ‘शततारका’ (१९५०), ‘वेलांटी’ (१९६२), ‘वाजली विजेची टाळी’ (१९६५), ‘मरणगंध’ (१९७६), ‘दोनुली’ (१९७९) आणि ‘मावळते शब्द’ (१९८८) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले.

वा.रा.कांत ह्यांना उर्दू भाषा आणि साहित्य ह्यांचा वारसा वडिलांकडून मिळाला होता. शालेय शिक्षणाचे त्यांचे माध्यम उर्दू होते. त्यामुळे उर्दू व हिंदी या भाषांवर तसेच इंग्रजीवरही त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी केलेले अनुवाद नोंद घेण्यासारखे ठरले. ‘रझिया सुल्ताना’ (लेखक रफिक झकेरिया, इंग्रजी कादंबरी १९७१), ‘मनुष्याची रूपं’ (लेखक यशपाल शर्मा, हिंदी कादंबरी १९७५), ‘कालचे लखनौ’ (लेखक मौलाना अब्दुल हलीर्म शरीफ, उर्दू कादंबरी १९७६), ‘मिर्जा गलिब चरित्र व काव्य’ (श्री.हैदर, इंग्रजी, १९८०), ‘वेमना’ (ले.व्ही.आर.नाली, इंग्रजी १९८१), ‘एक चादर मैलीसी’ (डॉ.राजेंद्रसिंह बेदी, १९८७), ‘मध्यस्थ’ (ए.डी.गोरवाला, कादंबरी, मौज दिवाळी अंक), ‘कागद आणि कॅन्व्हास’ (अमृता प्रीतम, हिंदी, अप्रकाशित) शोक सांबर झालेल्या मुलाचा: अज्ञाताच्या दाराशी (फेरेन्स जूहास,The Boy Changed into a Stage Clamours at the Gate of Secrets),  दीर्घकाव्य, अप्रकाशित) याशिवाय मिर्जा गालिबच्या निवडक गजला, रवींद्रनाथ टागोरांचे ‘मालिनी’ आणि गजानन मुक्तिबोध यांच्या निवडक कविता यांचे अनुवाद कांत यांनी केले.

भोवतालच्या जगातील अन्याय आणि विषमता पाहून कांत क्षुब्ध होतात. स्वातंत्र्य, समता यांचे ते गुणगान करतात. त्यासाठी त्याग, बलिदान, रक्तरंजित क्रांती यांची गरज असल्याचे त्यांची कविता सांगते. रुद्रवीणेतील विशुद्ध प्रेमकविता त्यांच्या प्रतिभेचे मनोज्ञ दर्शन घडवते.

सांगीतिकेपेक्षा भिन्न, गाण्याचे अंग नसलेला, व्यक्तिचित्रण आणि संवादशैली यांच्या एकत्रीकरणातून जीवनविषयक दृष्टीकोन साकारणारा ‘नाट्यकाव्य’ नामक एक नवा, वेगळा प्रकार मराठी साहित्यात रुजवण्याचे श्रेय कांत यांना जाते. ‘दुमार’, ‘पाषाणावरील तीळ’, ‘आशिया’, ‘चुंबन’, ‘सूर्याचं वाळवंट’ आदी १६ नाट्यकाव्ये त्यांनी लिहिली. त्यांतली काही आकाशवाणी केंद्रावर गाजली. वा.रा.कांत ह्यांच्या नावावर २९ समीक्षात्मक लेख, २१ ललित लेख, ‘अभिजीत’ किंवा ‘रसाळ वामन’ या टोपण नावांनी लिहिलेले ७ ललित लेख असे वाङ्मय आहे. काही कवितासंग्रहांसाठी त्यांनी प्रस्तावनाही लिहिल्या आहेत.

मराठवाडा साहित्य संमेलनात (१९५३) आणि मराठवाडा संमेलनात कविता संमेलनांचे अध्यक्षपद कांत यांनी भूषवले. त्यांच्या चार काव्यसंग्रहांना राज्यपुरस्कार लाभले. महाराष्ट्र राज्य साहित्य संकृती मंडळातर्फे गौरववृत्ती (१९८९), महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे व आंध्र प्रदेश, हैद्राबाद ह्यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवा सन्मान (१९८८ व १९८९) त्यांना लाभले.

- डॉ. अनुपमा उजगरे

 

कांत, वामन रामराव