कॅफिन, ए. ई.
ए.ई.कॅफिन हे मुंबई इलाख्याचे शेवटचे ब्रिटिश पोलिस आयुक्त होते. १९४७ साली भारत स्वतंत्र होण्याच्या फक्त सहा महिन्यांपूर्वी ते मुंबईचे पोलिस आयुक्त झाले. स्त्रियांना पोलीस दलात प्रवेश मिळावा यासाठी त्यांनीच प्रथम आपल्या कार्यकालात कायदा केला. त्यांनी १ ऑगस्ट १९४७ या दिवशी एका महिलेची पोलीस उपनिरीक्षक या पदावर नियुक्ती केली. त्यानंतर दोन आठवड्यांनी १४ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांनी आपला पदभार जे.एस.भरुचा यांच्याकडे सन्मानपूर्वक सोपवला. पोलीस निरीक्षक जे.एस.भरुचा हे त्यांचे नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सहाध्यायी होते.
मुंबईचे माजी डी.सी.सी. व्ही.जी.कानेटकर यांनी कॅफिन यांचे जे वर्णन केले आहे त्यातून त्यांची पोलीस अधिकारी म्हणून बजावलेली कामगिरी अधोरेखित होते. व्ही.जी. कानिटकर लिहितात, “१४ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांनी आपला पदभार जे.एस.भरुचा यांच्याकडे सन्मानपूर्वक सोपविला. या प्रसंगाची नोंद ठेवणे ही मी माझी जबाबदारी समजतो. ब्रिटिश शासनाने दिलेली मुदतपूर्व निवृत्ती स्वीकारण्याची सवलत कॅफिन यांच्या सोबतच्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी स्वीकारली. परंतु कॅफिन यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी निष्ठापूर्वक पूर्ण केली. शिल्लक राहिलेले प्रत्येक काम पूर्ण केले. त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या आणि त्यानंतरच त्यांनी आपला पदभार भरुचा यांच्याकडे समारंभपूर्वक सुपूर्त केला.आपल्या लौकिकाला शोभेल अशा पद्धतीने निवृत्ती स्वीकारली.”
परक्या देशावरील आपले शासन समाप्त होण्याच्या काळातही अत्यंत काळजीपूर्वक कर्तव्यनिष्ठेने काम करणाऱ्या या मुंबईच्या शेवटच्या ब्रिटिश पोलीस आयुक्ताचे हे वर्तन प्रेरणादायक म्हटले पाहिजे.
- संपादित