केळकर, दिवाकर कृष्ण
मूळ गाव मिरजेजवळ गणेशवाडी. वडील वैदिक पंडित व ज्योतिषी. वडील तरुण वयात हैद्राबादमध्ये स्थायिक झाले होते. त्यांना निजाम सरकारकडून ‘विद्वान शास्त्री’ म्हणून तनखा मिळत होता. दिवाकर कृष्णांचे इंग्रजी पाचवीपर्यंतचे शिक्षण हैद्राबादच्या ‘वैदिक धर्म प्रकाशिका’ या खासगी शाळेत झाले. पुढे सांगलीला येऊन १९२० साली सांगली हायस्कूलमधून मॅट्रिक झाले. १९२४ साली पुण्याच्या ‘न्यू पूना कॉलेज’मधून (एस.पी.महाविद्यालयामधून) संस्कृत विषयाची बी.ए.ची पदवी मिळवली. १९३०साली पुण्याच्या विधी महाविद्यालयामधून एलएल.बी.झाले. पुढे हैद्राबादला येऊन वकिलीचा व्यवसाय सुरू केला. १९४४ पासून १९५६पर्यंत हैद्राबाद नगरपालिकेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून काम केले. निजामाच्या संस्थानात वास्तव्य असल्याने उर्दू व हिंदी भाषा उत्तम अवगत. संस्कृत भाषा व साहित्य यांचा चांगला अभ्यास. इंग्रजी व फ्रेंच या भाषांतील कादंबर्या, इंग्रजी रोमँटिक कविता, टागोर, प्रेमचंद, टॉलस्टॉय यांचे साहित्य व बंगाली कादंबर्या यांचाही त्यांच्यावर प्रभाव पडला होता. त्यांच्या कथालेखनात यांचे ठसे उमटलेले दिसतात. दिवाकर कृष्णांनी १९५० साली मुंबई येथे भरलेल्या तेहेतिसाव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनातील, शाखा-संमेलनातील कथा-शाखा संमेलनाचे अध्यक्षपद, तसेच १९५४च्या लातूरच्या मराठवाडा संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यांचे प्रमुख साहित्य अशा प्रकारे आहे कथा संग्रह: ‘समाधी व इतर सहा गोष्टी’ (१९२७), ‘रूपगर्विता आणि सहा गोष्टी’ (१९४१), ‘महाराणी आणि इतर कथा’ (१९५५) या तीन कथासंग्रहांत एकूण २१ कथा आहेत. कादंबरी: ‘किशोरीचे हृदय’ (१९३४) व ‘विद्या आणि वारुणी’ (१९४४) आणि नाटक ः ‘तोड ही माळ अर्थात गंगालहरी’ (१९३४) तसेच दोन अध्यक्षीय भाषणे व काही समीक्षात्मक लेख.
नवे वळण
दिवाकर कृष्णांनी कथा, कादंबरी, नाटक हे तीनही वाङ्मयप्रकार हाताळले असले, तरी त्यांची खरी प्रसिद्धी कथालेखक म्हणूनच आहे. ही कथा आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही अंगांनी मराठी कथेला नवे परिमाण मिळवून देणारी आणि मराठी कथेला नवे वळण देणारी ठरली. हरिभाऊ आपटे यांच्या ‘स्फुट गोष्टी’च्या रूपाने मराठी कथा अवतरली. आपल्या ‘करमणूक’मधून त्यांनी आपल्याच ‘आजकालच्या गोष्टी’बरोबर, त्या प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. या गोष्टी आकाराने त्यांच्या कादंबरीपेक्षा लहान असल्या, तरी कादंबरीपासून त्यांची नाळ पूर्णपणे तुटलेली नव्हती. सामाजिक आणि बोधवादी अशी ही कथा, पुढे नारायण हरी आपटे यांनी त्याच मार्गावरून पुढे नेली. वि.सी.गुर्जर यांनी मोठ्या प्रमाणात कथालेखन केले. त्यांची कथा बोधवादापेक्षा निखळ रंजन करण्याच्या हेतूने लिहिलेली आहे. त्यांच्या कथांची रचना हलकीफुलकी आहे. मात्र ही कथाही आधीच्या मराठी कथेप्रमाणेच ऐसपैस, काहीशी पाल्हाळीक आहे.
