केळकर, यशवंत नरसिंह
ग्रंथवाङ्मय व इतिहास या दोन्हींच्या भोक्त्यांस अनेक दृष्टींनी अपूर्व वाटेल अशा ‘ऐतिहासिक पोवाडे’ (मराठ्यांचा काव्यमय इतिहास) या ग्रंथाचे कर्ते यशवंतराव केळकर हे शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक म्हणूनही नावाजले गेले आहेत. पुणे येथे जन्मलेल्या केळकर यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची वाङ्मयविशारद ही पदवी १९२२मध्ये संपादन करून सुमारे दीड वर्ष सातारा येथील कन्याशाळेत शिक्षकाचे काम केले. नंतर पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात अव्वल दर्जाच्या इतिहास संशोधकांच्या सहवासात काम करताना केळकरांची इतिहास विषयक संशोधनाची व लेखनाची आवड वाढत गेली, आणि सतत दोन वर्षे परिश्रम करून १९२८मध्ये त्यांनी ग्रंथनिर्मिती केली. विद्वानांकडून त्यांची वाखाणणी झाली.
मूळ मोडी लिपीतल्या पोवाड्यांचे मराठी बाळबोधीत लिप्यंतर करण्याच्या कामी त्यांनी घेतलेले परिश्रम व दाखवलेली सूक्ष्मता, काटेकोरपणा यापूर्वीच्या कोणाही पोवाडे संग्राहकाकडून दाखवले गेलेले नाही. ‘ऐतिहासिक पोवाडे’चे आणखी दोन खंड पुढे प्रसिद्ध झाले (१९४४ व १९६९). या ग्रंथाच्या पुरस्कारात महामहोपाध्याय द.वा.पोतदार म्हणतात, ‘ऐतिहासिक पोवाडे निवडून त्यांच्या पाठांची मोठ्या परिश्रमाने आणि कौशल्याने चिकित्सा करून अर्थबोधक व अवांतर टीपा जोडून वगैरे अनेक रीतींनी ग्रंथ होईल तेवढा उपयुक्त करण्याचा प्रयत्न केळकर यांनी मोठ्या कसोशीने केला आहे.’ विस्तृत प्रस्तावना हे या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य होय.
रियासतकार सरदेसाईंनी पेशवे दप्तराच्या संशोधन कार्यात साहाय्यक या नात्याने केळकरांना बोलावून घेतले. केळकरांनी तेथे तीन वर्षे काम करताना हजारो पत्रे वाचली. त्यातून मराठेशाहीच्या इतिहासातील अत्यंत अभिमानास्पद अशा चिमाजी आप्पांच्या कर्तबगारीची त्यांच्यावर विलक्षण छाप पडली. या प्रेरक घटनेतून ‘वसईची मोहीम’ हा ग्रंथ साकार झाला असे नाही, तर अभ्यासकांना व इतिहासप्रेमींना अत्यंत उपयोगी असा ‘ऐतिहासिक शब्दकोश’ ही (१९६२) साकार झाला. या कोशात पंधरा हजार ऐतिहासिक शब्दांचा समावेश आहे व ही एकट्या केळकरांची कामगिरी आहे.
उत्साही, बुद्धीमान, कष्टाळू व चिकित्सक केळकरांनी १९३५ ते १९५६ या काळात ‘केसरी’मध्ये साहाय्यक संपादक म्हणून काम केले. या काळात ऐतिहासिक ग्रंथ परीक्षणात्मक व इतरही स्फुट लेखन त्यांनी केले. इतिहास संशोधक व कवी असल्याने त्यांचे लिखाण सरस व नेटके असल्यास नवल नाही. वरील स्फुट लेखनाच्या संग्रहांखेरीज ‘साष्टी-वसईची मुशाफरी’, ‘म्हैसूरकडील प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन’; ‘गीत द्विदल’ (१९२५), ‘गीत गुंफा’ (१९३२), ‘मनाचा मोहर’ (१९७०) हे त्यांचे तीन पद्यसंग्रह असून ‘विनोदलहरी’ (१९३२) हा विनोदी लेखांचा संग्रह आहे. ‘अंधारातील लावण्या’ (१९५९) हा लावणीसंग्रह, ‘मराठी शाहीर व शाहिरी वाङ्मय’ (१९७४) हा विवेचक ग्रंथ आहे. ‘चित्रमय शिवाजी’ (१९३५) तसेच ‘म्हणी अनुभवाच्या खाणी’ (१९६२) असे त्यांचे ग्रंथ प्रकाशित झाले. संपादित ग्रंथांमध्ये ‘होळकरांची कैफियत’ (१९५४), ‘केळकर कुलवृन्तात’ (१९५२), ‘केळकरांचा खासगी पत्रव्यवहार’ (१०५०) यांचा समावेश आहे. साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण केळकरांचे सुपुत्र यशवंतराव यांनी शिवपूर्वकाळापासून मराठेशाहीच्या अंतापर्यंतच्या विशाल पटाचे दर्शन वाचकांना घडवून ऐतिहासिक स्वरूपाचीच कामगिरी केली आहे.