या पार्श्वभूमीवर दिवाकर कृष्णांची कथा, अगदी वेगळी ठरते. चटकन दिसणारा फरक म्हणजे, कथेची लांबी. त्यांची कथा आकाराने अगदी छोटी. पूर्वकथाकारांचे संस्कार त्यांच्या कथेवर कुठेही दिसत नाहीत. आशयातील आत्मनिष्ठता आणि अभिव्यक्तीमधील तंत्रशुद्धता त्यांच्या कथेत प्रथम दिसते. तत्कालीन रोमँटिक प्रवृत्तीचा प्रभाव त्यांच्या कथेमध्ये जाणवतो. आपल्या अनुभवविश्वातून स्फुरलेली, आत्ममग्न अशी ही कथा आहे. एककेंद्री अनुभव त्यांच्या कथेत प्रथम अभिव्यक्त झाला. सौंदर्यासक्ती, सौंदर्याची दाहकता, एकाकी मनाचे कढ, मनाची शोकात्म प्रवृत्ती, मृत्यूचे गूढ आकर्षण हे त्यांच्या कथानायक-नायिकांचे स्वभावविशेष आहेत. अशा व्यक्तींचे चित्रण करताना त्याला अनुरूप अशा मोजक्या घटनाप्रसंगांची निवड व योजना आणि साधी व परिणामकारक निवेदनशैली त्यांच्या कथेमध्ये येते. शब्दांचा मितव्यय हे त्यांच्या कथेतील संवादांचे वैशिष्ट्य आहे. दिवाकर कृष्णांचे आपल्या कथेबद्दलचे विचार घेण्याजोगे आहेत. ते म्हणतात, “माझ्या कथा सर्वच्या सर्व मौलिक, ओरिजनल होत्या..., मनोव्यापार प्रथम माझ्या कथेत आला..., फापटपसार्याऐवजी व्यक्तीच्या आंतरिक व्यापारावर भर असून कथेमध्ये, कोणताही ‘उद्देश’ नव्हता..., सामाजिक दृष्टी आहे, पण सामाजिक टीकेचे आकर्षण नाही. विशेष आकर्षण व्यक्तीच्या आंतरिक जीवनाचे..., ठरवून वेगळ्या पद्धतीने कथा लिहिल्या नाहीत. माझ्या पद्धतीने मी लिहीत होतो. प्रसिद्ध झाल्यावर, त्या इतरांना वेगळ्या वाटल्या.” (ललित, ऑगस्ट १९७१)
दिवाकर कृष्णांची पहिली कथा ‘अंगणातला पोपट’. १९२१ साली, त्यांच्या वयाच्या एकोणिसाव्या वर्षी, ‘मासिक मनोरंजन’मधून ही कथा प्रसिद्ध झाली आणि याच मासिकातून त्यांचे कथालेखन सुरू झाले. तसेच ‘यशवंत’, ‘नवयुग’ यांतूनही त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. पहिला कथासंग्रह ‘समाधी व इतर सहा गोष्टी’ १९२७ साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘रूपगर्विता आणि सहा गोष्टी’ (१९४१) आणि ‘महाराणी व इतर कथा’ (१९५५) हे दोन कथासंग्रह प्रकाशित झाले. या संग्रहांमधून एकूण २१ कथा प्रसिद्ध झाल्या. संख्येने अल्प, पण गुणांनी समृद्ध अशा या कथा आहेत. ‘लिहावसं वाटलं तर लिहावं’ एवढीच दृष्टी असल्याने मोजक्याच कथा लिहिल्या गेल्या.
नायिकाप्रधान कथा
त्यांच्या बहुसंख्य कथा नायिकाप्रधान आहेत. या नायिका त्या काळच्या मानाने सुशिक्षित, विचार करण्याची कुवत असलेल्या, आत्ममग्न व मनस्वी आहेत. त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. स्वप्नाळूपणा, काव्यात्म वृत्ती, व्यवहारी जगाचा तिटकारा हे त्यांचे स्वभावविशेष आहेत. मनाविरुद्ध जगत राहण्यापेक्षा मृत्यू पत्करण्याची त्यांची तयारी आहे. त्यामुळे बहुतेक कथा शोकात्म व शोकान्त आहेत. बरेचसे कथानायकही कथानायिकांच्या या मनःप्रवृत्तीला पूरक असेच आहेत. असफल प्रेमाचे दर्शन त्यांच्या कथांमधून घडते. ‘मृणालिनीचे लावण्य’, ‘समाधी’, ‘संकष्ट-चतुर्थी’ इत्यादी कथांमधून त्याचा प्रत्यय येतो.‘अंगणातला पोपट’मधील छोटा मुलगा पोपट याचे पित्याच्या प्रेमाला आसुसलेले व हिरमुसलेले मन आजही वाचकाचे हृदय हेलावणारे आहे.‘लोकनंदिनेचा व्रतभंग’, ‘जगायचंय मला’ या कथांमधील आशयाचे रूपही अगदी वेगळे आहे. दिवाकर कृष्णांच्या कथेच्या या वैशिष्ट्यांमुळेच त्यांची कथा बरेचदा शोकात्म भाव सतत व्यक्त करणारी, एकसुरी बनते. त्यांच्या कथा भावविवशतेच्या पातळीवर जातात. त्यामुळे बरेचदा व्यक्तिचित्रणालाही मर्यादा पडतात. तरीही मराठी कथेची प्रकृती व प्रवृत्ती बदलून कथेला वेगळे रूप देण्याचे सामर्थ्य त्यांच्या कथेत असल्याने ती तितकीच महत्त्वाची ठरते. त्यांच्या दोन कादंबर्या व एक नाटक हे खास दखल घ्यावी, असे नाही.